बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

Ph.D.

मानवाचा मागचा पाच-दहा वर्षांचा इतिहास चाळला तर कित्येक विद़्यावाचस्पती खितपत पडलेले आढळून येतील. त्यासाऱ्यांना दंडवत घालून एखादा प्रबंध लिहावा अशी उडती लहर मनाला चुंबून कित्येकदा गेलीय, पण संशोधनातून विशेष वेळ काढता आला नाही. आज सहज आठवण आली की आपला Academic Curve आणि आयुष्याची linearity यांचा काही मेळ आपल्याला घालता आला नाही. त्यामुळे सहज स्वत:चा इतिहास बघून त्यावरून इतरांची टर उडवावी असे वाटले.

म्हणजे खरंच Ph.D.! नाही, लिहीले बरेच Chapters, पण वाटत राहिलं अर्धवट राहतंय हे काम. कधी रात्री स्वप्नात येत राहिलं की एक अकेला यात्री उंचावर पडतोय खोलात…अंधारलेल्या खोलात. त्याला तळ नाही, वेळेचे त्यात भान नाही. सर्वच मिती एकत्र येऊन झाल्यासारखा कल्लोळ ज्याला सांगण्यासाठी विशेष आता मला वेळ नाही. पण एक चित्र आणि ते एकच चित्र सतत लूपमधे असल्यासारखं. त्यात ईंग्लिश, मराठी अक्षरं आणि विविध आकार, विचार माणूस म्हणून उभे घोळक्याने. त्यातही तो एक Data नावाचा माणूस नकारार्थी मान हलवत उभा. हे ते स्वप्नं आणि त्याची कित्येक पड्लेली आवर्तनं. प्रत्येक आवर्तनाचा रंग गडद, कधी काळा, निळा, जांभळा, किरमिजी किंवा राखाडी, पण गडद. आणि तो Data म्हणून कधी बिन्याचेहऱ्याचा व्यक्ती; कधी मी किंवा ती (स्वप्नातली); कधी संत तुकाराम हातात विणा घेऊन उभे; कधी बाळ एक cuteसं; तर कधी एखादा काळा वाघ. पण सगळेच Data आणि मान हलवत सांगणारे – “कमी पडतोय!”

लोकांच्या स्वप्नात पऱ्या, अप्सरा येतात आणि इथे आलेला Data. मग उठल्यावरचं ते वाटणं की आज होईल काही खास. आज एखादी पायरी जाणार आपण पुढे किंवा काहीतरी legendary होणारंय आज. मग ते मनभरून Dataमधे गुंतून जाणं. कधी स्क्रीनवरून फिल्डवर, तर कधी फिल्डवरून स्क्रीनवर visualize करणं. जगात याहून काय भारी असेल गडे? झपाटलेपण काय असतं? हेच तर असतं. मेंदू ज्यावेळी म्हणतो रात्र झाली झोप आता, तेव्हा एखादं घुबड गातं आणि मग शरीर सुसाट सुटतं. अंधार चिरत, कान सावध होतात आणि जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत चलबिचल. मग वाट्तं याच्यासाठीच तर केला सारा अट्टाहास. कधी कुणी हिमालयातल्या नद्यांमधले दगड-गोटे चाळत बसतं आणि कित्येक तास दररोज त्या दगड-गोट्य़ांची मापं घेत राहतं तेव्हा जग त्याला येड्यांमधे काढणार नाही तर काय? त्याला खरंच पडलेली नसते नद्याबाहेरच्या गोट्य़ांची! जगण्याची ही नशा ज्यावेळी गरज व्हायला लागते तेव्हा मात्र ते सुंदर जग कोलमडायला लागतं आणि एक ना एक दिवस पैसा दण़कन जमिनीवर आपटतो. आणि मग सुरू होतो खेळ सावल्यांचा…

