बुधवार, ११ मार्च, २०२०

मऊशार


बॉसचा असहाय्य त्रास आणि लागून आलेला लॉंग वीकेंड असा दुग्ध-शर्करा योग आल्यावर सोबतीण म्हणाली, कीक मार गाडीला आणि चल जाऊ दूरदेशा गड्या! गडी काय तयारच एक पाय कीकेवर ठेवून! जाऊ तर जाऊच, फेसाळलेल्या पाण्यात देवमासा बनून, समुद्राची मातीही खाऊ! कसं जायचं, हे ठरलेलं. साधीशी बजाज डिस्कव्हर ११० सीसी. तिला मस्त सर्विसिंग, ऑयलिंग करून आणलं. गुगल मॅप्स उघडून ठिकाणं शोधली, रस्ते पाहिले, स्वत:चे रूटस तयार केले आणि मनातल्या अपुर्वतेच्या कप्प्यात वाटेतल्या गावांची नावे सांभाळून ठेवली. प्रवास पक्क्या-कच्च्या रस्त्यांवरून जरी असला तरी कल्पनेच्या वाटांवरचा; ती गावं निव्वळ पात्रं त्यामधली. एक सोबर पिकची बॅग घेतली; तिला रिकामीच उचलली तशी ती थोराड मोलकरणीसारखी वाटली. धूळ, पाऊस-पाणी, थंडी-वारा, असल्याच तर गाराही झेलून घेईन जिद्दीने आणि पाठ सोडणार नाही गाडीची तुमच्या, असं म्हटली ती. मग म्हटलं, चल गं बाई, तुझ्याशिवाय कुणीच या प्रवासाच्या लायकीचं नाही! डोळे झाकून चिंतन केलंकुठे जाणार, काय करणायं, याची एक अन-एडिटेड चित्रफित डोळ्यांसमोरून फिरवली आणि बॅगेत काय भरायचं हे मला आणि तिलाही सांगितलं. एक बॅग, दोन ऑक्टोपस, एक गाडी, आणि दोन प्रवासी, निघालो प्रवासाला.

प्रवास आम्ही दिवसांमधे आणि किलोमीटर्स मधे तसा मोजला नाही, तो येणाऱ्या दऱ्या-खोऱ्यांमधे आणि झरे आणि नद्यांमधे विणत गेलो. मागच्या काही प्रवासांत झालेल्या पाठीच्या आणि अंगदुखीमुळे पिलीयनच्या भुमिकेत खरं तर मैत्रीणीला जायचं नव्हतं, पण तिला इतर काही पर्याय नव्हता. थांबत-थांबत, आरामात आम्ही निघालो. पुणे ते भोर, पहिला टप्पा. मधे सुंदरसा लागणारा नेकलेस पॉईंट. निरा नदीने घेतलेली वक्राकार फिरकी आणि तिच्या त्या फिरकीवर भाळलेला घाटाचा टप्पा, म्हणजे तो नेकलेस पॉईंट. अतिशय नयनरम्य देखावा, इतरवेळी सहजच हरवून बसलो असतो, पण दिसला आणि मन प्रसन्न झालं. बहुधा बऱ्याच चित्रपटांमधे इथली दृश्य आहेत, बहुधा! भोरकडे जाताना पाण्यानं बहरलेली निरा नदी आणि मग लागणारं भाटघर धरण. पाण्यानं संपन्न प्रदेशातून फिरताना मन तजेलदारच राहणार. त्याहून पुढचं आकर्षण म्हणजे लांब-लचक आणि निर्मनुष्यसा वरंधा घाट. निरा-देवघर धरणाला लागून असलेला घाटाचा रस्ता. मधे सतत ऊन-सावलीचा खेळ, थंडसं वातावरण. दूर-दूरवर अगदीच कुणी नाही. ना गाव, ना घर, ना दुकान, ना पेट्रोल पंप. सकाळी निघतानाच टाकी फुल केलेली असल्यामुळे पेट्रोलची काहीच चिंता नव्हती. निर्मनुष्य रस्ता, तेही जंगलाच्या अंतरंगातून जाणारा, म्हटल्यावर मला अतिशय जास्त हुरूप आलेला.





