रविवार, २७ जुलै, २०१४

स्वप्नदशा


फडफडणाऱ्या डोळ्यांमागे अनंत विश्वं गोठून राहिलेल्या गोष्टी पावसाळी संध्याकाळी बाहेर येऊ लागल्या. चाहूल लागली की, अस्पष्टशा हाका ऐकू येताहेत आणि स्वत:चं भैतिक अस्तित्व विसरून गेलेल्या शरीराला दचकवणारे स्पर्श होताहेत. वीण घट़्ट होती नि अंतर फार होतं. बाहेर पडायचा रस्ता आत शिरणाऱ्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. शेवटी घट़्ट अंधार दिसला नि मिट़्ट डोळे खाडकन उघडले तेव्हा स्थळ-काळाचा संदर्भ पावसासारखाच तोही विसरून गेला होता. जुनाट टेलीफोनची घंटी वाजत होती. अंग चिंब झालं होतं. तो झोपलेला तिथेच वरती दांडीवर वाळत घातलेली पॅण्ट सटकून त्याच्या पोटावर पडलेली. तो उठून बसला. एकामागोमाग एक असे कितीतरी दरवाजे उघडत आत-आत जायचा प्रयत्न होता. रंग नसलेली स्वप्नं होती, होती ती खरोखर घडलेली. भूतकाळात जवळची असणारी ठिकाणं, वास्तू, रस्ते, प्राणी, लोक. त्यात काही नव्याने बनवलेली आणि मागे कित्येक दिवसात दिसलेली ठिकाणं. झोपलेल्या शरीरात स्वत:ची अशी समांतर चालत असणारी गोष्ट. अगदीच समांतर. त्या स्वप्नांत अगदी आतून वाटणारं सुख आणि दु:ख. त्या घेऱ्यात अडकून राहण्याची त्याला झालेली इच्छा आणि एका क्षणात त्या साऱ्या जगांशी आणि जागांशी तुटलेली नाळ आणि आलेली जाग. हे झालं तेव्हा कुणीतरी आपल्याला धरून बाहेर ओढून काढतंय असं वाटलं त्याला. कुणीतरी प्रचंड शक्तीच्या व्यक्तीने बखोट धरून कुणालातरी विहीरीतून खेचून काढावं तसं. प्रचंड तहान लागलेली, त्यानं पाणी घटाघटा पिलं आणि तो दरवाजा उघडून घराबाहेर आला. पाऊस मुसळधार. संध्याकाळ गडद. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ओहोळ आणि कौलारू घरं पावसात चिंब. त्यानं हात पुढे केला आणि पावसाचं पाणी हातावर. ओंजळ केली नि तो तसाच पावसाचं पाणी पिऊ लागला, मघाची तहान शमल्यासारखी वाटत नव्हती. त्यानं तोंडावरून हात फिरवला. घरात आई आहे का याची चाहूल घेतली त्याने, त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला. मग तो निवांत दाराच्या चौकटीवर रेलून पाऊस बघत उभा राहिला. आई काहीतरी छानसं खायला बनवत होती. भजी? त्या वासानं त्याला फार प्रसन्न वाटलं. स्वयंपाकघरात रेडिओ चालू होता. तो स्वयंपाकघरात शिरला आणि आईजवळ जाऊन उभा राहिला. तिनं वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटली, “काय रे तहान लागलीय का?” टेलिफोनची घंटी अजूनही वाजतच होती. त्याचं वीस वर्षांपुर्वीचं आई हयात असतानाचं कोकणातलं घर ठिकठिकाणी गळू लागलं होतं.
पंकज कोपर्डे
२७ जुलै २०१४ 