खरं Ph.D. करणं अशी काही आयुष्याची requirement नव्हतीच मुळी, पण छोटे सुंदर प्रश्न सोडवताना ती आपसूकच होऊन गेली. आणि झाली ती पण रडत-खडत, शिव्या देत तर अजिबात नाही. ती आली, तेव्हा अदबीने जवळ बसली. म्हट्ली, करायला तर बरंच काही आहे, पण तुला शक्य असेल तेच तू कर. मी नाराज नाही होणार! तू घेतोहेस ना जबाबदारी, मग तूच कर पुर्ण. मी आहे इथेच, जात नाही कुठे. तुला सोडून तर नक्कीच नाही. Take your time, but don’t forget, I am waiting for you! आता इतकं intimate conversation झाल्यानंतर का बरं असं वाटावं की तिला सोडून देऊ मी! तर ती यथा-अवकाश झाली. ती सुंदर, रूबाबदार, चांगल्या घरची आणि मोहक अशी झाली. कुणी तिला नावे ठेवली नाहीत ना कुणी तिच्याबाबतीत कधी आकस केला. जागतिक पातळीवरती शास्त्रञांनी अदबीनं दखल घेतली तिची आणि योग्य ती विचारपूसही केली. एक भलंमोठं पुस्तक लिहीलं आणि तिची पाठवण केली. ज्यादिवशी ती लायब्ररीच्या कुण्या कोण्यात गडप झाली तेव्हा असं वाटलं खांद़्यावरती “डॉक्टरेट” नावाचे दोन इवलाले पंख आलेत आणि जमिनीपासून एखाद-दुसरा इंच एक दिवस तरी अंधांतरी होता येईल एवढी ताकद त्या पंखांमधे साठवलीय.

त्या दिवसापासून जग वेगळं दिसू लागलं. नविन चष्मा घातल्यासारखं. बऱ्याच वर्षांच्या झोपेतून कुंभकर्ण उठायचा त्यावेळी त्याला जसं वाटत असेल, अगदी तसंच. आपलं जग मागचे पाचेक वर्षं बरंच संकुचित झालं होतं याची जाणीव उगाच बोचरी वाटायची. पण मग एखादा दरवाजा उघडून पुन्हा त्या PhDच्या पेटीत जाऊन बसावं असंही वाटायचं. ती पेटी किती ऊबदार. तिथं सगळं माहितीतलं, आपलं-आपलंस, प्रेमळ आणि एक ती नेहमीची पायवाट जंगलात नेणारी. त्या पायवाटेवरती दोन-चार ठिकाणी ती माहितीतली घुबडं. जरा कुठें हालचाल दिसली की जवळ येऊन मान डॊलवत बसणारी. पायवाटॆला समांतर ती नागमोडी नदी, आड्वी-तिडवी, तिच्या स्वत:च्या राज्यात. त्या नदीत कुठे एक तो गोटॆ मोजत बसलेला. मग पायवाट थोडी पुढे जाते, तर ती मोठ्ठाली मोहाची झाडं आणि त्यांच्याभोवती गुंजारव करणाऱ्या पक्षी-प्राण्य़ांच्या आठवणी. तशीच ती वाट घेऊन जाणारी लॅबमधे आणि तिथला रस्ता पुढे घराकडे. काही फुटलेले वेडे-वाकडे रस्ते, ते त्या-त्या आठवणींकडे, अपघातांकडे, आघातांकडे! पैश्यांकडॆ नेणारा रस्ता पेटीच्या नाही आतमधे!

