बुधवार, २४ मार्च, २०१०

नीलमोहोर


रणरण उन्हात सुर्य कपाळावर आला की एक फुलपाखरू बाहेर पडतं....इतका वेळ ते नील-मोहरातच दडून बसलेलं असतं...ते कसंय माहितीय? जांभळसर हिरवं, गुलाबीसर निळं! मी मख्खासारखा म्हशीवर बसून म्हैस जाईल तिथं हिंडत राहतो; डोळ्यासमोरचा तो नील-मोहोर आणि त्याच्या मखमली जांभळ्या सड्यावरून तिची नाजूक गुलाबी पाऊले हळूवार पडू लागली की माझ्या मनात फुलणारा गुलमोहोर; हे दोघेही कधीकाळी पुन्हा विभक्त न होण्यासाठीच जन्माला आलेत असा प्रश्न मला पडतो. म्हैस मात्र तेवढ्यात उन्हाची काहिली शमविण्यासाठी आरामात चिखलात घुसते; तिच्या पाठीवरचा मी ही आपसूक...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

Network


शक्य आहे ही वेदना;  ती जाणवणे आणि भोगणे; दोन्ही अशक्य! आज अचानक मला या गोष्टीचा साक्षात्कार झाला; तसं पुर्वीही बऱ्याचवेळा वाटून गेले; पण बोध झाला नाही! आज बोध झाला. एवढ्या मोठ्या जगात हा मी इतकुसा! जग काय घेऊन बसलात? ब्रम्हांड! ब्रम्हांडात मी इतकुसा! जगातल्या सर्वात शक्तिमान भिंगातून पाहिलं तरी दिसणार नाही; इतकुसा! आणि माझं जग! माझ्या जगाचं काय? माझं ते इवलुसं जग… “आम्ही दोघे, आमचे दोघे; आई-वडिल, मामा-मावशी, भाऊ-बहिण आणि इतर. माझी नोकरीची जागा. माझं घर. माझं वाहन. माझे कपडे-कपाट-बॅंक-क्लिनीक-मित्र-मैत्रिणी-favourite hotel- outingची ठिकाणं-काय-काय नि काय-काय? जन्मल्यापासून हे जाळं मी विणत राहिलो; लोकांशी भेटलो की, वाढवत राहिलो…माझ्या ओळखीच्या सर्वच लोकांची अशी स्वतंत्र जाळी; अशी शेकडो-हजारो-करोडो-अब्जावधी-परार्ध आणि जास्तच जाळी…या सर्व जंजाळाच केद्र-बिंदू “मी”!!

जाळ्यांचा कुठला बिंदू कुठे खपेल आणि कुठे वाढेल? याचा काय थांग! आणि असे जर झाले; तर माझे केंद्र ढळणार तर नाही ना…याचा तरी काय थांग!!

रविवार, १० जानेवारी, २०१०

चार थेंब


अंगावरून झुळझुळतं रेशीम हळूवार ओढत न्यावं आणि भुर्र…भुर्र…करत ते वाऱ्यावर असंच सहज, फुंकर मारत पसरून द्यावं…पुन्हा ते उडून जातंय म्हणून आधाशी डोळ्यांनी, हुरहुरल्या मनाने दूर जाईपर्यंत पाहत रहावं…पाहत रहावं…

काही दिवस जातात असेच, दररोज सकाळी दात घासत असल्यासारखे…ठरवल्यासारखे…आणि मग संगणकासमोर बसून कंटाळलेला जीव म्हणतो, “चल काड्या करू…” स्वत:च ठरवलेल्या स्वत:च्याच परिघात एक सहज फेरी मारू! तो कुठेतरी गडावर किंवा जवळपासच्या गर्दीने किचडलेल्या चौपाटीवर जीव रमवण्याची साधनं शोधत फिरतो…दिवस संपतो, तसा तोही internet वरल्या web album मधे photos post करून झोपी जातो…पुढे आठवडाभर त्याचे तसलेच सगळे संगणकाभोवती वायरींसारखे गुंडाळले गेलेले मित्र… “अरे वा! भारी! मस्त! कुठे गेला होतास? Nice…” वगैरे वगैरे comments टाकून मोकळे होतात…तो ही थोडा खुश होतो, स्वत:च्याच नादात थोडावेळ रम-माण होतो! आणि मग परत ते दात घासण्याचं रूटीन वगैरे.

