रविवार, २० डिसेंबर, २०२०

लिखान


कसे लिहावे बरे? बरं लिखान तसं सोप्पच! थोडे-थोडे शब्द गोळा करावेत. कशाला काय जोडायचे याची मनातच करावी मांडणी. आणि सर-सर सारे ओतावेत शब्द कागदावर. ओतण्याची पण एक कला आहे. ज्याला जमली त्यालाच माहिती की ती जादू कशी घडते! 

ओतावेत शब्द कागदावर आणि हळूवार मारावी एक फुंकर अनुभवाची, मग पसरतात ते आपोआपच; जसा पसरतो जमिनीवर ओतलेला पारा! आपोआप, नेमके, अर्थपुर्ण. असे जमले प्रकरण की कशाला त्यांना हलवायचे? जे आहे ते तसेच ठेवायचे आणि दुरून थोडे बारकाईने बघायचे. 

वाटतं मग, अरे हा एक शब्द फारच अवखळ, पसरलाय कागदभर, तर हा दुसरा अगदीच लाजाळू. वाटतं, अरे ही काही वाक्यं आगगाडीसारखी लांबडी, तर काही अगदीच झालीत पोरकी! वाटतं असंही की काही जमलं नाही हे चित्र चांगलं, करावा कागदाचा बोळा; तर कधी (क्वचितच बरं का) वाटतं, जमलंय बरं का! 

काही का वाटेना; आताशा मनातलं कागदावर येणं हीच केवढी मोठी प्राप्ती! काही शब्द असावेत खिशात पांढरे-काळे, रंगी-बेरंगी; काही वाक्यं बनवावीत लहान-मोठी, सुरेख नि वेढब. कोऱ्या कागदावरती चित्र मात्र रेखाटताना मनाशीच जुळवावं एक गाणं, आणि एक ललित जन्माला घालावं तान्हं. 

पंकज । २० डिसेंबर २०२०       

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनचे उच्छवास!


दिवस मावळतो, मग उजाडतो; तसा काळाच्या चक्रात अडकलेला नादान जीव खुळावतो. इथे-तिथे आणि पुन्हा तिथेच असा पायांचा प्रवास घरभर होऊन घरातच थांबतो. आतापर्यंत खरं मोजून झाल्यात फरश्या किती, घराची व्याप्ती किती, आणि आपली लायकी किती! पोपट आहे पिंजऱ्यामधला आमच्या घरी. उदास बसून असतो तो. मिरच्या खातो, पेरू खातो, आणि कर्कश्श भाषेत (शिव्या) बोलतो आमच्याशी. त्याचे पंख अधून-मधून कातरले की उडण्याची इच्छाही जाते त्याची कातरली; आणि पिंजऱ्याच्या आत काय, बाहेर काय, फरक कळेनासा होतो.

वाटलं नव्हतं हवा एवढी प्रदुषित होईल की घराबाहेरही पडता येणार नाही. संशयी नजरेने समोरच्या व्यक्तीला पहावे लागेल आणि चार-हात लांबच रहावे लागेल. ते प्रत्यक्ष घडताना पाहिल्यावर विश्वास बसतो. तरी आम्ही कित्येक वर्षांपासून बोंबलून सांगत राहिलो की वातावरण-बदल म्हणजे मज्जा नाही; आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत चाललोय. विञानधिष्ठ बुद्धीला पटलेल्या या गोष्टी जगाने कधी मनावर घेतल्याच नाहीत, मग हा असा फटका बसला तर जबाबदार कोण? जबाबदार आम्हीच! आम्हीच कापल्या वेली, आम्हीच जाळली धरणी आणि धूर झाला तसा नाकाला लावला रूमाल. आम्हीच केली जंगले रिकामी; तुकारामांच्या सोयऱ्यांच्या सोयिस्कररित्या केल्या कत्तली, आणि अभिमानाने मुर्खत्वाची शिखरे सर करत गेलो. वन्यजीवांच्या लचक्यांवरती केले राजकारण; नाकारले आदिवाशांचे हक्क; नदी-समुद्र-भुमीला हवे तसे लुटले-खरवडले-ओरबाडले-चावले-चाटले. आपले दात छोटे आणि खोटे, म्हणून वाचले काही, पण जे गेले ते परत येत नाही!