ती पेटी उघडून बाहेर आलं तर डोळे दिपावे एवढा प्रकाश. लोकंच लोक, धावपळ, धूळ, कचरा, आणि हेतूहीन वर्दळ. खांद्यावरचे इवलाले पंख कोमेजून झिरपून गेले. एक भलामोठा रस्ता postdoc कडे नेणारा, पण पाय तिथे आपसूक वळेना. वाटतं हा highway पुढे जाऊन नष्ट होतो का कुणास ठाऊक? वाट्तं गेली ती मागची मुग्ध वर्षं पण आता खिसाही आहे रिकामा. मेंदू म्हणतो, वर्षभराचं contract. नविन देश बघ, पैसा कमव, ऐश कर. मग आहेच नविन उडी, एका वर्तुळातनं दुसऱ्या. आणि मग तिसऱ्या. काय त्याला. हजारो करतात. तू ही कर. हो! फक्त या चक्रव्यूहात अडकून बसू नको. उडत रहा, सतर्क रहा, applications चे बाण मारत रहा.  

वाट्तं की त्या पेटीवरतीच बसून रहावं का? पण मग भूक लागते, ऊन लागतं, तहान लागते, मन लागत नाही. वाट्तं या समोरच्या रस्त्याला समांतर असेल का एखादी पायवाट, जाईन त्यावरून. हो लागतील काटे आणि ठेचा, पण बहुधा गर्द असेल झाडी तिवर. वाटतं, बनवावी का एखादी अशीच नविन पेटी मोठ्ठाली आणि मारावी उडी त्यात आणि स्वप्नासारखंच जात रहावं खोलवर-खोलवर. तिथली रात्रतरी घेईल कुशीत आणि म्हणेल, तू माझा आहेस आणि या जगातलं सगळंच तुझं आहे. तू शोधत रहा, तू चालत रहा, तू विलक्षण माझ्या गर्भात पोहत रहा. तू फक्त तुझा रहा आणि पायवाट तुझी नवी बनवत रहा. I am here to stay…     

पंकज कोपर्डे । ०४ ऑक्टोबर २०२३ 




 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

कथा

 नखाने खरवडत आतापर्यंत अर्धा चंद्र तरी झाला असेल टेबलावरती. एक खट्याळ बट अगदी गालापर्यंत आलेली आणि उनाड वाऱ्यावर झुलणारी. ती अगदी विचारांच्या ग्लानीत गेल्यासारखी बसलेली; गुलमोहराच्या झाडासारखी, फुलांच्या ताटव्यांनी भरलेली! तिचा आयुष्याचा प्रवास मागच्या पानांत हुडकत असावी अथवा हातातल्या पुस्तकात वाचत असावी. तशा त्या ईंग्लिश पुस्तकाला विशेष कथा नव्हती, पात्रं नव्हती, आणि जिव्हाळा वाटावा अशी नाती नव्हती. लांबसडक नाकावरचा चष्मा नीटसा करत ती एकटक एखाद्या मातकट पानाकडे पहायची आणि सहा सेकंदाचा द्दीर्घश्वास घेऊन पान उलटायची. कथा नाव होतं तिचं आणि तिच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याएवढं साधं-सोप्पं नव्हतं.

कॅफेच्या काचेच्या दरवाज्यात उभं राहून मणूर तिच्याकडे पाहत राहिला आणि आत जाऊ की नको या विवंचनेत तिथेच घुटमळत राहिला. कथा…अथांग समुद्रासारखी. तिचं आयुष्य म्हणजे एका कुपीत जपून ठेवलेल्या गुपीतासारखं पण मणूरपुढे ती पुर्णपणे मोकळी झालेली. सडपातळ बांधा. उंच, सुरेख, चुणचुणीत तिशीतली मुलगी, सध्या आखीव-रेखीव जीवन जगणारी. अगदी काही महिन्यांपुर्वीच कित्येक दिव्यांतून निसटलेली आणि अजूनही विश्वास बसत नाही की ही कशी जिवंत राहिली. मणूर तसा तिचा लहानपणीचा मित्र. कित्येक वर्ष मित्र म्हणूनच राहिलेला कथाबरोबर. मित्र म्हणूनच जन्मला, वाढला, वेळोवेळी सांभाळला गेला. पण अशा एका वेडसर धुंद रात्री, ज्यावेळी कथाला वाटलं, त्यावेळी मणूर तिचा झाला. ती रात्र उलटूनही होऊन गेलेले दोनेक महिने; पण मणूरच्या मनातल्या शंका शमता न शमलेल्या.