“हवा थोडी वाहते गं गोड…संथ चालतात आणि ढग…कधी-मधी पिसाळल्यासारखे आणि कधी अगदीच डंबांसारखे माठ होऊन उघडे-बंब…हिरवाई अशी नटून रूसून बसलेल्या अगदीच तुझ्यासारखी…आणि तू अगदीच काळ्याभोर कोसळायला पुरेपूर तय्यार माझ्यासारखी!” असली रचना कुठून जन्माला येते, ते त्या लिहीणाऱ्या हातांना माहिती की संगणकाभोवती गुंडाळलेल्या मनाला माहिती…कुणास ठाऊक?

काही दिवस असेच जातात, संगणकाभोवती गुंडाळल्यासारखे, चष्म्याच्या काचेवर उठणाऱ्या क्लिष्ट रंगांसारखे आणि चष्म्याआड अडकलेल्या थकलेल्या, भागलेल्या, खोबणीत लपून बसलेल्या डोळ्यांसारखे! तेही ठरवलेल्या थिअटरात एखाद्या वीकेण्ड्ला खपतात!!

आकाशात चार थेंब दाटून येतात यार, आज-काल…पाऊस काही पडत नाही; ठरवलं आहे बरंच काही, मनाप्रमाणे होत नाही! जपून-जपून वापरले तरी थोड्या दिवसांचं सोबती…चार थेंब संपत आले आणि मनाचं मनाला मनच सांगत नाही! घुटमळतं, घोटाळतं, पदर पकडून हट़्टही करतं…जिच्याकडे हट़्ट करतं, तिच्याकडेच दाणा नाही. माठात उरलेले चार थेंब अशेच संपतात, काही-काही दिवसांनी…त्याची आई कधीतरी नसतानाही रडून आणि दिवसापाठी साठलेले थेंब एकाग्रतेने गोळा करून माठात ठेवते भरून…मुलाला कसलाच पत्ता नाही!

आयुष्य चाललंय कुठे…संगणकाला चिकटलेल्या मनाला कसलीच सुतराम कल्पना नाही!

