हे कित्येकदा घडलंय की मी किंवा
ती लांबच्या प्रवासाला निघतो-अमर्यादित काळासाठी आणि निघताना मन आक्रंदून जातं. भिती
दाटून येते. आतल्या आत गलबलतं, तोंडावर फारसं येत नाही. अंगातलं पुरूषी स्वत्व सर्वकाही
दाबून टाकायचा अतोनात प्रयत्न करत राहतं. एक अशी सुटी-सुटी भावना उरत नाही. सगळा कल्लोळ
माजतो. प्रवास पुढचा सगळा एकट्यानं करायचा असतो. यापुर्वीही सतत एकट्यानंच प्रवास होता;
पण प्रवासाला निघण्यापुर्वी तिनं मारलेली मिठी क्षणार्धातच मनाला विरघळून टाकणारी.
शरीरानं एकटं असणं अनुभवलंय, पचवलंय कित्येकदा; पण मनानं एकटं असण्यासारखी वेदनादायक
गोष्ट नसावी. एकलकोंड्या शरीराला मनानच समजूत घातली होती आजवर परिश्रमाची, प्रसंगांची
आणि प्राण जपून ठेवण्याची. मन ज्या-ज्यावेळी एकटं पडलं, त्या-त्यावेळी शरीर निश्चल
बसण्याव्यतिरिक्त विशेष काही करू शकलं नव्हतं.
मैत्रिणीला रस्त्यावर सोडून ज्या-ज्यावेळी
प्रवास सुरू होतो, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसून राहतं. तिच्याबरोबर घालवलेल्या वेळात
कधी वाटलं नव्हतं-न उलगडणाऱ्या कविता होत्या, तळ्यात-मळ्यातच्या गोष्टी होत्या आणि
हट़्टी भांडणांचा पसारा होता. माणूस जवळ असताना किंमत हरवत जाते की काय त्याची? आणि
ही मनाला एकटं पाडणारी माणसं, आयुष्यातली खरंच फार-फार महत्त्वाची असतात की काय? असावं-असेल.
माझ्या सतत कामांत डुंबलेल्या मनाला एकाकी करून सोडणारी गोष्ट खरंच काहीतरी अतिमहत्त्वाची
असावी. प्रवास जरी काही किलोमीटर्सचा असला तरी स्थलांतर फार मोठं होतं. मी माझ्या जगातून
खूप-खूप दुरून पुण्यात येतो. ती तिच्या जगातून माझ्याजवळ येते. तुझ्या-माझ्या म्हणत
दोघांच्या झालेल्या घरात दोघांच्या बनलेल्या जगात पुढचे कित्येक दिवस जातात. तिथून
निघता येत नाही…निसटावं लागतं. त्या प्रेमाच्या वर्तुळात रमलेलं मन मग गटांगळ्या खाऊ
लागतं. गाडी सुरू होते, ती हात हलवत राहते, हवा सारवत राहते, तिला डोळे भरून पाहून
घेतो. पन्नास किलोमीटर्समधे आणि आठशे किलोमीटर्समधे फारसा काही फरक उरत नाही. पुढच्या
भेटी ठरलेल्या नसतात. दोन चिकटलेली आयुष्यं सुटी होऊ लागतात. मन एकटं पडतं. या प्रवासाला
सरावलेल्या दगडासारख्या प्रवाशांकडे बघून अजूनच खटटू होतं. अटळ प्रवासाला सुरूवात झालेली
असते. निरोप देताना मैत्रिण हात हलवून झटक्यात वळून निघालेली असते. वेडीय ती. डोळ्यातली
आसवं दिसू नयेत म्हणून किती काळजी घेते. एकमेकांना समजावणारी मनं दोन दिशांना लांब-लांब
जात राहतात. मनाचा गहिवरलेला जड ढग होतो, जांभळसर रंग आभाळभर होतो. हे कित्येकदा घडलंय.
पंकज कोपर्डे
१ जुलै २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा