रविवार, २६ जून, २०१६

नोराह

त्या संध्याकाळी वस्तीगृहातली ती निळी भिंत जांभळसर होऊ घातलेली. सात-साडेसात वाजत असतील. हिवाळा. मनूरच्या पसरलेल्या हातावर कविता मान रेलून पहुडलेली. तिचे केस मोकळे नि त्यांची मनं आतुरलेली. मनूरने कविताचे केस नकळत हुंगले नि तिचा गंध मनात भरून घेतला. त्या खोलीत प्रकाशाने येऊ नये म्हणून मनूरने विशेष काळजी घेतली होती. एक तो लॅपटॉप गात होता नि त्याच्या धूसर प्रकाशात ती खोली उजळून निघालेली. मनूरने नकळत हळूच त्याचे ओठ कविताच्या गालांजवळ नेले. तेव्हा मी नोराहला भेटलो. ती फार उंच नव्हती. फार गोरी नाही, सावळीशी. तिने केस मोकळे सोडले होते. तिच्या डाव्या हातात एक लाकडी बांगडी होती. कपाळावर एक छोटीशी टिकली नि कानांत फुलपाखरं अडकवलेली. ती त्या खोलीच्या दारात चौकटीला टेकून उभी होती. तिचं लक्ष मनूर नि कवितावर नव्हतंच. ती त्या खोलीच्या जांभळसर होत चाललेल्या भिंतीकडे पाहत होती. त्या खोलीत एक हवाहवासा वाटणारा गंध पसरत होता. त्या गंधाने मनाला शहारे सुटत होते. नोराह काही वेळ त्या भिंतीकडे पाहत राहिली. हळूच तिने हाताने खोलीतला तो गंध ढवळला. तो अधीकच गाढ झाला. कविताने डोळे बंद केले नि ओठांना मनूरच्या ओठांजवळ नेले. सगळं आपसूक घडत राहिलं. नोराह मग त्या खोलीत काही वेळ घुटमळत राहिली. तिने पडदा थोडा बाजूला सारून रस्त्यावर खेळणाऱ्या, चिरकणाऱ्या मुलांकडे एकवार पाहिलं. किती तो आवाज. तिनं पडदा नीटनेटका करताच आवाज गायब. तिने वरच्या हळूवार डोलणाऱ्या पंख्याकडे पाहिलं. तिनं दरवाज्याकडे पाहिलं नि मनूर-कविताकडे पाहिलं. तिनं माझ्याकडे पाहिलं. मी गंध पाहत राहिलो नि ती दार ओढून निघून गेली.

नोराहला मी त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं. ती पुण्यातच होती फिरत. एकदा टिळक रोडवर दिसली, एकदा कॉलेजमधे आणि कित्येकदा माझ्या चाकणमधल्या घराजवळ. पुण्यात मी ख्रिश्चन मुली जास्त पाहिलेल्याच नव्हत्या, त्यामुळे तिचं ते वागणं-चालणं, तिचा वेश सारंच काही माझ्यासाठी नवं होतं. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असणारच, पण त्याहून मला भिती होती ती माझ्याहून बुद़्धीने मोठी असण्याची. बहुधा दहाएक वर्षांचं अंतर असावं. मी कधी तिचा शोध घेतला नाही, पण ती दिसत राहिली सतत इथे-तिथे. बहुधा ती इथली नसावीच. बाहेरून कित्येक लोकं शिकायला पुण्याला येतात, तशीच असावी एखादी. माझ्या घराजवळ कुठलं कॉलेज नाही, त्यामुळे तिचं आसपास असणं थोडं विक्षीप्त वाटायचं मला. ती त्यादिवशी त्या मुलांच्या वस्तीगृहात कशी आणि का आली याचा त्यानंतर कधीच पत्ता लागला नाही. मनूर माझा मित्र, पण त्यानं मला कित्येकदा सांगितलं की त्यादिवशी त्याच्या रूमचा दरवाजा आतून लॉक्ट होता. मलाही आतलं कसं दिसलं याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं नि दु:खही. स्वत:च्या एवढ्या वैयक्तिक गोष्टींमधे कुणाला कशाला इतरांना involve करायला आवडेल? पण मला माहिती नाही हे कसं घडलं. मी वस्तीगृहाबाहेर उभा होतो नि जे पाहिलं ते मला मनूरच्या रूमच्या खिडकीतून दिसलं होतं. अगदी सगळंच. मनूर-कविता, नोराह, ती जांभळसर भिंत, त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या गंधाचे ढग, खिडकीवरचा पडदा, तिची बांगडी-टिकली-केस-डोळे. निळसर डोळे. मनूर म्हटला एकतर तू प्रेमात पडलाहेस किंवा तुला सायकिआट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे. थोड्या खोलात गेल्यावर कळलं की नोराह नावाची कविताची एक मैत्रिण आहे खरी. ख्रिश्चन, पण टिकली लावते. सावळी, भुऱ्या रंगाच्या डोळ्यांची. शांत-शांत असते. कविताला मला इतर गोष्टी सांगण्याची छाती झाली नाही, नि तो विषय तिथेच संपला. 

हे सगळं एखादं वर्षं चाललं. ती इथे-तिथे दिसत राहिली. एके दिवशी मी मुद्दामूनच तिच्या मागे-मागे रस्ता कापत चाललो. वाटलं हा नक्कीच योगायोग नसावा. काहीतरी असणार. मी जवळपास तिचा दोन-तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. संध्याकाळ होत चाललेली नि ती न थकता गल्ल्या-गल्ल्यांतून एकटीच भटकत चाललेली. काहीतरी गुणगुणत. तिनं तिच्या पोटऱ्या अर्धवट झाकल्या जातील एवढा लांबसर काळा झगा घातलेला. तिच्या पायांत पैंजण होते. त्या पैजणांवर जेव्हा डोळे खिळले तेव्हा क्षणभरातच ती त्या गल्लीतून गेली की काय असं वाटलं. मी आजूबाजूला पाहिलं, असंख्य लोक. आवाज. कर्णकर्कश. उन्हाळा. तुळशीबागेत एका क्षणात मी हरवून गेलो. नोराह त्या गंधासारखी भासली. जांभळसर आभाळ एक लक्षात राहिलेलं. नोराहमधे असं काही होतं की जे मी कधीही विसरू शकणार नाही. ती त्या गंधासारखी होती. हातात न येणारी, पण सतत भासणारी. तिच्या मागे-मागे फिरण्याचं वय नव्ह्तं माझं. आता कामाचं, जबाबदारीचं नि कर्तव्याचं आयुष्य जगत चाललेलो मी. असं गल्ल्या-गल्ल्यांत भटकणं परवडणारं नव्हतं.  

नोराह प्रकरणाला कित्येक वर्षं झाली. कामानिमित्त मी अंदमानात दाखल झालो. एके दिवशी मायाबंदरच्या मेन रोडवर फिरताना एक व्यक्ती दिसली. पांढरे केस, कपाळावर टिकली. काळा पायघोळ झगा. तिच्या हातात एक बास्केट होती नि ती रस्त्याकडेला बसलेल्या म्हाताऱ्याकडून भाजी विकत घेत होती. ती तिच्या गुडघ्यात वाकून बसली होती. तिचे ते पांढरे केस सोडले तर ती एखाद़्या बारा वर्षांच्या मुलीसारखी दिसली मला. ती नोराह होती की दुसरं कुणी माहिती नाही. पुण्यातून अंदमान? एवढ्या लांब कशी येऊ शकेल ही? एवढ्या वर्षांनी? एकटीच? मला वाटलं की हे बरंच झालं. इथे आपल्याला कुणी ओळखतही नाही. तिला जाऊन सरळ विचारावंच की काय सुरूय हे? मी तिच्या जवळ जाऊन म्हाताऱ्याला विचारलं, “प्याज कैसा दिआ?” तिला एवढ्या जवळून पाहिलं नव्हतं नि एकदा खात्रीपण करून घ्यायची होती की ही तीच आहे ते. तिचे डोळे निळसर होते, भुरे नाहीत. लेन्सेस? असतीलही. मी घसा खाकरला.
“Hey, this may be weird…but I believe that I have seen you sometime back in Pune. I guess some ten odd years back. You are Norah, right?”

ती बहुतेक पहिल्यांदा दचकली, सावरली पण बुचकाळ्यात पडली. तिचे डोळे थोडे बारीक, मग संशयी, मग निवांत झाले. काय माहिती, पण बहुतेक त्यांचे रंगही त्या-त्या वेळी बदलले. तिच्या कानांतली फुलपाखरं पंखांची सावकाश हालचाल करताहेत का काय असा मला भास झाला. मायाबंदर त्सुनामीमधे गडप झालंय…काळोख पसरलाय…पाण्याचा घनगर्द आवाज कानांत साठून राहिलाय…आभाळ निळसर मग जांभळ मग गुलाबीसर होत चाललंय…एक फार ओळखीचं, मन शांत करणारं गाणं फार दूरवरून ऐकू येतंय; त्याच्या जवळ जाऊ वाटतंय…एक नाव चांद्ण्यांच्या लाटांवर स्वार झालीय नि एक चंद्र गालांवर दोन्ही हात ठेवून त्या नावेला पहात बसलाय. एवढ्या जाळ्यात मी एकटाच कोरडा आहे. माझ्या आजूबाजूचं एक मीटरचं वर्तुळ पुर्णपणे कोरडं आहे. मी जमिन पाहतोय नि ती मऊसर आहे. पायांतल्या चपलांचा पत्ता नाही. तिने तिच्या निळसर डोळ्यांनी म्हटलं –
“Yeah. My name is Norah. Nice to meet you mister…”
“Pankaj.”
“Pankaj. हो, मी होते पुण्यात. दहा वर्षांपुर्वी? बहुतेक. कविता सांगायची तुझ्याबद़्दल. तूच ना तो?”
“अं…नाही, बहुतेक तो मनूर असेल.”
“Oh yeah, yeah. मनूर…मनूर. Sorry, I forgot. बहुतेक आपण भेटलेलो नाहीये.”
“हं…नाही भेटलेलोय, पण मी तुला पाहिलंय कित्येकदा.”
“आह…मला तर असं हजारो-लाखो लोकांनी पाहिलं असेल! How does that…”
“त्यादिवशी तू उभी होतीस ना त्या दारात? कविता-मनूर…”
“कोणता दरवाजा?”
“त्यादिवशी ते गाणं ऐकत पडले होते दोघंच. तू त्या खोलीत येऊन खिडकीवरचा पडदा सारलास…नि परत त्यादिवशी मी तुझा पाठलाग करत होतो, तू बराच वेळ चाललीस नि गायब झालीस. तो गंध…तो जांभळा रंग…”
“पंकज तुला काहीतरी गैरसमज झालाय. त्या दोघांच्या मधे मी कशाला जाईन? And I don’t remember any of this…”

तेव्हाही असंच काहीसं झालं. तो गंध, एक गाणं दूरवर चाललेलं नि जांभळसर आभाळ. क्षणात वाटलेलं की मायाबंदरच्या पुढच्या वळणावर स्वारगेट येईल आणि माझ्या राहत्या खोलीच्या भिंतीपलीकडे मनूर-कविता एकत्र बसलेले असतील. डोकं दुखू लागलं तसं मी माझ्या मायाबंदरच्या खोलीवर परतलो. मनूरला फोन लावला. त्याला सांगितलं नोराहबद़्दल. त्यानं सांगितलं की नोराह ही साधी-सुधी मुलगी नाहीये. ती तांत्रिक-विद़्या शिकलीय. तिला लोकांना भुरळ पाडता येते, वेड लावता येतं. काही लोकांनी तर तिच्या मागं लागून आत्महत्यापण केल्यात. तिचं बालपण फार विकृत होतं. तिच्या लहानपणापासूनच तिला या असल्या गोष्टींचा फार नाद. तिच्या घरी वाढवलेल्या गुलाबांवर ती तिचे प्रयोग करायची. त्या असंख्य गुलाबांच्या अगणित आत्मा तिच्या भोवतीच फिरत असतात म्हणे. तिला एक विशिष्ट गंध आहे. तुला जाणवलं का असं काही? मी ‘नाही’ सांगताच तो पुढे सांगू लागला. बरं झालं. ज्यांना त्या गंधाचा लळा लागतो त्यांना ती दिसत राहते. भेटत राहते असं म्हणतात. कविताची रूममेट होती ती! मी ज्यावेळी या गोष्टी ऐकल्या तेव्हा मला फार भिती वाटलेली यार! कविता या सर्वातून सहीसलामत सुटली. अजून एक गोष्ट…तिनं तिच्या कुठल्याशा प्रयोगात बऱ्याचशा शब्दांना, स्वरांना नि वाद़्यांना जीव दिला. ती चालू-बोलू लागली, पण जशी ती जगली तशीच पटापट ती मेली. त्यांचे आत्मे तिच्या भोवतीच असतात म्हणे. जी व्यक्ती तिचा तो गंध जाणते, ज्याला ते एक गाणंसं ऐकू येतं नि ज्याला तिची दृष्टी दिसते, त्या व्यक्तीवर नोराह पुर्णपणे आरूढ झालेली असते. मग तिच्यापासून सुटका नाही. तुला आठवतोय का तो विवेक नि मानस? त्यांना तिनं असंच गिळंकृत केलंय. तू या भानगडींत नको पडूस. हनुमान चालिसा वाच नाहीतर राम-रक्षा. नाहीतर बायबल वाच रे बाबा!

मनूरशी बोलल्यावर मी बराच वेळ बेडवर पडून राहिलो. पंखा हळूवार फिरत राहिला. खोलीबाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज क्षीण होत गेला नि एकच ओळखीचं गाणं खोलीभर झालं. आभाळ निळसर होत गेलं. गंध गडद होत गेला. नोराहची छाया दाराला टेकून उभी असलेली दिसली. डोळे मिटू लागले. मन शांत होत गेलं. पेशी-पेशींपर्यंत तिचा गंध पसरत गेला. तिने माझ्या गालांवरून हात फिरवला. गालांवर ओठ टेकवले. अचानक भरून आलेल्या थंडीत गालाचा तेवढाच भाग ऊबदार वाटला. तिच्या कानांतली फुलपाखरं खोलीभर उडू लागली. निळसर, पिवळ्या ठिपक्यांची. ती खोलीच्या पडद़्याजवळ गेली. तिने तो बाजूला सारला नि बाहेर पाहिलं. मग तो नीटनेटका करून ती बेडवर माझ्या शेजारी येऊन पडली. वरचा पंखा गडप झालेला. तिथे रात्र नि चांदण्यांत हरवलेली एक नाव दिसत होती.

खाड़्कन आवाज आला नि खिडकी जोरात आपटली. मी दचकून उडी मारली. मनूरने रागाने माझ्याकडे बघत खिडकी बंद केली. त्याला प्रकाश अजिबातच नको होता त्याच्या खोलीत. कविता असताना तर नाहीच नाही. मी पुण्यात होतो, वस्तीगृहाबाहेर. मनूरने पडदा झटक्यात ओढला. काय झालं? नोराह? अंदमान? काळी जादू? मला काहीच कळेनासं झालं. मी पुन्हा वर पाहिलं. मनूरच्या खिडकीतला पडदा कुणीतरी तात्पुरता बाजूला सारला होता नि गंधांचे ढगच्या ढग माझ्या बाजूने येत होते. सुरूवात झाली होती.
                                                                                                                                                                                                                                            पंकज कोपर्डे
२१ मे २०१६
abstract art (sketch) accessed from <https://in.pinterest.com/jlcondel/art-class-abstract-faces/> on 26 June 2016

सोमवार, १३ जून, २०१६

के रात्री मी ‘ळ’ आकाराचं भूत पाहिलं. वाटलं, स्वप्नासारखं स्वप्न असेल. डोळे उघडून उठून बसलो. अंधारल्या त्या खोलीत जिथून चंद्राचा प्रकाश येत होता, तिथे ते ळ तरंगत होतं. मला पहिल्यांदा विश्वास नाही बसला. मी जवळचं पाणी प्यालो नि डोळे ताणून बघू लागलो. ते ळ तरंगतच राहिलं. मी कपाळावरचा घाम पुसला. ठरवलं की आता उठून त्याला हात लावावा. काही भुतं आपल्याला त्रास देत नाहीत, त्यांना फक्त तुमच्याशी बोलायचं असतं. ळला जर मला त्रास द़्यायचा असता तर त्याने तो दिला असता. पण बहुतेक ळ त्यांच्यातलं नव्हतं. मी कसाबसा उठलो. छाती धडधडत होतीच. मी हळूहळू ळकडे जाऊ लागलो. मी जसजसा जवळ जायचो, ळ तसतसं लांब सरकायचं. मी दोन-चार पावलं झपाझप टाकली, आणि ळ अद्रुश्य झालं. मला काहीच समजेनासं झालं. मी माघारी बेडवर येऊन पडलो. छताकडे एकटक बघत. डोळे मिटले नि पुन्हा लगेच उघडले तर ळ पुन्हा छतावर प्रगट. ळच्या मनात नक्कीच काहीतरी सलत होतं, पण काय? या भुताला तर मानवी चेहराच नव्हता. त्याला फक्त एक आकार होता. बहुतेक हे आदिकालीन भूत असावं. ज्यावेळी पृथ्वीवर जीव-सृष्टी अवतरत होती. तसाच कुठलासा सजीव असावा. त्याला मला कळेल असा काही आकार नाही, पण दु:ख तर अपरंपार आहे. मी त्याच्याकडे एकटक पाहत विचार करत राहिलो काही क्षण. मग वाटलं त्याच्याशी बोलावं. मराठीतून की इंग्रजीतून? कळेल आपली भाषा त्याला? मराठी आणि इंग्रजी काय? त्याच्यासाठी साऱ्याच भाषा नव्या असणार! आपली भूतकाळाची झेप ती किती? दोन-पाचशे वर्षांची! या भुताला सारं माहिती असेल का? त्याला प्रश्न विचारता येतील, भूतकाळाबद़्दलचे, उत्क्रांतीवरचे! मी पुन्हा एकदा ळकडे बघितलं.

“हॅलो! नमस्कार!”

ळ काहीच बोललं नाही. त्याचं तरंगण क्षणभर थांबल्यासारखं झालं पण तेवढंच.

“तुम्ही कसे आहात? तुमचा जन्म कधी झाला? माझा एकोणावीसशे सत्त्याएशी साली. तुम्ही फारच म्हातारे असाल ना? तुम्हाला जे हवं ते बोला. मला माहितीय की तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला.”
ळ पुन्हा अद्रुश्य झालं. मला कळलं नाही, पण वाटलं त्याला आपलं बोलणं थोडंफार तरी कळलंच असेल. नाहीतर ते एवढा वेळ थांबलं नसतं. माझ्या बोलण्यात त्याला काहीतरी तथ्य वाटलं असणार आहे. मग माझं मन शांत झालं आणि कधीच लागली नाही अशी गाढ झोप लागली. मी कधी झोपलो मला कळलं नाही. मला त्या रात्री नंतर काही स्वप्नं पडली नाहीत. असं वाटत होतं की झोपेच्या काळ्या डोहात कुणीतरी मला जोरात खेचून नेलंय.त्या दिवसानंतर ळच्या अस्तित्वावर कधी विचार आला नाही डोक्यात, मागच्या महिन्यापर्यंत. मागच्या महिन्यात पुन्हा मला ळ दिसलं. पण यावेळी टेबलावर ठेवलेल्या माझ्या चष्म्यात. बहुतेक ळमधे रूप बदलण्याची शक्ती असावी. त्या रात्री मला जे दिसलं ते बहुतेक ळचं खरं रूप असावं. माणसांमधेही असंच असतं ना. ज्यावेळी जन्म होतो, त्यावेळी सारेच नागडे असतात; मग अंगावर हवी तशी, आवडणारी कपडे चढवू लागतात. ळचा बहुतेक त्या रात्री जन्म झाला असावा. म्हणजे ते पहिल्यांदाच कुणासमोर तरी प्रगट झालं असावं. पण भुताला या गोष्टींची लाज का? आहे त्या आकारात रहावं. दुसरा छान आकार मिळत असेल तर का नाही घ्यावा? मी माझ्या चष्म्याकडे एकटक पाहत राहिलो. विचार करू लागलो. ळला आकाराचा लोभ झाला का? म्हणजे ळला जाणवतंय की त्याला कुणीतरी व्हायचंय. ळ बहुतेक कुणी क्लिष्ट सजीव असावा. One of those primitive organisms with a complex physiology. ळने माझ्यासाठी विचारांचं एक नवं दालन उघडं केलं. पण मला हा प्रश्न पडला की मी हा चष्मा डोळ्यांवर चढवू की नको? ळने जर माझ्या डोळ्यांत प्रवेश केला तर?

या प्रसंगानंतर ळ मला सतत दिसू लागलं. सर्वत्र. ळमधे फार लवचिकता होती. ते जवळपास सगळयाच आकारांत समाविष्ट व्हायचं. बायकोबरोबर बाजारात फिरताना समोरून येणाऱ्या स्त्रियांच्या छातीवर दिसायचं, कमोडवर बसलो तर खाली सोडलेल्या बॉक्सरमधे दिसायचं. रात्री बारमधे निऑन साईनच्या लाईटमधे दिसायचं, बीअरमधल्या वर येणाऱ्या बुडबुड्यांमधे दिसायचं. हेडफोनच्या वायरच्या गुंत्यामधे दिसायचं, स्वत:च्या बोटांच्या गुंत्यामधे दिसायचं. दुर्बिणीच्या लेन्सेसमधे दिसायचं, नदीमधल्या छोट्या भोवऱ्यांमधे दिसायचं. स्वत: लिहीलेल्या वाक्यांमधे दिसायचं, कंटाळा आला म्हणून केलेल्या डुडल्समधे दिसायचं. हिनं तेलात टाकलेल्या भज्यांमधे दिसायचं, मी केलेल्या टू-मिनीट़्स नूडल्समधे दिसायचं. महान चित्रकारांच्या Abstract art मधे दिसायचं आणि ज्याचा मला बोध लागत नाही अशा अमर्यादतेत दिसायचं. माझ्या ळ जीवनाचा ळने ळक्षणी येऊन ळ करून टाकला. सतत सगळीकडे ळ. त्या ळमुळे माझ्या अभ्यासिकेत माझ्या वाक्यांना ळचीच लागण झाली. बघावं तिथे ळ. न संपणारं, माझा पिच्छा न सोडणारं ळ. घर सोडून कुठे चार दिवस फिरू म्हटलो तरी जागांच्या नावांत ळ - महाबळेश्वर, कर्नाळा, अर्नाळा, जावळी, राळेगण-सिद़्धी, अंमळनेर! काही वेगळं खाऊ म्हटलं तर तिथेही ळ - केळी, पोळी, जांभूळ, डोकेदुखीची गोळी, मेथीत अळी! कुणाला जाऊन भेटावं म्हटलं तर भेटणारे पण असेच - माळी, कोळी, नरसाळी, फुकट़्यांची टोळी! पक्षीनिरीक्षणाला जावं तर तिथेही बगळे त्यांच्या मानांचे ळ करून उडणारे! कुणाच्या नाठाळ बाळाला खेळवायचंही जीवावर आलं माझ्या. वेळ पाळू की नको कळेनासं झालं. जिथं मी ळ नाही वाचळं तिथेही ळच. ळचं भूत माझ्या मानगुटीवर ठिय्या मांडून बसळं. ळने खरंच त्रास द़्यायळा सुरूवात केळी. ळच्या भानगडीत माझ्या जीभेची दाणादाण उडाळी. मी शक्यतो ळ अक्षर असलेले शब्द वापरणं टाळू ळागळो. इंग्रजीतून बोलू लागलो, पण कॉळेजमधे गणिताच्या तासाला ते infinity चं चिन्ह ब्रम्ह म्हणून उभं राहू लागलं. माझ्या विद़्यार्थ्यांना कळेनासं झाळं की मळा काय होतंय. त्या infinity च्या चिन्हाकडे बघून वाटायचं की एक अमर्याद ळांबी रूंदी उंचीचा मळा आहे आणि त्यात मळा एकट्याळा सोडून ळ दूरदूर चाळळंय. या गोष्टीचा शोध घ्यायचं कामच नव्हतं कारण या अनंताच्या गोष्टी होत्या, ज्या माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाकडून कशा सोडवळ्या जातीळ. पण ळचं दु:ख बहुतेक तिथेच कुठेतरी अडकळेळं. तीनेक वर्षं या ळने मला सतावळं पण काळ ते रात्री त्याच्या पुर्वीच्याच रूपात दिसळं.