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

…आणि त्याचदिवशी नंतर…आणि त्याचदिवशी नंतर मग तो रस्त्यावरून चालत होता. एका पावलासारखंच दुसरं पाऊल; एका श्वासासारखाच दुसराही. शांत-संथ. अंगाला-डोळ्यांना त्रास देणारा रात्रीचा झगमगाट; गाड्यांचे हॉर्न्स आणि आनंदात असणाऱ्या लोकांचं हसणं-खिदळणं…सारं-सारं वैतागाचं होतं. त्यानं चालता-चालताच हाताची घडीही घातली आणि धाग्यावर धागा विणत जावं; तसा एकटेपणाचा दोरा; त्याच्या पायातून सगळं जग हळूहळू विणत चालला होता!
बाकडं दिसलं; म्हणून तो थांबला. आकाशातला चंद्र पाहून ओठांची शिवण उसवून तो हसला. डोळे दुखेस्तोवर त्यानं चंद्राकडे पाहिलं. आकाशात एकच चंद्रय; म्हणून त्याचं अप्रूप! तिच्यासाठी त्याने काढलेले चंद्राचे फोटोज़! काळी रात्र…पिवळ्या पवित्र दुधात बुडवलेला चंद्र आणि त्या दुधाचे चंद्राच्या आजू-बाजूला उडालेले शिंतोडे! रात्र-रात्र जागला तो; छान फोटो मिळवण्यासाठी…मनासारखं काहीच मिळालं नाही!
त्यानं आडव्या रस्त्यावर वाहणाऱ्या, तुंबणाऱ्या, चिडणाऱ्या गर्दीकडे पाहिलं…गर्दीतल्या लोकांना दु:खच होत नाही; असं त्याला वाटलं! चालायचं-थांबायचं-चिडायचं-ओरडायचं आणि जास्तच त्रास झाला; तर चेंगरून मरायचं! त्याला गर्दीत तिचा सुटलेला हात आठवला…कावरे-बावरे डोळे; त्याला शोधणारे डोळे…तसा तोही कावरा-बावराच झाला होता आणि मग मागून येऊन तिनंच त्याचा हात पकडलेलाची आठवला त्याला!
प्रत्येक ठिकाणी, ओळखीच्या जागी; आठवणींची भूतं-भुतांची बाळं-बाळांची खेळणी, सगळं-सगळं, नुसतंच! झाडा-झाडावर त्रास उलटा टांगलेला! कॅंटीनमधल्या प्रत्येक टेबलावर आठवणींचा चहा सांडलेला; इथं…या टेबलावर एकदा मी तिच्या नकळतच हात स्पर्शिला तिचा; आणि इथं…इथं बसून आम्ही सौर-उर्जेबद़्द्ल बोललो होतो…तो तिकडं जरा-तो-मळकट-कळकट-पाय चिरलेला टेबलंय ना; तिथे बसून आम्ही arrange-marriage बद़्दलही बोललो होतो! आणि त्याचदिवशी नंतर मग तो; त्याच अंधारलेल्या-मळकट-कळकट-पाय चिरलेल्या टेबलावर बसलेला होता आणि गोडवा उतरलेला चहा त्याचा गरमपणा मरून गेला तरी ओठांना लावत नव्हता!
दररोजचा कॅंटीनवाल्यानं पुस्तकाची पानं उघडावी, तशी एक स्माईल दिली; मोजक्याच शब्दात आणि त्याला ’ती कुठंय?’ असं विचारलं. “ती देवाघरी गेली!” असं काहीसं तो बडबडला; स्वत:चे पैसे भरून कॅंटीनमधून बाहेर पडला; थोडीशी फडफड करून वीजही मरून गेली; डोळ्यांना त्रास देणारा सारा प्रकाश; शांत झाला एकदम. डोक्य़ावरचा चंद्र मग अजूनच ठळक वाटू लागला.
काळंभोर आकाश, सुटलेला संथ गार वारा, फिकट पिवळा चंद्र आणि त्यानंच रंगवलेलं थोडंसं केशरी अंगण…रस्त्यावरती तो एकटा आणि गळ्यात एक अवजड कॅमेरा…चंद्र अगदी तिला हवा तसाच!
…आणि त्याचदिवशी नंतर मग कॅमेऱ्यातल्या चंद्राकडे पाहत तो आभाळभर रडला होता.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

रेघा


या काळुंद्र्या-रडक्या-अडाणी-अबोल जीवाला दु:ख एकच आहे! ते म्हणजे रेघा काढता येतात; चित्रं जमत नाहीत; अर्धवर्तुळं बऱ्यापैकी; पण वर्तुळ पुर्ण होत नाही! या दु:खाला कारणीभूत तीन गोष्टी…सर्वात प्रथम, विचार करणारा मेंदू- जो फक्त गद्यात विचार करू शकतो…चित्र पाहू शकत नाही! दुसरी गोष्ट म्हणजे अक्षरं गिरवायला सरावलेली बोटं. लोक म्हणतात, “तू लिहीतोस छानच. शिवाय अक्षरही छान आहे!” (अक्षर सोडून बाकी तू मात्र घाणंय!) तीच ती बोटं…नालायक-बेशरम-बेजबाबदार! हवं तसं – हवं तेवढं लिहीतात; एक चित्र तेवढं काढायला जमत नाही. स्वत:च्याच आकारासारखं ओबड-धोबड, Rusty, काळेश नि खडबडीत चित्र काढणार. माणसाचं sketch असेल तर, नाक-डोळे-ओठ यांच्या जागा नि आकार एकमेकांत गुंतलेले. पाय एक मोठा, एक लहान…केस खराट्यासारखे बसवलेले! नि मुलीचं चित्र मी स्वत: काढणं; म्हणजे मोठाच गुन्हा! राजकन्येला गाढवीण लिलया करण्याची माझ्या बोटांची किमया!