मजल-दरमजल करत, मधेच एखाद-दुसरा रस्ता चुकत शेवटी दापोलीच्या रस्त्यावर लागलो. ऊन डोक्यावर आलं तसं, खेड रस्त्यावर माजलेकरांकडे जेवण केलं आणि ऊन्हाचे चटके खात, आमचं ओयो शोधत-शोधत मुरूडच्या बीचजवळ पोहोचलो. खरं कोकणातल्या समुद्रकिनारी ओय़ोमधे रहाणं म्हणजे मुर्खपणाचंच लक्षण, अशी ञानप्राप्ती अचानकच झाली आम्हाला! मग काय? ते ओयो दिलं झटकून आणि शोधलं एक छानसं कॉटेज. बस्तान माडलं आणि रात्र होण्याची वाट पाहिली. रात्रीच्या अंधारात, समोर सुंदरसा आणि स्वच्छसा मुरूडचा किनारा, पौर्णिमेकडे झुकलेला चंद्र, आणि दोन थकले-भागलेले जीव चटईवरती आडवे पडून आकाश निरखत असलेले दिसले. आकाशात प्रतिबिंबही दिसतं स्वत:चं कधी-कधी, सप्तर्षी आणि ध्रुवतारा व्यतिरिक्तही! तुटत्या ताऱ्याला पाहण्याच्या आशेत सखी आकाश निरखत बसलेली आणि मी असंख्य ताऱ्यांना जोडून झेनटँगल करण्याच्या प्रयत्नात. “What are the odds? की या क्षणी आपण या वेळेस, आकाशाच्या इतकुश्या तुकड्याकडे बघत बसलोय जाड भिंगांच्या चष्म्यातून आणि आपल्याला वाटतंय की एखादा निखळणारा तारा दिसेल आणि तो कैक प्रकाशवर्षे दूर बसलेल्या बिनकामाच्या दोन व्यक्तींच्या मनातल्या (मनातल्या बरं का!) इच्छा पुर्ण करेल!” सखीने दाखवलं एक शेळपट लाल दिवे मिचमिचवणारं बेकार विमान आणि म्हटली, “ते बघ तो तुटता तारा! Assume की हाच आहे तो तुटता तारा आणि माग तुला जे हवं ते!” काय तो थोर विचार! पण looking at odds, म्हटलं, हे तर हे सही. नशिबाला दोष देत आणि स्वत:लाच कमी लेखत का जगावं? लेखक म्हणून विमानालाच तुटता तारा बनवावं. ठीकंय. मागितलं, “Let this be forever! हा क्षण आहे तसाच राहो!” आणि दिसला जी तुटता तारा!!! कधी मी नि तिनेही पाहिलेला. त्या सेकंदभरात, कुठली मागू आम्ही इच्छा? त्या अवाढव्य ताऱ्याच्या चितेवरती स्वत:च्या इच्छा भाजण्याचं धैर्य आणि जाणही नाही आमच्यात! निखळला तारा, पण जुळवल्या त्यानं मनाच्या तारा!

मुरूड, कर्दे, अंजर्ले करत आम्ही बाणकोटमार्गे वेळासला पोहोचलो. समुद्रकिनारी वाळूवरती अनवाणी पायांनी चालण्यात जी मजा आहे तिला तोड नाही, सखीनेच शिकवलं. काही वर्षांपुर्वी चांदोलीच्या राम नदीमधे पाण्यात पाय सोडून बसलेलो, बहुधा याच वेळेस, आणि ते जे निखळ सुख होतं ते पुन्हा कधी प्राप्त नाही झालं. त्या पाण्यात गाणी होती, त्याच्याएवढीच तिही जुनी होती! मुरूडच्या आणि अंजर्लेच्या किनाऱ्यावर चालताना, मऊ वाळूत उमटणारी पावलं आणि वाळूचा थंडसर सुखद स्पर्श वेडावून टाकणारा. दोन्ही किनाऱ्यांवरती ऑलिव्ह रिडले कासवं घरटी बनवतात. त्यात अंडी टाकतात. कासव मादी मैलोनमैल प्रवास करून या किनाऱ्यांवरती येते, रात्रीत खड़्डा खोदून अंडी टाकते, खड़्डा बुजवते आणि समुद्रात विलीन होते. त्याच किनाऱ्यांवर बिनडोक्याच्यी पोरं बाईक्स आणि कार्स चालवताना पण दिसली आणि आपण आपल्या निर्बुद्धपणाची लक्तरं कशी जगभर घेऊन फिरतो याचं अप्रूप वाटलं. माझ्या कित्येक प्रवासांत बिनडोक्याचे पर्यटक हेच खरे निसर्गाचे विध्वसंक आहेत, हे सतत पटत आलंय.





बाणकोटचा किल्ला असा-तसाच आहे, पण तो जिथं उभा आहे, तिथून कुठे-कुठे नजर पोहोचते काय सांगू? मस्त सड्यावर उभा आहे. दापोली सोडल्यापासून पेट्रोल मिळालेच नाही कुठे, त्यामुळे पेट्रोलच्या शोधात बरंच अंतर कापलं. बऱ्याच चौकशीअंती बाणकोटच्याच किल्ल्यावर शिवकालीन पेट्रोलचे भंडार आहे, असे बऱ्याच लोकांनी सांगितले. त्याच्या शोधाअंती घबाड सापडलं, पण तेही एक निव्वळ लीटरभर आणि बिसलरीच्या बाटलीत. ‘हर हर महादेवम्हणत टाकीला त्या पेट्रोलचा अभिषेक घातला आणि वेळासच्या वाटेला लागलो. वेळासची वाट फारच लोभस. उजव्या बाजूला खडकाळ किनाऱ्याचा समुद्र आणि डाव्या बाजूला टोलेजंग पर्वत. त्या रस्त्यावरच दहा फेऱ्या माराव्यात आणि जीवनाचं सार्थक करावं, इतका सुंदर रस्ता. आम्ही पोहोचलो त्यादिवशी सकाळीच ऑलिव्ह रिडलेची २१ पिल्ले वन-विभाग, सह्याद्री मित्र मंडळ आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने समुद्रात सोडली होती. अंजर्ले-वेळासमधे दरवर्षी मार्च-एप्रिल दरम्यान टर्टल फेस्टिव्हल असतो. शाश्वत पर्यटनाचे उत्तम मॉडेल, म्हणजे हा उत्सव. आम्ही वेळासला जास्त वेळ थांबू शकलो नाही, पण त्या लोभस रस्त्याला फ्लाईंग किस देत, वेसवीच्या जेट्टीवर जाऊन फेरीची वाट बघत थांबलो. निवांत ती फेरी आली, तिच्यात बाईक चढवली आणि त्या फेरीने आम्हाला बागमांडलाच्या जेट्टीवर सोडले. बागमांडलाच्या त्या जेटटीवर मग आम्ही पुढचा खेळ मांडला.


बागमांडलाहून आम्ही गेलो हरिहरेश्वरला. कर्दे, मुरूड, अंजर्ले, वेळास सारखे सुंदर किनारे पाहून आल्यावर हरिहरेश्वरच्या कमर्शियल किनाऱ्यावर जाण्याची इच्छाच झाली नाही. किनाऱ्याकाठचं महादेव मंदिर, किनाऱ्यावर प्लास्टिक अस्ताव्यस्त, प्लास्टिक सारखीच लोकंही, आणि जवळच्या एका किनाऱ्यावरती सुरूच्या बनात दारू पीत बसलेले सुजाण नागरिक. हरिहरेश्वरला मोबाईल फोनला नेटवर्क आलं आणि आपण मनुष्यजातीजवळ पोहोचलो म्हणजे प्रदुषण असणारच असा शोध लागला. हरिहरेश्वरला अति-प्रचंड होळी पाहिली. तिच्ह्याभोवती काही मंत्र पुटपुटले गेले, तिला पेटवण्यात आलं, आणि लोकं निघून गेले. इवलालं रान जळलं आणि त्याचं मरणं आम्ही सर्वांनी enjoy केलं. हरिहरेश्वर आम्ही सकाळी लवकरच सोडलं आणि मस्त माणगाव-ताम्हिणी-पौड मार्गे पुण्यात दाखल झालो. एक लांबचा प्रवास संपला. काही फोटोज काढलेले; सखीने काही व्हिडीओज काढलेले. ती म्हटली, लिही तू काही. लिहीणार नाही, असं होणार नाही.