कथा दिसायला सुंदर देखणी. तिचे मनमोहक डोळे आणि नजाकतभरी मान, मणूरने कित्येकदा हरवले होते भान. ती त्याला हवी होती, पण अशी नको. कथाच्या स्वभावाचा थांग काही मणूरला लागला नव्हता, एवढ्या वर्षांनंतरही! मणूर तिच्याजवळ असूनही तिला कधी समजू शकला नव्हता. कथा त्याला अशी नको हवी होती. कथा होती कशी? कथा जशी कुणी लिहीत जाईल तशी प्रगट व्हायची. तिच्या वेळेला काही थांग नव्हता, ना तिच्या विचारांना लगाम. ती हवी तशी, हवे तिथे जायची; बघायची, अनुभवायची आणि बऱ्याचदा अड्चणीत पण यायची. तिच्या अशाच हेकेखोर आणि हट़्टी स्वभावाचा मणूरला तिटकारा यायचा. कथा जगातले सर्वच अनुभव घेण्यासाठी आतुर होती आणि सतत म्हणतही रहायची.

कथाचा फोन वाजला. मणूरने काचेतूनच पाहिले. ती थोडावेळ फोनकडे एकटक पाहत बसली. विचार करत असेल, घेऊ की नको. मणूर आज तिला कॅफेमधे त्याचा निर्णय सांगणार होता. हे असेच चालू राहणार की आपण दोघे काहीतरी एकदाचं ठरवू…एकत्र राहू, किंवा तुटून जाऊ. कथाने तो फोन उचचला. ती बोलली. मणूर दरवाजा ढकलून आत आला. त्याची आणि तिची नजरानजर झाली. तिच्या नाजूक डोळ्यांत पाणी साचलेलं. एक थेंब डाव्या गालावरून कणभर मस्कारा घेऊन सुसाट आदळलाही मातकट पानावर. मणूरने नजरेने नाही म्हटले आणि त्याने तशीच पाठ फिरवली. “कथा, काय झाले? बोलत का नाही? मणूरचेच आहे ना बाळ?” कथाची मैत्रिण शेफ़ाली फोनच्या पलीकडून विचारत राहिली. कथा मुकी झाली. कधी कुणाच्या रेघोट्या अंगावर ओढून घेतल्या आणि अंग नि अंग स्वाधीन दिलं कुणाला हे तिला अजूनही आठवलं नव्हतं. तिला मणूर लांब जाताना तेवढा दिसत राहिला मात्र!

कथा इथेच संपली.

पंकज कोपर्डे । ३ ओक्टोबर २०२३ 
 


   
 

बुधवार, १२ मे, २०२१

ओम कॅफे

एका कुंद खोलीत, थंडी शिरायचा प्रयत्न करत असते आणि बर्फाळलेल्या पर्वतांमध्ये वसलेलं छोटंसं गाव स्वत:चं अस्तित्व टिकवायच्या प्रयत्नात असतं. पावसानं झोडपलेली घरं आणि आयुष्यानं झपाटलेली लोकं त्या कुंद खोलीत शिरण्यासाठी उत्सुक असतात. वेळ आल्याशिवाय कुणी जात नाही अशा खोल्यांमध्ये! मी तिथे सताड बसलेलो. माझ्या समोर बॉब मार्लेची तीन पेंटिंग्ज, त्यातलं एक अर्धवट सोडलेलं; कंटाळा आला असेल किंवा काही अनुभूती झाली असेल! माझ्यासमोर मंडालाची चक्रं. दोन-चार किंवा तुम्ही मोजू शकाल तेव्हढी! एकात एक गुंतलेल्या विश्वांची झालेली vision असेल किंवा हात वळला असेल तसे चित्र रंगले असेल. समोरच्या भिंतीवर दोन-चार फ्रेम्स फॅब्रिक पेंटिंग्जच्या. एका कापडावर मंडाला, दुसऱ्यावर शंकराचे मानवी आकारातले चित्र. त्यात तो डोळे मिटून बसलेला, दोन्ही हातांनी आशिर्वाद वाटत. या शंकराला औरा नाही, त्या चित्रात काळा background. काळा रंग अंधाराचा, भयाचा, शक्यता-अशक्यतांचा, आणि काहीच नसण्याचा! भिंतीवरती एका मोठ्या वर्तुळात पर्वत-नदी-जहाज-झाडं रंगवलेली. ती जहाज पर्वतांच्या पायथ्याला विसावलेली आणि नदी कुठे रूसत-फुगत वाहत चाललेली. भिंतींना पिवळा रंग सुर्याचा. काही टेबल खुर्च्या, काही भारतीय बैठकीची arrangement.