काळ रात्री मळा झोपायळा तीन वाजळे. अंधारात पाहत बसळेळो एकटाच. माडीवर बायकोचं डोकं नि तिच्या केसांचा झाळेळा ळ. त्या सुरेख ळकडे पाहिळं. आजवर या ळंमधे मला सतत त्रास का दिसळा? असा विचार करू ळागळो. या केसांच्या ळमधे त्रास काहीच नव्हता. त्याचा आकारच तसा आहे, त्याळा कोण काय करणार? हे ळ भूत बहुतेक स्वत:च्या आकारावर नाही, तर अस्तित्वावर नाराज असावं. त्याच्या अस्तित्वाचा अंत नाही. काळाप्रमाणे ळ आहे. ळ हा खरा काळ आहे. मी बेडवरून उडी मारून उठलो. उत्तर जवळ होतं. ळ मला त्यारात्री जसं अंधारात दिसळं तसं आज अगदी जवळ दिसळं. माझा समोरच ते तरंगत होतं. मी हात पुढे केळा, पण त्याला स्पर्श करू शकळो नाही. हात त्यातून आरपार गेळा. मी त्याला म्हटळं –

“मळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय बहुतेक आणि मी त्याचा सर्वतोपरी शोध घेईन.”

ळचं तरंगण क्षणभर थांबळं. ते माझ्या उत्तराची अपेक्षा करत होतं.

“तू काळाचं भूत आहेस ना? तुझ्यातल्या “का” हरवलाय आणि तू त्याला शोधतोहेस. का आहेस तू असा अमर्याद? वेळेसारखा. मला माहिती नाही, पण तुझ्या अस्तित्वाशिवाय आमचं अस्तित्व नाही. त्यामुळे तू या प्रश्नावर अश्रू गाळू नकोस मित्रा. तुझ्या अमर्यादेत कुठेतरी तुळा रेषा आहेत त्यामुळे तू ळ आहेस. नाहीतर ल असतास, दोन उघड्या वर्तुळांचा. पण तू ळ आहेस आणि आमच्या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांसाठी तू फार चांगलं dumping ground आहेस. तू फार चांगलं काम करतोहेस ळ. आज जगातली किती लोकं तुझ्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या कितीतरी प्रश्नांसाठी ‘वेळ’ हेच उत्तर आहे!”

ळ तरंगत तरंगत आकाशाकडे निघालं आणि मग अदृश्य झालं. मला फार आनंद झाला. जीभ मोकळी मोकळी झाली. ळ आणि लच्या व्याख्या सांगितल्या की काय मी! मी घरात आलो. बायको ळ आकाराची मांडी घालून माझी वाट पाहत होती. पुढचं भांडण होतंच अट‘ळ’!

पंकज कोपर्डे
११ जून २०१६
  

रविवार, १५ मे, २०१६

मॅडोना

पुन्नामा नि मरदाचलम यांच्याकडे कुत्र्याची दोन पिल्लं आहेत. या चौघांचा परिवार दक्षिण भारतातल्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या एका छोट्याशा आलमरमेडू नावाच्या गावात राहतो. हे गाव तमिळनाडू-केरळ यांच्या सीमारेषेवर वसलेलं आहे. त्यामुळे या गावातली लोकं तमिळ नि मल्याळमही बोलतात. गाव अगदी छोटं. कोईंबतूरवरून येणारी नि अनैकट़्टीकडे जाणारी बस या गावात जिथे थांबते, तिथेच गावाचा मध्य आहे. दोन किराण्याची दुकानं, एक चहाचं दुकान, एक घरगुती हॉटेल आणि एक मोबाईल शॉप एवढा गावाचा पसारा. किराण्याच्या दुकानापुढे येणारी बस थांबते नि जाणारी थांबते त्याच्या बरोबर विरुद़्ध दिशेला. या गावात बस-स्टॅण्ड बांधण्याची आवश्यकता मागच्या पंधरा-वीस वर्षांततरी कुणाला वाटली नाहीये. गावाच्या आजूबाजूला छान डोंगररांगा आहेत. छोटी-छोटी शेतं आहेत नि एक वीटभट़्टी आहे. मॅडोनाचा जन्म तिथलाच.

मॅडोनाची आई सरस्वती तिच्या लहानपणापासूनच अंगानं सडपातळ नि उपद़्व्यापी. ती जेव्हा वयात आली तेव्हा ती वयात आलीय याचीही जाण तिला नव्हती. आपल्या जातीबांधवांबरोबर कुठं ससा पकड, कुठे मांजरीला त्रास दे तर कुठे गाईंवर जरब दाखव असलेच उपद्व्याप ती करत राहिली. आतून तिला वाटत होतं की काहीतरी वेगळं होतंय, न समजणाऱ्या कोमल पण सुखद वेदना होताहेत. शंकर नि कुमार सतत आपल्या बाजूला घुटमळताहेत. शंकर अगदीच चिडखोर झालाय नि त्यांच्या मित्रांवर चिडून हल्ले करतोय. शंकर थोडा जाडसर मातकट रंगाचा उमदा जवान कुत्रा होता. त्याच्या साऱ्या जातीबांधवांत तोच एकटा उठून दिसायचा. त्याला माहिती होतं, आता जास्त वेळ उरलेला नाहीये. सरस्वती त्याचीच आहे, पण त्याला याचीही चिंता होती की त्याचे सारेच मित्र त्याच्यावर उलटले तर त्याला पळता भुई थोडी होईल. त्याला वाटत होतं की एखाद्य़ा क्षणी जेव्हा आजूबाजूला कुणी नसेल तेव्हा सरस्वतीला घ्यावं. तो तोच क्षण शोधत होता, पण कुमारही अगदी मनापासून सरस्वतीच्यामागे मागे फिरत होता. त्याच्याही डोक्यात तेच असेल. सरस्वती अल्लड होती. चारचौघांत असताना ती शेपूट घालून लांब-लांब पळत होती नि फक्त शंकर नि कुमार असताना दोघांनाही आपल्या गंधाने वेडं करून मनातल्या मनात हसत होती. तिला बहुतेक त्यात मजा वाटत होती, पण त्याचबरोबर आतून तिलाही आस लागली होती. शंकर तिच्यासाठी योग्य होता, आता पुढचं सारं त्याच्यावर होतं.

