दोनेक शब्द ओतावेत नदीमधे,
बघू बरं जातात कुठे दूरवर,
होडीसारखे वाजत-गाजत की,
भिजत-थिजत, गहिवरत, खोलवर.
जाता-जाता एखांदवेळेस,
अडतील, अडकतील, प्लास्टिकमधे,
पांढऱ्याचे होतील काळे-निळे,
खंगत-खरवडत, अद्रुश्य, जलपर्णीमधे!
म्हणून म्हटलं रेखाटू कागदी,
उभ्या-आडव्या रेषा रसाळ,
स्थळ-काळाचा गुंता वहीवर!
उपसून टाकू, मनातला गाळ!
लिहीले एक अक्षर, जाणवला आक्रोश;
नि कळवळ प्रत्येक ओळीला,
झाडांच्या प्रेतांवर केली नक्षी,
चिरचिरत गेला एक दयाळ पक्षी!
घरट्यांची जाण ना तुला,
संसाराची न रम्यता,
मीच माझे मम आणि मला
स्वत:-चीच निव्वळ भव्यता!
माझ्या धरतीची उध्वस्त दशा!
बालकवींचाही ना पत्ता, ना थांग!
पेरलेल्या बियांतून कविता उगवेना;
नदी गं, तू काहीतरी मनातलं सांग!
- - पंकज
कोपर्डे । १० मे २०२६ (Cover art: AI-generated: Gemini)