त्या कुंद खोलीत, सुंदरसा मंद प्रकाश. थोडासा पिवळसर, थोडा निळा. त्या कुंद खोलीच्या विशाल खिडक्यांतून आजूबाजूचे दिसणारे देवदार ल्यालेले डोंगर आणि त्यात लपलेली रंगीबेरंगी घरं आणि जीवजंतू, त्यांचे आवाज, त्यांचं एक अनोखं जग! त्या काचेकडे दोनेक क्षण बघितलं की त्या कुंद खोलीतलेच दिवे दिसतात. नजर थोडी स्थिरावली की त्या बाहेरचं जग जवळ येतंय असं वाटतं. त्या खोलीत एक अनामिक ऊब. संध्याकाळ जवळ येते, तशी त्या कुंद खोलीत लोकांची वर्दळ वाढू लागते. थंडीपासून आणि जगापासून आसरा शोधायला आलेली लोकं, सगळी एकसारखीच दिसतात. काही अलिप्त राहतात, काही गर्दीत मिसळूनच आलेली असतात.

समोरच्या गादीवर एक गिटारिस्ट येऊन बसतो. हसून तो म्हणतो मी music explore करतोय. तो त्याची बैठक बसवायच्या प्रयत्नात. चार-पाच वेळेस मांडी घालून पुन्हा सोडवतो. त्याला त्याची ती बैठक बसतीय व्यवस्थित असं वाटत नाही. काहीतरी missing आहे. मग तो ती गिटार बाजूला ठेवून निवांत सिगारेट्मधली थोडी टोबॅको बाजूला काढून त्यावर हवी ती process करून मस्तपैकी joint बनवतो. तो शिलगावतो, डोळे बंद करतो आणि music explore करायचा प्रयत्न करू लागतो. काही वेळातच त्याला काहीएक अनुभूती होते. मग तो ती गिटार आपुलकीनं जवळ घेतो. तिला जरा कुरवाळतो, तीन-चार तारांवरून हात फिरवतो. मग त्याला काहीतरी जाणवतं आणि तो अचानकच मोठ्याने गायला लागतो. पाचेक सेकंद आणि पुन्हा थांबतो. मग तो पुढे ठेवलेल्या लॅपटॉपवर एक सुंदरसं गाणं वाजवतो आणि मनातल्या मनात ते गाणं कसं वाजवायचं ते विचार करत राहतो.

