ब्रुजेल्स हे फक्त
त्या छोट्या लघवी करणाऱ्या माणसाबद्दल (Manneken Pis) वेडं आहे. बघाल तिकडे त्याचाच
फोटो. आणि मुर्ती लहान, किर्ती महान असं वर्णन अगदीच जुळतं याला. लोकं वेड्यासारखी
गर्दी करून याला एवढ्या लांबवर पहायला येतात. त्याच्या लघवीतूनच बीअर आणि वाईन पितात.
सेल्फ़ी काढतात आणि सेल्फ़ीमधे स्वत:ही तशीच पोज देतात. भारतातून एवढ्या लांबवर मी हा
वेड्यांचा बाजार बघायला नव्हतोच आलो मुळी, पण एक गोष्ट लक्षात आली की, असा वेड्याचा
बाजार आपल्याकडे नाक्या-नाक्यावर आणि दररोजच पहायला मिळतो. बेल्जिअन लोकांसाठी हा निव्वळ
एक टाईम-पास असावा कदाचित.
माझा आजवरचा प्रवास
काही उल्लेखणीय नाहीये, पण आत्मचिंतन करायला लावण्याएवढा तरी नक्कीच झालाय. मी फार
ऐकलं होतं की युरोपिअन लोकं फार डिसीप्लिन्ड असतात, पाहिलंही ते. त्यांची शहरं, त्यांची
रचना, रस्ते, वाहतूक, जेवण, संस्कृती, भाषा, वेष. आपल्यात आणि यांच्यात प्रचंड फरक
आहे. एवढा मी नव्हता विचार केला खरंच. भारतातही राज्या-राज्यांमधे बराच फरक आहे, तो
वेगळाच. पण भारत आणि बेल्जिअम किंवा इतर कोणताही युरोपिअन देश…यांत स्पष्टपणे जाणवावं
इतकं अंतर आहे. मला पुण्याहून बंगलोरला कामासाठी आलेली, नि बंगलोर मानवलं नाही, म्हणून
परत पुण्याला गेलेली लोकं माहिती आहेत! हा tolerance कित्येक गोष्टींवरती अवलंबून असावा,
पण तो दिसतो. एक गोष्ट खरी आहे, की आता जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, भारतीय लोकं
दिसतील. ते पण इतरांना शोधत असतील एखांदवेळेस…
मी भारतातून निघालो
तो देशाभिमानाचा मोठा फुगा घेऊन. तो फुगा थोडा अहंभावात रुपांतरित झालेला. पण जसा इथे
आलो आणि इकडचं जग पाहिलं; त्या फुग्यातली हवा हळू-हळू सुटत गेली. मग नंतर आपल्या देशाची
लाजही वाटू लागली. आपल्या एवढ्या मोठ्या आणि जुन्या देशात आपण काय मुर्खपणा चालवलाय
असं वाटू लागलं. हे realization होणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं. कारण, जोपर्यंत मी
स्वत:हून जग बघणार नाही, तोवर मला ते कळणार नाही. स्वत:च्या देशाबद्दल अभिमान असणं
साहजिक आहे, पण तो आंधळा नसावा. माझ्यासाठी आजवर तो आंधळा अभिमान होता आणि जरी मी बऱ्याच
ठिकाणी फिरलो नसलो तरी, तरी मला आता कळतंय की आपण जगाच्या शंभर वर्षे मागं जगतोय. आपण
आपल्या अंधश्रद्धांना देवत्व बहाल करून, देशाला खड़्ड्यात ढकललंय. दीडशे वर्षं इंग्रजांचे
गुलाम होतो, ते चांगलं होतं. अन्यथा, या राजांनी फक्त भोग-विलासात आयुष्य घालवून भारताला
जगाच्या पाठीवरूनच नष्ट केलं असतं. फार अभिमान वाटावा असा आपला इतिहास नाहीये. या राजाच्या
तावडीतून त्या राजाच्या पायाखाली असाच आपला देश चिरडला गेलाय आजवर. आपला देश हा कित्येक
हालापेष्टांतून वर आलाय, येतोय…पण इथेही एवढा काही फरक नाहीये. जर्मनीतर दुसऱ्या महायुद़्धात
नेस्तानाबूत झालेली, तरी आज मान वर करून उभीय. आणि हे सगळं घडलंय मागच्या पन्नास वर्षांत.
इथल्या सोयी-सुविधा भारतात येण्यासाठी निदान पन्नास वर्षांचा कालावधी जाईल…तोपर्यंत
जग प्रगतीच्या वेगळ्याच मार्गावर असेल. अर्ध्या ज्ञानात माणूस सुखी असतो म्हणतात, ते
काही खोटं नाही! आपण डोळे झाकले म्हणजे जगाला आपलं नागडेपण दिसत नाही, असं भारताला
वाटतंय का? काय हे…किती दशकं अजून आपण मागास राहणार आहोत? मागसलेपणा पुरे झाला आता…कामाला
लागा. आपला देशाभिमान फुकाचा आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आपल्या भाषांची
मर्यादा आपणास माहिती नाही. आपण काय केलं पाहिजे, हे आपण मनातल्या मनातच ठरवतो आणि
आपल्या कृतींना आपण ऐतिहासिक किंवा पुराणातला काही पुरावा देऊन मान्यता देतो. कोण आहे
हिंदू? काय आहे मुस्लिम? काय कळतंय काय आपल्याला या सर्व गोष्टींतून? मंदिरं बांधून
घंटा वाजवणारा हिंदू का? एवढ्या समृद़्ध आणि माणसाला माणूस म्हणून जगायचं स्वातंत्र्य
देणाऱ्या संस्कृतीचे बारा वाजवलेत आपण कर्म-कांडांना आणि साधू बाबांना महत्त्व देऊन.
आंतर-राष्ट्रीय स्तरावर भारत काय आहे तर ‘नमस्ते’ आणि ‘योगा’! बाजार मांडलाय आपल्या
दळभद्रीपणाचा. डोळे उघडा आता, देशासाठी काही करा. काय करतात आपले नेते, हे परदेश दौरे
करून? काय शिकतात ते? की नुस्तीच गोरी कातडी बघण्यासाठी जनतेचा पैसा बुडवून येतात हे?
हे सगळं ज्यावेळी जाणवतं, त्यावेळी खरंच frustrating वाटतं. मला इथे अजून पंधरा दिवसही
नाही झालेले, आणि हे वाटतंय. मग विचार करा की जी लोकं वर्षानुवर्षे भारताबाहेर आहेत,
त्यांची काय अवस्था असेल? ‘स्वदेस’ मुव्हीसारख्या घटना फार क्वचितच घडत असतील!
पुर्वी मी थोडा हा
प्रयत्नही केला की चला अगदीच यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत. प्रगतीचे दुष्परिणामही
पाहिले पाहिजेत. पण दुर्दैवाने यात फायदे-तोटे असं वर्गीकरण करणं अवघड आहे. ते शक्य
नाही. इथल्या लोकांना शिस्त आहे. कुठून चालावं, कसं चालावं, कशी गाडी चालवावी, रस्त्याचा
उपयोग कसा करावा…सर्वच गोष्टी systematic आहेत. बऱ्याच automated आहेत. आजूबाजूला क्वचितच
कुणी पोलिस दिसतात...तिकीट चेकर्स दिसतात. जर सर्वांनीच नियम पाळले तर त्यांचीही गरज
नाही भासणार. मशिन्सच जास्त काम करत असल्यामुळे लोकांची गरज नाही. जे लोक काम करतात
त्यांचं salary structure ठराविक आहे. जास्त पैसे कमवणाऱ्या लोकांवर जास्त tax आहे.
गरीब-श्रीमंतांमधली दरी खोल नाही. सर्वच लोक थोड्या-फार फरकाने सारखीच लाईफ-स्टाईल
जगताहेत. मी दररोज बर्लिन मधे दोन तास travel करतोय…Institute ला ये-जा. पण या प्रवासात
थकवा जाणवत नाही. मी दररोज जाताना दोन ट्रेन्स आणि एक बस बदलून प्रवास करतो. पण हे
सर्व transitions फार सोयीस्कर आणि बिनात्रासाचे आहेत. एकच तिकीट सर्व माध्यमांसाठी
(बस, ट्रेन, ट्राम) चालतं. तेच जर तुम्ही भारतात कोणत्याही शहरात प्रवास करत असाल,
तर प्रवासाशेवटी थकवा जाणवतो. गर्दी असते, बस किंवा लोकल ट्रेनसाठी इकडून तिकडे पळावं
लागतं. वेगवेगळ्या माध्यमांमधे ताळमेळ नाही.
लोक आपापल्या कामात
बुडालेले असतात. कुणी कुणाचा वाली नाही. ट्रेनमधे प्रवास करताना गर्दीतही फार एकटेपण
जाणवतं. लोक फोनमधे बघत असतात किंवा पुस्तक वाचत असतात. कुणी कुणाशी बोलत नाही. कुणी
हसतही नाही. त्यांचे चेहरे सप्पक भासतात. कळत नाही की यांना झालंय काय? एखांदवेळेस
स्वत:मधेच बुडालेले असतील, उद्याची काळजी असेल किंवा शून्यात गुंतले असतील. कामाचा
ताणही असेल कदाचित. यांच्या कामाच्या वेळा फार defined असतात. सकाळी नऊ ते संध्याकाळी
पाच. त्याआधी किंवा त्यानंतर एक मिनीटही काम नाही करणार. आणि आपण? एक गोष्ट प्रकर्षाने
जाणवते ती म्हणजे यांचं social structure. सगळेच स्वावलंबी लोकं…अति-स्वावलंबी. बरीच
लोकं एकएकटी राहतात. कुटूंबसंस्था थोडी कालबाह्य झाल्यासारखी. बरीच एकएकटी म्हातारी
लोक आजूबाजूला दिसतात. जर बस किंवा ट्रेनमधे त्यांना मुद्दामून स्वत:च्या जागेवरून
उठून बसायला जागा दिली, तर त्यांना तो अपमान वाटतो…ते म्हणतात – ‘I am good.’ प्रत्येकाला
आपापलं काम स्वत: करायची सवय आहे. बर्लिनमधे तरी जनसंख्या रोडावत चाललीय. शासन मुलं
असणाऱ्या कुटूंबांना काही सवलती देतं. अवघडंय. आणि अगदी याच वेळेस लांबवर म्युनिकमधे
ऑक्टोबर फ़ेस्ट सुरूय…या सिजनची शेवटच्या बिअरचा आनंद घेण्यासाठी लोक तिकडे गर्दी करताहेत.
मी अगदीच योग्य वेळी आलोय बर्लिनमधे. सध्या हे त्यांचं २५ वर्षं आहे जर्मनी
reunion चं. इतिहास दाहक आहे, पण त्यांनी केलेली प्रगती त्यांच्या सहनशीलतेचं प्रतिक
आहे.
पंकज
२ ऑक्टोबर २०१५
Tierpark, Berlin