तिसरी नि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे…प्रतिभा! त्यात आम्ही भिकारी. भिकाऱ्यांतही lower rank चे भिकारी! दुसऱ्यांची चित्रं गिरवायची किंवा sophisticated शब्दांत “Mimic” करायची इतुकीही लायकी नसलेले निर्लज्ज-स्वाभिमानी भिकारी!
मी नि माझी कविता; एका शांत संध्याकाळी; गजबजाटाहून थोडं दूर; तळ्याकाठी, वाळूमधे; डुंबणाऱ्या सुर्यामधे; एकमेकांत गुंतलेलो असतानाचं sketch.
नुकत्याच वयात आलेल्या वेलीला फुल उमलताना, नि तिला हे उमगताना; हिवाळ्याच्या सकाळी; त्याला हुंगणारं कुत्र्याचं एक बाळ…ओलसर नाक; जीवाचं जीवाला अप्रूप…ते अप्रूपासाठीचे डोळे नि sketch.
तसंच तिचं-माझं; संसाराचं सारं संपून; पावसाळ्याच्या एका रात्री; मला सोडून जाणाऱ्या; एकट्याच तिचं…गड़्डद रस्त्यावरल्या; रिमझिमणाऱ्या street lampच्या पिवळ्या प्रकाशातल्या पाठमोऱ्या तिचं…sketch!
आणि अशी अगणित sketches.
थोडं उमजतं; पण मला खरंच काढता येत नाही. वर्गात आवडणाऱ्या मुलीचं lecture भर बसून, close up; portrait sketch काढायचं…त्यात तिचे काजळ भरलेले डोळे; मिटलेले गुलाबी ऒठ नि हलक्याशा प्रकाशाचा गालांवर उमटलेला सोनेरीसर अविष्कार असेल! तिचे काळेभोर केस खांद्यापर्यंत रूळत असतील; नि केसांची एक बट; श्रावणातल्या झोक्यासारखी कपाळावरून डोळ्यांपर्यंत झुलत असेल…ती रंगाने सावळी असेल नि कानांत इवलुशे डूल असतील नि वारा आला की ते वाऱ्यावर डोलत असतील! असं एक sketch काढावं नि तिला ऎनकेनप्रकारेण माझ्या वहीत मिळावं…हेच या काळुंद्र्या-रडक्या-अबोल-अडाणी जीवाचं स्वप्न आहे. (सध्यापुरतं तरी!)
मी सध्या रेघा जुळवायचं शिकतोय…पण रेघा जोडून घर बांधायचं अवघड काम; इतक्यात साध्य तर होणं अटकेपार!
- १२.१०.०९