एकीकडे लोकं येत राहतात; कुंद खोलीबाहेरचा प्रकाश कमी होत राहतो, आतली ऊब वाढू लागते. दिवसभर काम करून थकलेली लोकं त्या कुंद खोलीत आनंद, entertainment, आणि प्रेमाच्या शोधात जमा होऊ लागतात. मग काहीजण त्या गिटारिस्ट्जवळ बैठक बसवतात. काही joint साठी बसतात, काही निव्वळ गाणं ऐकण्यासाठी. मग तो गिटारिस्ट त्याच्या लॅपटॉपवरती एक गाणं वाजवत त्यावर स्वत:चं गाणं वाजवू लागतो. दु:खाचं गाणं असतं पण melodious असतं खरं. त्या गाण्यामधल्या गिटारिस्टची प्रेयसी त्याला सोडून दूरवर गेलेली असते. त्या दोघांचं एक सुंदरसं घर असतं, जग असतं. पहिल्या कडव्यात तो स्वत:चं दु: प्रगट करतो आणि एवढंच कळतं की या दु:खाला एक आनंदाची किनार आहे नाहीतर गाणं काय एवढं सुंदर वाटलं नसतं. त्या कडव्याभरात मी ही पायाने ठेका धरतो आणि त्या मंडालाच्या चक्रांमध्ये शिरू लागतो.

कुंद खोलीमध्ये धूर घुमू लागतो. ऊब अजूनच वाढू लागते. आता खोलीतलं वातावरण वेगळाच मूड धारण करतं. Joints ची थोटूकं टेबला-टेबलावर पडू लागतात. हसण्या-खिदळण्याचा tempo वाढू लागतो. कुणी मध्येच उठून फोन आला म्हणून खोलीबाहेर थंडीत जाऊन थांबू लागतो, काही पोकळ बसलेले असतात, मंडालांमध्ये गुंतलेले असतात. प्रत्येकाचाच प्रवास सुरू झालेला असतो, काही लोक हवेत उडत असतात, काही खड्ड्यांत रूतत असतात. कुणी रडू लागतं, कुणी हसत राहतं, कुणी (मी) मुर्खासारखं लॅपटॉपवर लिहीत राहतं. लोकांची जगं, त्यांची मतं, आणि त्यांची अस्तित्वं एकमेकांना घासून जातात; कधी अगदीच एकमेकांवर लोळतात.

गिटारिस्ट दु:खाचं गाणं आळवत राहतो. त्यावर काही लोक ठेका धरून नाचू लागतात. दुसऱ्या कडव्यामध्ये गाण्यातला गायक म्हणतो की त्याची प्रेयसी एक आर्टिस्ट होती आणि ती सुंदर पेंटिंग्ज काढायची. तिच्या हातात जादू होती, त्या जादूच्या प्रेमात तो गायक होता. तिच्या विचारांची मंडलं आणि त्यांची आवर्तनं यांत तो इतका गुंतला की त्याचं आयुष्य एक खेळणं होऊन राहिलं. त्याची प्रेयसी दुसऱ्या विश्वातून आलेली, आणि ती वेळोवेळी ट्रिपवर जाऊन त्याला निराळ्याच जगात भेटायची. एके दिवशी ती वेगळ्याच विश्वात गेली आणि ती तशीच त्याला सोडून गेली! त्या कडव्या अखेरीस तो कुंद खोलीतला गिटारिस्ट अचानक थांबतो. तो डोळे उघडून सर्वत्र बघतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच्या कुठल्या विश्वाच्या कुठल्या दरवाज्यातून लोकं निघून गेली याचं भान त्याला राहत नाही. ते गाणं त्याचंच असावं, पण आपल्याला काय माहिती, काय पर्वा?

तो तिकडे गिटार वाजवत होता एवढा वेळ, मी इकडे माझ्या keypad वर शब्दांनी चित्र रेखाटत राहतो. आपण आपापल्या मंडालांमध्ये अडकलेली लोकं! कुणाला कीक-स्टार्ट लागते, कुणी फक्त डोळे मिटून जगांच्या प्रवासांना जाऊन येतो. त्या कुंद खोलीत आता एक रसायन तरंगताना दिसतं! शंकर शांत डोळे मिटून पाहत राहतो सगळं, रसायन होऊन भिनत जातो लोकांमध्ये, माझ्यामध्ये! कुंद खोली काळसर होत जाते, कुंद खोलाचा मालक काउंटरवर बसून पैसे मोजत राहतो.

पंकज

१२ मे २०२१