रविवार, ६ जुलै, २०१४

पाऊस


गुंते सोडवत बसलेल्या मनाला पागोळ्यांत अडकायला होतं. पावसाची चाहूल लागली की धड इकडे ना तिकडे, ते बावरं होऊन धडपडायला लागतं. शरीर मोठं झालं, पण मन नि पाऊस लहानंच उरलेत. लहानपणी संध्याकाळी खेळायला बोलवायला येणाऱ्या मित्रांच्या हाकांकडेच सतत लक्ष असायचं आणि अभ्यासाचं वाचन दिखाव्यापुरतं. ते मित्र संसारात बुडाले. काही तळाला गेले, काही गटांगळ्या खात राहिले. अभ्यासही प्रचंड न संपण्याएवढा, आणि स्वत:च्या उत्कर्षासाठीची कामं, भारताच्या सध्याच्या लोकसंख्ये एवढी. अनंतात विलीन होणारी कमी, जन्मणारी जास्त. संध्याकाळ थोड्या-फार फरकाने बदलली तरी तिच्यावरचा विश्वास ढळला नाही. आजवर ज्या-ज्या ठिकाणी फिरलो, त्या-त्या सर्व ठिकाणी ती स्वत:च असं एक वैश्विक अस्तित्व घेऊन प्रगटली. किर्रर्र जंगलं असो, समुद्र-किनारे असोत, ट्राफिकाळलेले रस्ते असोत, शांत घर असो की कॅफेटेरियातल्या गप्पा असोत. ती सतत तिचं देवीत्व घेऊन पसरली, तास-दीड तास का असेना. मनाला खात राहिली. असण्या-नसण्याचे प्रश्न उपस्थित करत राहिली. लिहायला भाग पाडत राहिली. ती दररोज येत होती, तशी भिती वाटत राहिली की सवयीची तर होऊन जाणार नाही ना? ती दररोज येत राहिली, तरी दररोजच काही प्रश्न, कविता, गाणी, लेख नव्हतो लिहीत मी. काही वेळा वाटलं की सकाळी उठून ब्रश करत बसण्यासारखं आहे हे. फार पुर्वीपासूनच नस्ती सवय लावली, तर आज एक दिवस ब्रश चुकवला तर वाटणारी घाण नस्ती वाटली. लहानपणीही संध्याकाळच्या हाकेला ‘ओ’ नस्ती दिली, तर आज वाटणारी आपुलकी नि प्रेम नस्तं वाटलं कदाचित. पाऊस येतो, तेव्हा पाऊस येतो. एकटाच. संध्याकाळ नुस्ती रंगापुरती मर्यादित राहते किंवा तिच्या नेहमीच्या घडण्याच्या वेळेनुसार इकडे मनात चल-बिचल होत असते, तेवढंच. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा मनाची समाधी भंग पावते. ते त्याच्या मांडी घालून बसलेल्या वैचारिक मुद्रेतून अगदीच कोलमडून जातं. गारठा जाणवतो, गरम चहा-कॉफीची जाणीव होते. खिडकीत उभं राहून कितीतरी वेळ मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं बघत राहतो. तांत्रिकदृष्ट्या पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं पाणी. पण या पाण्यात सोडवायला मन असंख्य गुंते हुडकून काढतं. त्यात आठवणी असतात, जन-माणसांचे प्रश्न असतात, जगाचे प्रश्न असतात, प्राणी-पक्ष्यांचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात. एका अखंड चालणाऱ्या चक्राचा माझं आयुष्य म्हणजे एक मोजताही न येण्याइतका छोटा भाग. किती पावसाळे पाहिले असतील या पॄथ्वीने? माझी झेप ती किती? त्या माझ्या आयुष्यातही, अजून कितीक लहान भाग. भूतकाळाचा पट़्टा, अगदी कालपासून किंवा अगदीच या गेलेल्या सेकंदापासून सुरू झालेला; गल्ल्या-गल्ल्यांतून जाणारा. थोडं मागं वळून पाहिलं तरी आता दिसत नाही, इतका काळोखा. त्यातही पाऊस कोसळणारा. त्या पट़्ट्यावर कित्येक ठिकाणी जवळपास वर्षभराच्या अंतरावर उभ्या असलेल्या माझ्या छब्या आणि थोडा-फार तोच पावसाचा निनाद आणि मनात घोळणारे विचार…मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं, शांत होत चाललेलं जंगल, पागोळ्यांचे आवाज, बेडकांचे आवाज, जोर-जोरात किनाऱ्यावर कोसळणाऱ्या लाटा. संध्याकाळ मनाला फार मोकळं करून सोडते, पाऊस त्यावर आरूढ होतो. संध्याकाळ खेळायला बोलवते, पाऊस त्याला स्तब्ध राहून विचार करायला भाग पाडतो. एरव्ही स्वत:चा विस्तार आणि महत्त्व वाढवत चाललेल्या मनाला, पाऊस स्वत:च जखडून टाकतो. तो परिस्थितींना जखडून टाकतो. मग कधी मी जंगलात अडकतो, कधी समुद्रानं भरत आलेल्या बेटावर, कधी स्वत:च्या छानश्या घरात किंवा कधी कॅफेटेरियात नुक्त्याच प्रेमात पडलेल्या मैत्रिणीबरोबर. पाऊस म्हणतो, मला हवं तोपर्यंत तुझी सोडवणूक नाही!
पंकज कोपर्डे
६ जुलै २०१४