रविवार, ८ नोव्हेंबर, २००९

कर्नाळ्याचा कचरा


कर्नाळ्याचा कचरा
काही दिवसांपुर्वी कर्नाळ्याला जाऊन आलो. कर्नाळा पक्षी-अभयारण्य. जंगल होतं, दाट होतं…पक्षी काही दिसले नाहीत…कोळी दिसले. माणसं दिसली…म्हणजे खरंतर फक्त माणसंच दिसली. गर्दी फार होती. रविवार असल्यामुळे असेल बहुधा. कुठल्याश्या कॉलेजची बॉटनीची कार्टी आली होती. ती सगळी पोरं आणि त्यांचा जाड भिंगांचा सर, sample collection च्या नावाखाली रोपटी उपटत होती, फांद्या तोडत होती…छान वाटलं, ते सगळं पाहून. त्यांची life बद्दलची curiocity मनाला भावली. अभयारण्यात असूनही त्यांनी मनसोक्त झाडं तोडली.
…आता या सर्वांत मी कोण त्यांना बोलणारा, बोललं तर म्हणणार, “तुम्ही कोण? बॉटनीला लागतं हे सर्व!” हो! मी कोण म्हणा…मी पण माझं photographyचं काम करावं, वेगवेगळ्या unusal angles मधून फोटो काढावे, प्लास्टिकचा कचरा करावा नि मस्त कर्नाळ्याचे फोटो exhibition मधे मांडावेत. त्यावर बक्षिसं मिळाली तर बरंच नाहीतर नविन कर्नाळा शोधावा…मी काय एका दिवसापुरतं कर्नाळ्यात फिरणार, कचरा केला तर माझ्या बापाचं काय बिघडतंय?!
आता समजा, हरियल (हा आपला राज्य-पक्षी, हे बऱ्याच मराठी लोकांना माहिती नसणार म्हणून सांगितलं!), तर हा हरियल नामशेष झाला…ठीकंय…झाला तर झाला, मला काय फरक पडतो!? अन्न-साखळीवर वगैरे असेल फरक पडत…मला काय त्याचं!! फक्त त्याचे जिवंत फोटो काढता येणार नाहीत…इतुकेच! NOT a Big Deal.
तीच अवस्था कवडीची…कवडी पुणे-सोलापूर रोडवर एक बंधाऱ्याचं ठिकाण. शेजारी खेडं….त्याचं नाव कवडी-पाट. हिवाळ्यात तिथे ढिगानं migratory birds येतात…मग त्यांच्याबरोबर ढिगानं birdwatchers, photographers येतात…मोठ-मोठ्या गाड्यांतून येतात. निवांत बसून राहतात…जमलाच तर कचरा करतात…Lays, Kurkure ची पाकिटं, Mineral Water च्या बाटल्या इ.इ. शिवाय गाववाले, नदी घाण करायला “बसलेलेच” असतात…आजच चक्कर झाली तिकडे…मागच्या वर्षीपेक्षा पाणी वाढलं होतं…पाण्याबरोबर घाणही वाढली होती! अशक्य घाण!! नको-नको ते सगळं पहायला मिळालं…आणि त्यात चरणारे पक्षी….एकही फोटो छान, प्रसन्न आला नाही…त्यात परत जवळ-पास पंधरा तर इतर फोटोग्राफर्स होते!
म्हणजे पक्ष्यांनी एवढा प्रवास करून यायचा…इथे येऊन गलिच्छ पाणी प्यायचं, त्यातले किडे-मकोडे खायचे, उगाच balance maintain करायचा अशक्य खेळ खेळायचा, predators (Marsh Harrier पासून stray dogs पर्यंत) ना तोंड द्यायचं, फोटोग्राफर्स ना हव्या त्या poses द्यायच्या, bird flu ची लागण होऊन मरायचं, पाण्याच्या पातळीत होणाऱ्या फरकावर स्वत:ची घरटी बदलायची, पिलं वाढवायची-जगवायची नि ती मेली की, बोंबा मारत wetland वर घिरट्या घालायच्या (म्हणजे फोटोग्राफेर्सना अजून चांगले shots द्यायचे!) नि आपण बेफ़िकीर रहायचं, अच्छा है! लगे रहो!
So, कळलं, they (पक्षी) have lots of things to do…Let’s wish them good luck!