आता मी दिवसभर फिरतो एका बंद घरात आणि मनातून दाखवतो की मी केले काहीच नाही! आतली तळमळ बाहेर सांगणार कुणाला? ज्यांना सांगणार त्यांनाही कळतंच हे सारं! तसं पगारी काम आहेच; त्यामुळे जीव रमतो. माझा विद्यार्थी आणि प्रॉजेक्टसचाच गोतावळा सांभाळण्यातच दिवस संपतो. पण एक मन म्हणतं, अरे वा! लॉकडाऊन मधे आपण अति-productive काम करू! आजवर ठरवलेल्या बऱ्याच pending गोष्टींचा फन्ना उडवू. किती लिहायचंय, करायचंय; सगळं-सगळं करूनच टाकू. ते दुसरं मन, मी घरी नसतानाही हेच म्हणायचं! कुणी म्हणतं, लॉकडाऊनचा वेळ सत्कर्णी लावा; लॉकडाऊन enjoy करा! पण नाही ही परिस्थिती enjoyable! परिस्थिती फक्त घरी बसण्यापुरती नाही. घरी बसणं ही फक्त क्रिया, पण त्यामागे काय-काय घडलंय ते पाहून मन विदीर्ण होतंय. आपल्याच कर्माने घरी बसलेलो आहोत आपण.

अगदीच हातात काम नसलेले काय करत असतील अशा काळात? पंख कातरलेले पोपट, शुन्यात पाहत राहतील. मालक कधी मिरची देतो, पेरू देतो, वाट पाहत असतील. अशा विनाकारण गुंत्यात अडकलेले प्राणी आपण! गुंताही केला आपणच! तो सोडवायला टोकंही सापडत नाहीत आता!

घरोघरी तशेही मोबाईल आणि टिव्हीला चिकटलेले आत्मे, राब-राब राबणारे आत्मे, आणि इतरांना कामाला लावणारे आत्मे असे सारेच एकत्र येऊन जे तांडव सुरूय त्याबद्दल खरंच कुणी कसं लिहीत नाही? कितीशी लोकं असं दिवसभर एकत्र गुण्या-गोविंदाने राहू शकतात बरं? कामाची सवय झालेली लोकं, हातातून काम अचानकच सुटल्यावर किती हतबल झाले असतील आणि ती सगळी चिडचिड, तिला मोकळं व्हायला मार्गही नाही! मातीत काम करणारे हात वर्क फ्रॉम होमकसे करणार बापुडे? कामाला देव मानणारी भाबडी मनं दिवसातले चार-चार तास टिव्हीला चिकटून कशी राहू शकतील बरं? आणि ज्या लोकांसाठी घर ही आरामाची जागा असते, ते आरामात आराम तरी कसा करू शकणार? लॉकडाऊनचे साईड ईफेक्ट्स सगळ्यांनाच झेपणार नाहीत!

कधी वाटतं घरात एवढ़्ढं आपण कधीच राहिलो नव्हतो. अतिशय जास्त घरात राहून लोकांविषयी अतीच माहिती मिळते की काय अशी धास्ती वाटते. Personal space जपलेली, हळूहळू उद्धस्त होतेय की काय अशी शंका निर्माण होतेय. ज्यांना या गोष्टी कधी झेपल्या नाहीत, त्यांना तसाही काही फरक पडत नाहीत. पण आताशा घरातल्या सर्वांच्याच झोपण्या-उठण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि जेवणातले मेन्यु, स्वभाव आणि पादण्याच्या पोझिशन्स आणि नाद यांचा इत्यंभूत डेटाबेस डोक्यात तयार होत चाललाय. हे असं माणसांचं जग अति-जवळ आलं की त्यात कसं रहावं हे उमजणं ही खरी एक कला आहे, पण मला ञात नाही. मी हे जग बघतोय, अनुभवतोय!

एक मात्र खरे की शनिवार-रविवार च्या चक्रातून हा जीव मुक्त आहे; आता दररोजच मंगळवार किंवा गुरूवार असा काहीसा असतो. तारीख आणि जगातल्या मृतांचा आकडा या दोन्ही संख्यांवरची अंधश्रद्धा मी झटकून दिलीय आणि बिना-तारखांच्या आणि बिना-वाराच्या काळाच्या अक्षावरून प्रवास सुरू झालाय खरा! या अक्षावरती डेडलाइन्सचे गतिरोधक आहेत जिवंत, पण त्या प्रवाशी मनाला सण-समारंभाचे अप्रूप नाही आणि हार-तुऱ्यांची आस नाही! दररोज ढिगभर ऑनलाईन मिटींग्ज आहेत, पण माईक आणि व्हिडीओ स्विच ऑफ करून सच्चिदानंदी टाळी लागण्याची सोयही आहे. आळसाचं जेनेसिस खरंतर न आवडणाऱ्या गोष्टी वेळेत करण्याशी आहे!  
     पंकज
१७ एप्रिल २०२०