रविवार, २७ जुलै, २०१४

स्वप्नदशा


फडफडणाऱ्या डोळ्यांमागे अनंत विश्वं गोठून राहिलेल्या गोष्टी पावसाळी संध्याकाळी बाहेर येऊ लागल्या. चाहूल लागली की, अस्पष्टशा हाका ऐकू येताहेत आणि स्वत:चं भैतिक अस्तित्व विसरून गेलेल्या शरीराला दचकवणारे स्पर्श होताहेत. वीण घट़्ट होती नि अंतर फार होतं. बाहेर पडायचा रस्ता आत शिरणाऱ्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. शेवटी घट़्ट अंधार दिसला नि मिट़्ट डोळे खाडकन उघडले तेव्हा स्थळ-काळाचा संदर्भ पावसासारखाच तोही विसरून गेला होता. जुनाट टेलीफोनची घंटी वाजत होती. अंग चिंब झालं होतं. तो झोपलेला तिथेच वरती दांडीवर वाळत घातलेली पॅण्ट सटकून त्याच्या पोटावर पडलेली. तो उठून बसला. एकामागोमाग एक असे कितीतरी दरवाजे उघडत आत-आत जायचा प्रयत्न होता. रंग नसलेली स्वप्नं होती, होती ती खरोखर घडलेली. भूतकाळात जवळची असणारी ठिकाणं, वास्तू, रस्ते, प्राणी, लोक. त्यात काही नव्याने बनवलेली आणि मागे कित्येक दिवसात दिसलेली ठिकाणं. झोपलेल्या शरीरात स्वत:ची अशी समांतर चालत असणारी गोष्ट. अगदीच समांतर. त्या स्वप्नांत अगदी आतून वाटणारं सुख आणि दु:ख. त्या घेऱ्यात अडकून राहण्याची त्याला झालेली इच्छा आणि एका क्षणात त्या साऱ्या जगांशी आणि जागांशी तुटलेली नाळ आणि आलेली जाग. हे झालं तेव्हा कुणीतरी आपल्याला धरून बाहेर ओढून काढतंय असं वाटलं त्याला. कुणीतरी प्रचंड शक्तीच्या व्यक्तीने बखोट धरून कुणालातरी विहीरीतून खेचून काढावं तसं. प्रचंड तहान लागलेली, त्यानं पाणी घटाघटा पिलं आणि तो दरवाजा उघडून घराबाहेर आला. पाऊस मुसळधार. संध्याकाळ गडद. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ओहोळ आणि कौलारू घरं पावसात चिंब. त्यानं हात पुढे केला आणि पावसाचं पाणी हातावर. ओंजळ केली नि तो तसाच पावसाचं पाणी पिऊ लागला, मघाची तहान शमल्यासारखी वाटत नव्हती. त्यानं तोंडावरून हात फिरवला. घरात आई आहे का याची चाहूल घेतली त्याने, त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला. मग तो निवांत दाराच्या चौकटीवर रेलून पाऊस बघत उभा राहिला. आई काहीतरी छानसं खायला बनवत होती. भजी? त्या वासानं त्याला फार प्रसन्न वाटलं. स्वयंपाकघरात रेडिओ चालू होता. तो स्वयंपाकघरात शिरला आणि आईजवळ जाऊन उभा राहिला. तिनं वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटली, “काय रे तहान लागलीय का?” टेलिफोनची घंटी अजूनही वाजतच होती. त्याचं वीस वर्षांपुर्वीचं आई हयात असतानाचं कोकणातलं घर ठिकठिकाणी गळू लागलं होतं.
पंकज कोपर्डे
२७ जुलै २०१४ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: