संध्याकाळ
वादळलेली होती तेव्हा मी पावसाची वाट पाहत एकटाच बसून होतो. समोरची रस्त्या दुतर्फ़ाची
भरगच्च झाडं एकाच माळेत विणलेल्या सुरांसारखी वर-खाली, आडवी-तिडवी होत राहिली आणि जमिनीवरची
धूळ आकाशाला भेटायला गेल्यासारखी पाण्याबाहेरच्या मासळीसारखी तडफडत राहिली. दिवस संपायला
आला की सुरूवात होतेय सकाळची या इतक्या अवकाशाचा पत्ताच लागला नाही. झोपाळ्यासारखा
मी पुढे-मागे झुलत राहिलो, तितकाच काय तो वेळ पुढे-मागे सरकत राहिला! चित्र विस्कटल्यासारखं
नि रंग हवेसारखे पातळ…काय म्हणतात याला?
ती काळीभोर चकाकणाऱ्या रंगाची चिमणी आली.
गॅरेजच्या पत्र्यावरच्या दगडावर बसली. मी घड्याळात पाहिलं, १८० अंशाचा फेरा होता काट्यांना,
सहा वाजताचा. ती चिवचिवली…टॅव टॅव टॅव…मग थोड्या वेळाने हिस्स्स हिस्स्स हिस्स…मग अजून
एक चिमणी आली, भुरकट रंगाची, तांबूस बुडाची… टॅव टॅव टॅव. दिवस संपला का? त्यांनी थोडं
इकडे तिकडे पाहिलं! जायचं घरी? की थांबायचं थोडं? भुरी मादी उडाली, तसा काळा नर तिच्यामागे
सुळ्ळकन…घरातली लाईट फट़्कन बंद झाली, मी घरात वाकून पाहतो इतक्यात मैदानात आभाळातून
क्षणात जमिनीपर्यंत वाढलेली एक चमक आदळली! नंतरच्या गडगडाटात मेलेल्या गुरा-ढोरांच्या,
मनुष्यांच्या, झाडं-वृक्ष-तरूंच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत! दु:ख कुणाला जास्त होतं?
मरणाऱ्यांना की मारणाऱ्याला?? अजून एक चमक नि गडगडाट…मग वारा…झाडाची एक फांदी खाड़्कन
गॅरेजच्या पत्र्यावर नि मी ताड़कन उठलो! झोपाळा एकटाच हलला, आता त्याला सोबत नाही…
काय ऐकावं? जॅझ? हं…जॅझच! ते छान आहे.
साध्या साध्या नेहमीच्या गोष्टींना एका असामान्य अस्तित्वात गुंडाळण्याची पद़्धत आहे
त्याची. मला आवडतं ते! गॅलरीतून समोरचं चित्र पुन्हा एकदा किती धूरकट, धुळेजलेलं नि
बदामीसर रंगाचं भासू लागलं. झाडं हलताहेत, पाऊस आहे बारीक-सारीक नि विजा लखलखताहेत,
त्या जमिनीपर्यंत पोहोचल्या की ढग गडगडताहेत! मी आत्ता सुरक्षित जागी आहे…घनदाट जंगलात
असतो तर? जॅझ ऐकलं असतं? की दुसरं काही? झोपाळलेला असतानाही डोळे ताणत जागा राहिलो
असतो! बचेंगे तो ओर भी लिखेंगे! हं…त्या पक्ष्यांसारखंच झालं असतं माझं! थांबूया का?
नको! कसलं वादळ हे, चल; घरी जाउया! घरट्यात गुडूप बसून मी वारा थांबण्याची वाट बघितली
असती? डोळे मिटून देवाची प्रार्थना केली असती?? माझ्या रमेची आठवण काढली असती? की तिची
माफ़ी मागितली असती? हे सगळंच खवळलेल्या समुद्रात हेलकावणाऱ्या होडीसारखीच आहे ना! हवामान
काही माझ्या हातात नाही; ते बदलू शकतही नाही…पण ते जसं बघतोय, ते तसंच रेखाटावं, शब्दबध्द
करावं असंही नाही! त्या खवळलेल्या समुद्रात हेलकावणाऱ्या नावेवरती संथ जॅझ संगीत सुरू
आहे…ते ऐकूही येतंय…माझी आठवण काढणारी रमा, अशा वादळी रात्री माझ्या राहत्या घरापासून
समुद्राच्या पट़्ट्याएवढी दूर आहे…तिथे हवा काही वेगळीच असेल! ती नुसतीच बसून कागदावरती
पाय रेखाटत असेल!
माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बोटांच्या
एकेक ठोक्यागणिक अक्षरं पुढं सरकताहेत…वाऱ्याची दिशा कुणी ठरवावी? मनाने? लिहणाऱ्या
हातांनी? गॅलरीतला झोपाळा उगाच स्वत:च हलतोय…वादळाचा शेवट कसा करायचा ते मला नीटसं
समजत नाहीये; किंवा आता पुढचं काही सुचत नाहीये…मग हे इथेच बंद करावं का? डाव्या छातीच्या
सातव्या बरगडीजवळ काहीतरी खुपतंय; वीज पडली असेल बहुतेक…
पंकज
कोपर्डे
१६.०४.११