२०२० सालातला हा प्रवास पुन्हा कधी घडेल, मला माहिती नाही. मला जे वाटलं, जाणवलं, ते पुन्हा कुणाला जाणवेल, ते ही ठाऊक नाही. मला आणि सखीला दिसलेला तुटता तारा आणि त्याच्याकडे मागितलेलं वरदान, ते ही खरं ठरेल की नाही, हे ही काळच सांगेल. आज मी हे लिहीतोय, आजही बहुतेक मुरूडची रेती मऊशार थंडगार असेल; आजही रात्रीत एखादी कासवीण् अंडे टाकायला अंजर्ल्याला उतरेल; आजही बाणकोटचा किल्ला निखळता महाराजांच्या आठवणीत समुद्रावर लक्ष ठेऊन असेल; आणि आजही एखादं चुकार जोडपं तुटत्या ताऱ्याच्या शोधात आकाश निरखत असेल, आणि म्हणत असेल “Let this be forever! हा क्षण असाच राहो!”

तथास्तू!” म्हणत पुण्याच्या आमच्या इवल्याशा घरट्यातून आम्ही दोघे पौर्णिमेचा पिवळसर चंद्र बघत उभे असू!      
पंकज
११ मार्च २०२०

बाईक ट्रिपचा दिनांक: -१० मार्च २०२० (६०० किलोमीटर्स पुणेदापोलीमुरूडअंजर्लेवेळासहरिहरेश्वर पुणे बाईक: बजाज डिस्कव्हर ११० सीसी)

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

ठेवण



सांडलेल्या थेंबांतून कुरणं फुलताना
फुललेल्या कुरणांतून पिंगाण्यांचे गाणे;
नि आकाश पिवळसर करून भिंगोऱ्यांचा नाच
तेव्हा तू, मी, आपण, कधीच नव्हतो!

स्वर्गतुल्य पृथ्वी करून संपलेलं चित्र एखादं
आणि कड्या-कपाऱ्यांत कुठे रंग भरायला
ओढ्या-नाल्यांना काजळ लावायला
तू गेलीस तेव्हा काठावर उरली सावली!

आपण आपले करत गेलो आणि उरला अंधार
दिवस संपला की झाला सुरू, नकळत असा
उरणारा एक उसासा, इथून टाकला
कुरणांत कुरळ्या गवतांत अडकून बसला!


पंकज
१६ ऑक्टोबर २०१९

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

Amazon

यावेळी मात्र तिचे अवयव कापले,
उरलं-सुरलं धडही झाडावर टांगले,
थेंब-थेंब गळून रक्तही साकाळले,
मग एकदाची लावली आग!

ती माझी नव्हती कधीच,
त्याचाही होताच राग,
हक्क पण सांगेन निर्लज्जपणे,
करेन मनोसक्त बलात्कार!

तिच्या काळया-हिरव्या अंगावरती
हजारो मांडली दुकाने बिनधास्त
त्यात चिरडले, मारले, गाडले
पक्षी-प्राणी, झाडं आणि सारेच सगे!

ती तीन आठवडे पेटवूनही
अजून जिवंत कशी?
मी जिंकलो की मी हरलो
हे सांगायलाही नाही माझी आई!
पंकज कोपर्डे 
(२५ ऑगस्ट २०१९)


शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

कविता



तुझ्या चांगल्या वाईट सवयींचा ठिकाणा हळूवार हरवत चालल्यासारखा होत असताना, मी आताशा घराचे दार उघडून आत पाय ठेवला तर हवेचा थर तिथल्या तिथे. हालचाल नाही, रंग नाहीसे. अंधाऱ्या रात्री, मिणमिणत्या प्रकाशात, गच्च पावसात, आभाळ उतरण्याची वाट पाहत आडोश्याला बसलेल्या साठीच्या तेलकट चेहऱ्याच्या माणसासारखं घर बसलेलं असतं, गच्चीतून तोंड काढून रस्त्याकडे बघत…तुझी वाट बघत!

मी गाडीच्या चाव्या खिळ्याला अडकवतो, खिशातलं पाकीट ड्रॉवरवर मधे ठेवतो. खांद्यावरचं ओझं खुर्चीवर ठेवतो आणि गच्चीत येऊन उभा राहतो. सात किंवा असे काहीतरी वाजलेले असतात. लोकं दिसतात…घरा-घरांत खुर्च्यांवर बसलेली, बसवलेली; चहा पिणारी; टिव्ही बघणारी; येणारी-जाणारी; चित्रातल्यासारखी. तू नाहीस दिसत. घर घरात जाऊन बसून घेतं, करायला विशेष काहीसं नाही!

थोडं बसावं, एक-दोघांना फोन करून उगाच त्रास द्यावा, कामाचं बोलावं. करमेनासं होतं. पक्षी आढळत नाहीत, भिंतींवर अडकवलेले तुझे-माझे फोटोजही बोलत नाहीत. तुझी आठवण येत नाही, त्रास होतो. घरातल्या फरश्या दररोज मोजल्या तरी तेवढ्याच राहतात आणि तू असताना घर कसं एकदम छोटंसं वाटतं तेही उमगत नाही! मी घर आवरून ठेवतो. तुला चांगलं वाटेलंसं ठेवतो.

पाऊस थांबल्यासारखा साठीचा म्हातारा, माझ्याजवळ येऊन बसतो. आम्ही एकमेकांकडे बघतो. मी आम्हा दोघांच्या पेल्यात मद्याचे पेग भरतो, चिअर्स करत नाही, निमित्त नसतं. घरातला प्रकाश मंदावतो, मी नोराह जोन्सची गाणी लावतो. आम्ही दोघेही पुन्हा गच्चीत जाऊन उभे राहतो, तोच तो रस्ता बघतो, आकाशात चंद्र चढलेला असतो. घराला एक आणि मला एक दीड-फुटाची फरशी एवढीच गरज उरते…बाकी उरतो तो निव्वळ पसारा!

तुझी वाट पाहणारा पंकज
१७ ऑगस्ट २०१९



बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

डास

गोष्ट लिहायला लागलो तेव्हा मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही. एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त! एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं. ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही. ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!  

शनिवार, २४ मार्च, २०१८

पानगळ

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला.
पाचोळ्याचा आवाज
दऱ्या-दऱ्यांमधून
घुमतो केविलवाणा!

झळा उन्हाच्या
करपवत जातात
उरला-सुरला चारा.
विचारांची गुरं-ढोरं
दुष्काळ नसून
असल्यासारखी!

पायवाटा झाकलेल्या
बोडके डोंगर
पिवळसर धरती.
झरे आटलेले
हळद्याच्या गाण्यात
माझेच स्वगत!

तळपत्या उन्हात
वणवा पेटतो एखादा
भस्मसात क्षणात!
तू नसताना
नाही थंड वारा
फुलांच्या गारा!

तू नसताना
पळस उगाच फुललेली
सावर लाले-लाल!
तू नसताना
शुष्क ओढ्याकाठी
रातवी पौर्णिमा!

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला
ये ना अशी इकडे
ऋतू-बदल
अधीर मनाला!

- पंकज (०८.०३.२०१८)