हे सगळं झालं ते एका विझत चाललेल्या संध्याकाळी. वीटभट़्टी जवळ. कामगार घराकडे परतलेले. कुत्र्यांची टोळकी आसूसून ओरडत होती. एका वीटभट़्टी आड संधी साधून शंकर सरस्वती या चाटू लागला. पाचेक सेकंदातच ती विरघळली नि तिनं होकार कळवला. शंकर अधाशीपणे तिच्यावर चढला, तेवढ्यात कुमार चारेक कुत्र्यांचं टोळकं घेऊन शंकरवर चालून आला. शंकरची अवस्था नाजूक होती, त्यानं लागलीच समागम सोडून कुत्र्यांवर हल्ला बोलला. सरस्वती शेपूट घालून कोपऱ्यात जाऊन बसली. चारही कुत्रे चारी दिशांना पळाले, शंकर त्यांच्यामागे. कुमारला हीच संधी हवी होती. त्यानं सरस्वतीला डोक्याने रेटून उठवायला सुरूवात केली. सरस्वतीला गप्प बसवेना. शंकरबरोबर जे होत होतं ते तिला प्रचंड हवं-हवंसं वाटत होतं. तिला कुणीतरी हवं होतं. ही तिची पहिलीच वेळ होती. कुमार तिथे होता. पुढे काही दिवसांनी सरस्वतीला चार पिल्लं झाली, त्यातली दोन पहिल्या पावसात मेली. त्यांची शवं वीटभट़्टीमागे पोत्यावर दोनेक दिवस पडून होती नि नंतर रानडुक्करांनी रानात पळवून नेली. मॅडोना नि मायकेल उरले.

दोघेही बारीक, बुटके, मातकट रंगाचे. दोघांनाही पायांना दोन-दोन नखं जास्त. दोघेही जुळ्यासारखे. मॅडोनाचा जन्म झाला त्यावेळी मी २६ वर्षांचा होतो. पुढे २०१६ मधे मी तिला पाहिलं तेव्हा ती तीन वर्षांची झालेली नि मी २९ चा. या तीन वर्षांत ती माझ्यापेक्षा कित्येक गोष्टी जास्त शिकली. तिचा भाऊ मायकेल मागच्यावर्षी कुठल्याशा आजाराने तडफून-तडफून मेला. बहुधा त्यानं रानातलं कुठलं सडलेलं मांस खाल्लं असणार. त्याचे शेवटचे काही दिवस फार वाईट गेले. बऱ्याचदा असं वाटायचं की त्याला मारून टाकावं. हा निर्णय आम्हा संशोधकांमधे लागलीच झाला नाही. मग जनावरांच्या डॉक्टरला बोलवून योग्य ते करावं लागलं. मायकेलच्या मृत्युनंतर मॅडोना एकटी पडली. तिच्या आईच्या गावापासून ती दोनेक किलोमीटर दूर राहत होती. तिला तिची आई-बाबा, मित्र कुणी नको होते. मायकेल नि ती, दोघेही कळत्या वयाचे झाल्यावर एके दिवशी मरदाचलमच्या गाडीमागे आमच्या संस्थेत दाखल झाले. तेव्हा संस्थेच्या आवारात इतर कुणी कुत्रं नव्हतं. सनी होती, पण ती म्हातारी होऊन दोनेक वर्षाखाली वारली. मायकेल नि मॅडोना दोघेही साऱ्याच संशोधकांचे लाडके झाले. त्यांना खाद़्य अमाप होतं, पण त्यांना बहुतेक ते जायचं नाही. अंगाने दोघेही सडपातळच पण त्यात काही सुधारणा झाली नाही.

मॅडोना एकटी पडल्यावर ती बऱ्याचदा हॉस्टेलजवळ बसून रहायची. अजूनही राहते. तिच्या भावाच्या मृत्युचा फटका तिला सहन झाला नसावा. ती इतर कुत्र्यांसारखी कळपात कधी राहिलीच नाही. ती एकटीच राहिली, तिचा भाऊही तसाच. त्या दोघांचं या बाबतीत मला सतत नवल वाटायचं. बहुधा तिनं स्वत:चं आयुष्य स्वत:च आखलं असावं. मागच्या तीन वर्षांत ती तिचं घर सोडून आली, परिवार सोडून आली, कुत्र्यांच्या सवयी सोडून आली. मला हे शक्य झालं असतं का? मी तिला थोपटतो, तिच्या डोक्याला मालीश करतो, तेवढा वेळ ती बसून राहते नि फटक्यात पळून जाते. तिला प्रेमाची ओढ नसावी किंवा तिला मन रमेल अशी ठिकाणं बनवायला नको असावीत. ती अगदीच संन्याशासारखी. अंगावरली मोह-माया सोडवायला मला किती विचार करावा लागेल बरं? सांगता येत नाही. या विचारांतच आयुष्य संपून जाईल. मॅडोनाने ते लीलया केलंय. तिनं बहुधा जास्त विचार केला नसेल या गोष्टींचा. तिला तिचा भाऊ गेला याचंच दु:ख जास्त खुपत असणार. तिनं तिच्या भावाला स्वत:च्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं. एखाद़्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शेवटच्या आठवणे एवढ्या क्रूर नसाव्यात, पण तिच्याबाबतीत त्या आहेत. ती वयात आलीय तसा एक शंकरसारखा उमदा कुत्रा आता आमच्या संस्थेच्या आवारात दिसतो बऱ्याचदा. सेबॅशचिअन नाव त्याचं. एक टिंगू नावाचा कुत्राही घुटमळतोय, तो कुमारसारखा असावा.

मॅडोना दूरवर पाहत राहते. तिचं नाक सतत ओलं असतं नि ती सतत काहीतरी हुंगत असते. तिच्या आईपेक्षा ती कितीतरी शांत आहे. मायकेलला जाऊन आता वर्ष उलटत आलंय. तिच्या हुंगण्यात तिला मायकेलचा गंध मिळतोय की काय असं मला वाटत राहतं. मी तिला माझ्याच नजरेतून पाहत राहतो. मनुष्याच्या नजरेतून. ती बहुधा मायकेलला विसरून गेली असेल, विसरून गेली असेल तिचं घर, आई-बाबा, वीटभट़्टी. ती बहुधा जनावरांचा वास घेत असेल. तिला जिंकणं अवघडंय. सेबॅशचिअन किंवा टिंगू, दोघांनाही तिचा गंध इथवर खेचत आलाय. मॅडोनाला जिंकायला किती काळ जाईल काय माहिती!
पंकज कोपर्डे
१५ मे २०१६  

शनिवार, ७ मे, २०१६

देवी

चांदण्यात हरवलेलो असताना,
जमिनीवर वाट पाहत थांबलेली ती;
जमिनीकडे जेव्हा नजर फिरली
तेव्हा चांदण्यात सामावलेली ती!
आठवणींत जेव्हा डोकावतो,
तिच्या बांगड्यांचा घुमतो आवाज;
वाटतं ती आहे आसपास नि
मन फिरून रमतं आठवणींच्या आवाजात.
रस्ते तुडवले कित्येक, रानं जगलो कित्येक,
भुताखेतांच्या गराड्यात, सापळ्यात अडकलो कित्येक,
ती एक आठवण, आशा, निर्धार म्हणून पाठीशी सतत,
तरी मी खुळ्यासारखा देवाला मानत आलो कित्येक!
ती असतेच इथे कुठेतरी; अवतीभवती दरवळते.
तिचं असणं इतकं सवयीचं की ती नकळत कळल्यासारखी.
मी जातो जेव्हा दूरवर, भुतांच्या राज्यात, हाकेच्याही पलीकडे,;
ती झटक्यात प्रगटते मनात, देवीसारखी...नाव आहे तिचं आई.