मंगळवार, १ जुलै, २०१४

स्थलांतर


हे कित्येकदा घडलंय की मी किंवा ती लांबच्या प्रवासाला निघतो-अमर्यादित काळासाठी आणि निघताना मन आक्रंदून जातं. भिती दाटून येते. आतल्या आत गलबलतं, तोंडावर फारसं येत नाही. अंगातलं पुरूषी स्वत्व सर्वकाही दाबून टाकायचा अतोनात प्रयत्न करत राहतं. एक अशी सुटी-सुटी भावना उरत नाही. सगळा कल्लोळ माजतो. प्रवास पुढचा सगळा एकट्यानं करायचा असतो. यापुर्वीही सतत एकट्यानंच प्रवास होता; पण प्रवासाला निघण्यापुर्वी तिनं मारलेली मिठी क्षणार्धातच मनाला विरघळून टाकणारी. शरीरानं एकटं असणं अनुभवलंय, पचवलंय कित्येकदा; पण मनानं एकटं असण्यासारखी वेदनादायक गोष्ट नसावी. एकलकोंड्या शरीराला मनानच समजूत घातली होती आजवर परिश्रमाची, प्रसंगांची आणि प्राण जपून ठेवण्याची. मन ज्या-ज्यावेळी एकटं पडलं, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसण्याव्यतिरिक्त विशेष काही करू शकलं नव्हतं.
मैत्रिणीला रस्त्यावर सोडून ज्या-ज्यावेळी प्रवास सुरू होतो, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसून राहतं. तिच्याबरोबर घालवलेल्या वेळात कधी वाटलं नव्हतं-न उलगडणाऱ्या कविता होत्या, तळ्यात-मळ्यातच्या गोष्टी होत्या आणि हट़्टी भांडणांचा पसारा होता. माणूस जवळ असताना किंमत हरवत जाते की काय त्याची? आणि ही मनाला एकटं पाडणारी माणसं, आयुष्यातली खरंच फार-फार महत्त्वाची असतात की काय? असावं-असेल. माझ्या सतत कामांत डुंबलेल्या मनाला एकाकी करून सोडणारी गोष्ट खरंच काहीतरी अतिमहत्त्वाची असावी. प्रवास जरी काही किलोमीटर्सचा असला तरी स्थलांतर फार मोठं होतं. मी माझ्या जगातून खूप-खूप दुरून पुण्यात येतो. ती तिच्या जगातून माझ्याजवळ येते. तुझ्या-माझ्या म्हणत दोघांच्या झालेल्या घरात दोघांच्या बनलेल्या जगात पुढचे कित्येक दिवस जातात. तिथून निघता येत नाही…निसटावं लागतं. त्या प्रेमाच्या वर्तुळात रमलेलं मन मग गटांगळ्या खाऊ लागतं. गाडी सुरू होते, ती हात हलवत राहते, हवा सारवत राहते, तिला डोळे भरून पाहून घेतो. पन्नास किलोमीटर्समधे आणि आठशे किलोमीटर्समधे फारसा काही फरक उरत नाही. पुढच्या भेटी ठरलेल्या नसतात. दोन चिकटलेली आयुष्यं सुटी होऊ लागतात. मन एकटं पडतं. या प्रवासाला सरावलेल्या दगडासारख्या प्रवाशांकडे बघून अजूनच खटटू होतं. अटळ प्रवासाला सुरूवात झालेली असते. निरोप देताना मैत्रिण हात हलवून झटक्यात वळून निघालेली असते. वेडीय ती. डोळ्यातली आसवं दिसू नयेत म्हणून किती काळजी घेते. एकमेकांना समजावणारी मनं दोन दिशांना लांब-लांब जात राहतात. मनाचा गहिवरलेला जड ढग होतो, जांभळसर रंग आभाळभर होतो. हे कित्येकदा घडलंय.
पंकज कोपर्डे
१ जुलै २०१४