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

रेहेकुरीचं अभयारण्य


आज मी काही गोष्टी शिकलो. काहीतरी शिकलो; त्यामुळे दररोजसारखाच आजचाही दिवस वाया गेला; असं म्हणता येणार नाही!
पहिली गोष्ट म्हणजे अभयारण्याच्या वाटेवरच असताना काळवीटांच्या एका कळपाने दर्शन दिलं. दहा जणं होती ती! काळवीटं…एका नरामागे एका कळपात पाचेक माद्या असतात!! असंच आपणही व्हावं, अशी नैसर्गिक उर्मी जागृत झाली…असावं, तर असं असावं…बलदंड शरीर, रूबाबदार शिंगं, पिळदार म्हणावीत तसली शिंगं, उगाचंच दुडकत स्वत:च्या कळपाभोवती, नाक वर करून फेऱ्या माराव्यात…माद्यांना आकृष्ट करावं नि इतर नरांशी तितक्याच त्वेषानं भांडावं!! इतकं शिकलो!
मग अभयारण्यात अजूक काही दिसले…सर्व एकच प्रकार…दूरवर होते, व्यवस्थित दिसले नाहीत…सकाळचा एक कळप दिसला तेवढाच. परत फिरतानाही तोच कळप पुन्हा रस्त्यावरतीच दिसला. त्या कळपामागे एखाद-दुसरं कुत्रं धावत होतं…त्याच्यापुढे तोच मघाचा उमदा नर पळत होता. दुसरी गोष्ट शिकलो, ती म्हणजे… “अपने गली में तो कुत्ता भी शेर होता हैं!”
एकंदरीत, male:female ratio, सत्ता, दरारा, घाबरगुंडी, माज नि टरकेपणा इ.इ. विचार करण्यासारख्या गोष्टी!
अभयारण्यातून बाहेर आलं तरी, मनातलं जंगल संपत नव्हतं…शिवाय त्यात हातात पडलेलं मिलींद वाटवेंचं “आरण्यक”! प्रवासभर नुस्ता विचार…काय करायचं मी, माझ्या आयुष्याचं!! (हा तसा कधीच न सुटणारा प्रश्न! तो तसाच ठेवला बाजूला!)
राशीमच्या देवीला गेलो…तिथं भजन म्हणत काही लोकं बसली होती, ते ऐकत बसलो…पायातले हंटर शूज काढून आत जाण्याची इच्छा होत नव्हती…देवीचं दर्शन बाहेरूनच घेतलं. मंदिराभोवती फिरून कळसांचे काही फोटो काढले नि टाळ्या वाजवत भजनी मंडळींबरोबर बसलो…वारा वाहत होता…मंदिराबाहेर मुघलांच्या काळातल्या घुमटांसारखं बांधकाम दिसलं…अहमदनगर हा मुघलांचा प्रदेश.
मग गाडीतली लोकं म्हटली, “चला आपण सिध्द्टेकच्या गणपतीला जाऊ”. मग निघालो, गणपतीला…रस्त्यात एक आडवा ट्रक…लांबडा. मग सगळ्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी, दगडं आणली, रस्ता बनवला, नि आमची गाडी पुढे काढली… “गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया!”
एकंदरीत श्रध्दा, गडबड-गोंधळ, हिरमोड नि हिरीरी इ.इ. विचार करण्यासारख्या गोष्टी!
येताना रस्तात जोशी वडेवाल्यांचा एक बोर्ड दिसला…ज्याची काही अक्षरे गळून पडली होती… दिसत होतं ते म्हणजे – जो…डेवाले…मग त्यातली काही अक्षरं मनानीच गाळली…नि नाही-नाही ती combinations केली…
Curiosity, creativity, नि अनुकरण इ.इ. विचार करण्यासारख्या गोष्टी!
पुण्यात पोहोचलो, तेव्हा रात्रीचे साडेदहा झालेले…पाऊस कुत्र्यासारखा कोसळत होता…गाडी काढली नि पावसात कुत्र्यासारखा भिजत, थंडीने थाड्थाड उडत, भगतसिंगाचं गाणं गात कसाबसा हॉस्टेलला पोहोचलो, अकरा वगैरे झालेले…खायची सोय नाही, थोडंफार वरचं खाणं खाऊन झोपी गेलो…
शिकलो…ते म्हणजे फक्त जगाचा विचार करून पोट भरत नाही!! स्वत:चा विचार प्रथम! मघाचा प्रश्न उफाळून वर आला… काय करायचं मी, माझ्या आयुष्याचं!! (हा तसा कधीच न सुटणारा प्रश्न! तो तसाच ठेवला बाजूला!)