माझ्या म्हणून साऱ्यांच्याच, आईसाठी!
पंकज कोपर्डे

८ मे २०१६  

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

७:८५

का दिवशीची संध्याकाळ आठवते. तेव्हा मी घड्याळात ७:८५ वाजलेले पाहिले होते. घड्याळातला हा आकडा मला अगदीच सवयीचा झाला होता. ७:८५ वाजणे साहजिक होते. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ असतानाही हाच आकडा मी घड्याळात पहायचो. मला हा प्रश्नही पडलेला अंधुकसा आठवतो की मी ते घड्याळ हातात घेऊन का फिरतोय? वेळ ७:८५ आहे नि ती बदलणारी नाही हे माहिती असतानाही. त्यावेळेस मी स्वत:ला फार समाधानकारक उत्तर देऊन वेळेच्या काळजीतून बाहेर पडलो होतो. आता उत्तर आठवत नाही, पण ४३ दिवसांपुर्वी incognito window मधे काय काय पाहिलं होतं ते काहीसं आठवतं. अजून डोक्याला ताण दिला तर ७८ व्या दिवसांपुर्वीचं सुदधा आठवेल. कधी कधी बुद्धीचं कौतुक वाटतं माझं मलाच. हे कौतुक मनातल्या मनातच मन मनाला करतं. ती एक सुखद भावना आहे. गवताच्या पात्यावर सकाळच्या दिवशी थांबलेले दवबिंदु मोत्यासारखे दिसतात, तसं ते कौतुक वाटतं. त्या दवबिंदुंना मोत्यांबरोबर तोलणं योग्य नाही. या क्षणभंगुर आनंदांना कोंदण घालण्यातही काही अर्थ वाटत नाही.

मी सकाळी ७:८५ ला उठतो; आवरतो; खातो; कामाला जातो; ७:८५ ची लोकल अजिबातच टाळत नाही. कारण ती टाळली तर पुढची ७:८५ लाच असते. एवढा वेळ कोण थांबणार? कामाची वेळ ७:८५ ते ७:८५. कामाच्या वेळेत घड्याळ बघायचं कामच नाही, कारण वेळ ती शांत उभी असते. तिला मन:शांतीची गरज नाही. ७:८५ ला ऑफिस सुटतं. मी घरी येतो, खातो, आराम करतो, आयुष्य चाखतो नि झोपी जातो ७:८५ ला. वेळेचं माझ्या आयुष्यात खरचं काही महत्त्व नाहीये. कारण येणारा-जाणारा दिवस तसा ठरल्यासारखाच असतो. जशी ती मनगटावरची वेळ ठरलेली आहे. एका क्षणी वाटतं की माझ्या मनगटावर ही वेळ कधी नि कुणी बसवली त्याचा शोध घ्यावा नि त्याला माझ्या आयुष्याचा जाब विचारावा. इतर लोकं म्हणतात तुझ्या आयुष्याचा जाब विचारायला तुझ्या चुका तरी तुला आठवतात का? ४३ दिवसांपुर्वीचं तुला आठवत नाही, मग ७:८५ चं कसं आठवेल?

त्या दिवशी मी पाणीपुरी खात संध्याकाळ घालवत होतो नि घड्याळात पाहिलं. ७:८६ वाजलेले. वाटलं हाच तो क्षण जो पकडून ठेवावा मुठीत. आणि आत्ताच्या आता याचा जाब विचारावा जगाला. मनगटावरचं घड्याळ पकडायला गेलो तर पाणीपुरीची प्लेट अंगावर सांडली, आवरण्याच्या नादात कळलंच नाही किती वेळ गेला. झोपताना घड्याळात ७:८५ ला गजर लावून झोपलो. ते जुनाट आयुष्य सोडण्याचं धैर्य घड्याळालाही झालं नाही.
पंकज

२९ एप्रिल २०१६   

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

व्याकरण

तुझ्या वाक्यांत गुंतलेल्या शब्दांना
गुलाबांचा गंध
वेलींनी वेटोळलेल्या वेलांट्यांना
रेशमाची गाठ

अक्षरांच्या डोक्यांवरती गवताळ टोप्या
वाऱ्याला झुरणाऱ्या
‘ळ’ म्हणजे ‘क’ थोडा लाजलेला
ळोवळा…

स्वल्पविरामांना धडधडणारी छाती
ठोके चुकवणारी…काळजाचे
अर्धविरामांत जीव गुंतून पडलेला
उन्हाळी गर्द सावलीत!

तुझी वाक्यं ओहोळांत सोडलेले पाय
कवडसांच्या कोलाजात
पुर्णविरामांत तुझ्या वेळ थांबलेला
संध्याकाळ…संध्याळाळ.

       - पंकज (१ मार्च २०१६)

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सुमात्री गेंडा नामशेष का झाला?

प्रश्न वरवर सोप्पा वाटतो, पण याची उत्तरं स्थळ-काळानुसार बदलत गेलीहेत. या एका प्रश्नाभोवती, मला वाटतं, अख्खं जग रूंजी घालत असणार आहे…होतं…आणि असेल. प्रश्न फक्त सुमात्री गेंड्याचा नाहीये, एका प्राण्याचा नाहीये, उत्क्रांतीतून लाखो वर्षे पृथ्वीतलावर जगलेल्या घटनेचा नाहीये…प्रश्न श्वर-नश्वराचा आहे. काय उरतं नि कसं उरतं याचा आहे. ज्यांच्याकडे जगाला समणारी भाषा नाही, त्या प्राण्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती नि त्यांचं जग या साऱ्यांना माणसाने लावलेला अर्थ ते-ते प्राणी गेल्यावर उरणार. या सुमात्री गेंड्याला फार पुर्वीपासूनच स्वत:चा आवाज नव्हता. या जातीने कधी इतरांकडे मान वर करून पाहिलं नाही. सकाळ ते संध्याकाळ ते चरत राहिले, चिखलाळलेल्या प्रदेशांत लोळत राहिले. ती त्यांच्यासाठी घाण कधीच नव्हती. ते त्यांचं आयुष्य होतं. या त्यांच्या आयुष्यात कित्येक शतकं फरक कधी पडलेला नव्हता. ते अगदीच शांत मनाने चरत-जगत होते. ते चालायचे नि फिरायचे. जिथे चारा नि चिखल तिथे ते जायचे. त्यांनी समुद्र पार केले नाहीत, त्यांना त्याची कधी आवश्यकता भासली नाही. त्यांना कधी कुणाचं भय नव्हतं, कारण त्यांना वाटायचं की सारे आपल्यासारखेच असतील. शांत-समजूतदार. साऱ्यांनाच चारा आवडत असणार, कोण कशाला त्याला आग लावेल? साऱ्यांनाच चिखल आवडत असणार, कोण कशाला त्यावर ईमारती उभारायला येणार? त्यांना वाटत होतं की आपली कातडी, आपली शिंगं…कोणाला कशाला हवी असणार? पण सुमात्री गेंडे अगदीच मुर्खासारखे अनभिञ राहिले नि सरतेशेवटी जातीपुरतेही नाही उरले.

सुमात्री गेंडे काय किंवा भारतीय चित्ता काय किंवा Laughing Owl (हसरी घुबडं!) काय किंवा तो दुर्बल-असहाय डोडो काय किंवा PassengerPigeon (प्रवासी कबूतर!) काय किंवा अंदमानातल्या, अमेरिकेतल्या, ऒस्ट्रेलियातल्या नामशेष जमाती काय…सारे एकाच माळेचे मणी. आले नि गेले, कुणाला काय पत्ता. हे सारे लोक, इतर बलाढ्य ‘संस्कृतीं’समोर टिकाव धरू शकले नाहीत. इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही सुमात्री गेंडा स्वत:च्या अंगावर बुलेट प्रुफ् कवच धारण करू शकला नाही की चारा-चिखलाचा नाद सोडू शकला नाही. तो बिचारा मरणारच होता, नामशेष होणारच होता. कुणाला कधी त्याची गरज भासली नाही किंवा त्याने कधी असे दाखवलेही नाही की जगाला त्याची गरज भासू शकते. आजूबाजूला आता स्वकीय उरलेले नाहीत हे पाहून तो बिचारा दु:खात डुंबलेला असेल. आपली भाषा समजणारं आजूबाजूला कुणी नाही हे पाहून त्या गेंड्याला जगण्यात स्वारस्य उरलेलं नसेल. तो त्याचं घर सोडून कायमचा निघून जाणार म्हटल्यावर, नैसर्गिक परिसंस्थेमधे किती मोठी पोकळी निर्माण होईल याचाही त्याला किंवा इतरांना अंदाज आला नसावा. त्याला तसं पण या साऱ्या गोष्टींमधे कधीच रस नव्हता म्हणा. चिखल नि चाऱ्यापुढे त्याला काहीच गोड नाही लागलं.


सुमात्री गेंडा हातातून जातोय म्हटल्यावर संशोधकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी जंगली गेंड्यांना प्राणी-संग्रहालयात हलवले. तिथे त्यांना ‘better life’ दिली. योग्य ते अन्न, पाणी, हवा तसा निवडक चिखल नि छानछौकं तापमान नि आर्द्रता. काही गेंड्यांना अमेरिकेत हलवलं, काहींना ब्रिटनमधे. या गेंडयांनी त्यांच्या आयुष्यात असा प्रवास कधी केलाही नसेल. गेंड्यांनी या ‘better life’ मधेही प्रजनन नाकारलं. त्यांची संख्या वाढली नाही. हे सारेच गेंडे (दु:खी) मनाने अनंतात विलीन झाले. त्यावेळी कुणी साधू हजारो गाढवांच्यासमोर प्रवचन देत राहिला, “जे येणार ते जाणार. जे जाणार ते परत येणार. त्यांची स्वरूपं बदलेली असतील, पण कण तेच राहणार. भावना तीच राहणार”. मग हे सगळं होणारंच आहे, तर जगण्याचा खटाटोप का? सुमात्री गेंडा फक्त जगण्यासाठी जगला असेल का? येणार ते जाणार म्हणून वाट बघत थांबला असेल का? येणार ते जाणार यामधे कित्येक वर्षांचं अंतर आहे. ही वर्षं सुमात्री गेंड्याला आनंददायी नसतील का वाटली? प्राणी-संग्रहालयात एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसली असेल उरलेली त्यांची प्रजा नि त्यांच्या भाषेत म्हणत असतील, उत्कांतीचं हे पर्व संपलं. असं वाटतंय की सुमात्रात आपणच शेवटचे उरलेलो आणि ते ही आत्ता कळतंय. ते सारे पुढच्या काही वर्षांतच गेले. संशोधक हळहळले, त्यांना वाटलं आपण अपयशी ठरलो. आपण त्यांना वाचवू शकलो नाही. संशोधक म्हणाले, ते गेले कारण आपण त्यांना त्यांचा योग्य अधिवास देऊ शकलो नाही. In short, आपण त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया देऊ शकलो नाही. त्यांना `better life’ नको होती, त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया हवी होती. त्यांना वाटलंही असेल की आपली मुलं या प्राणी-संग्रहालयात वाढवण्यापेक्षा आपण नामशेष झालेलोच बरे! ते जे काही असेल, सुमात्री गेंडा, जगण्याच्या स्पर्धेत टिकला नाही नि स्वत:चा आवाज इतरांपेक्षा वाढवू शकलेला नाही. त्याची जागा बदलली, त्याचं घर तोडलं, त्याची भाषा खुंटली नि चिखल-चारा हरवला. चिखलात बुडालेल्या सुमात्री गेंड्याला चिखलातच सोडलं असतं तर बरं झालं असतं बहुधा…     
पंकज

९ नोव्हेंबर २०१५
More about sumatran rhinos - http://news.nationalgeographic.com/2015/09/150930-sumatran-rhino-extinction-indonesia-animals-conservation/