शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

Amazon

यावेळी मात्र तिचे अवयव कापले,
उरलं-सुरलं धडही झाडावर टांगले,
थेंब-थेंब गळून रक्तही साकाळले,
मग एकदाची लावली आग!

ती माझी नव्हती कधीच,
त्याचाही होताच राग,
हक्क पण सांगेन निर्लज्जपणे,
करेन मनोसक्त बलात्कार!

तिच्या काळया-हिरव्या अंगावरती
हजारो मांडली दुकाने बिनधास्त
त्यात चिरडले, मारले, गाडले
पक्षी-प्राणी, झाडं आणि सारेच सगे!

ती तीन आठवडे पेटवूनही
अजून जिवंत कशी?
मी जिंकलो की मी हरलो
हे सांगायलाही नाही माझी आई!
पंकज कोपर्डे 
(२५ ऑगस्ट २०१९)


शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

कवितातुझ्या चांगल्या वाईट सवयींचा ठिकाणा हळूवार हरवत चालल्यासारखा होत असताना, मी आताशा घराचे दार उघडून आत पाय ठेवला तर हवेचा थर तिथल्या तिथे. हालचाल नाही, रंग नाहीसे. अंधाऱ्या रात्री, मिणमिणत्या प्रकाशात, गच्च पावसात, आभाळ उतरण्याची वाट पाहत आडोश्याला बसलेल्या साठीच्या तेलकट चेहऱ्याच्या माणसासारखं घर बसलेलं असतं, गच्चीतून तोंड काढून रस्त्याकडे बघत…तुझी वाट बघत!

मी गाडीच्या चाव्या खिळ्याला अडकवतो, खिशातलं पाकीट ड्रॉवरवर मधे ठेवतो. खांद्यावरचं ओझं खुर्चीवर ठेवतो आणि गच्चीत येऊन उभा राहतो. सात किंवा असे काहीतरी वाजलेले असतात. लोकं दिसतात…घरा-घरांत खुर्च्यांवर बसलेली, बसवलेली; चहा पिणारी; टिव्ही बघणारी; येणारी-जाणारी; चित्रातल्यासारखी. तू नाहीस दिसत. घर घरात जाऊन बसून घेतं, करायला विशेष काहीसं नाही!

थोडं बसावं, एक-दोघांना फोन करून उगाच त्रास द्यावा, कामाचं बोलावं. करमेनासं होतं. पक्षी आढळत नाहीत, भिंतींवर अडकवलेले तुझे-माझे फोटोजही बोलत नाहीत. तुझी आठवण येत नाही, त्रास होतो. घरातल्या फरश्या दररोज मोजल्या तरी तेवढ्याच राहतात आणि तू असताना घर कसं एकदम छोटंसं वाटतं तेही उमगत नाही! मी घर आवरून ठेवतो. तुला चांगलं वाटेलंसं ठेवतो.

पाऊस थांबल्यासारखा साठीचा म्हातारा, माझ्याजवळ येऊन बसतो. आम्ही एकमेकांकडे बघतो. मी आम्हा दोघांच्या पेल्यात मद्याचे पेग भरतो, चिअर्स करत नाही, निमित्त नसतं. घरातला प्रकाश मंदावतो, मी नोराह जोन्सची गाणी लावतो. आम्ही दोघेही पुन्हा गच्चीत जाऊन उभे राहतो, तोच तो रस्ता बघतो, आकाशात चंद्र चढलेला असतो. घराला एक आणि मला एक दीड-फुटाची फरशी एवढीच गरज उरते…बाकी उरतो तो निव्वळ पसारा!

तुझी वाट पाहणारा पंकज
१७ ऑगस्ट २०१९बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

डास

गोष्ट लिहायला लागलो तेव्हा मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही. एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त! एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं. ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही. ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!  

शनिवार, २४ मार्च, २०१८

पानगळ

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला.
पाचोळ्याचा आवाज
दऱ्या-दऱ्यांमधून
घुमतो केविलवाणा!

झळा उन्हाच्या
करपवत जातात
उरला-सुरला चारा.
विचारांची गुरं-ढोरं
दुष्काळ नसून
असल्यासारखी!

पायवाटा झाकलेल्या
बोडके डोंगर
पिवळसर धरती.
झरे आटलेले
हळद्याच्या गाण्यात
माझेच स्वगत!

तळपत्या उन्हात
वणवा पेटतो एखादा
भस्मसात क्षणात!
तू नसताना
नाही थंड वारा
फुलांच्या गारा!

तू नसताना
पळस उगाच फुललेली
सावर लाले-लाल!
तू नसताना
शुष्क ओढ्याकाठी
रातवी पौर्णिमा!

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला
ये ना अशी इकडे
ऋतू-बदल
अधीर मनाला!

- पंकज (०८.०३.२०१८)

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

पाखरे


तुझ्या गंधाळलेल्या शब्दांची पाखरे,
आज कोवळ्या ऊन्हात तारेवर बसलेली.
काही जुनी, कधी पाहिलेली आणि चारेक नवी दिसली.

काळी-पिवळी-निळी-हिरवी-लाल-गुलाबी
गुबगुबीत-झोपाळलेली-स्वप्नाळलेली-टकमक
चिवचिवाटांत त्यांच्या, मनाचा गुंता, जुना-नवासा!

त्यातलीच उडाली काही, घरटं बांधायला पसार झाली.
काही आपसूकच आली जवळ, चोचीत चोच घालू लागली.
काही उरली शून्यात, मग माझ्याकडे पाहत राहिली.

काय करावे उरलेल्यांचे, कोवळ्या ऊन्हात चकाकला प्रश्न.
दगड मारावा, उडवून लावावे, की दाणे टाकावे; बोलवावे इथे?
कसलं काय करतेस वेडे, उघडला मनाचा पिंजरा नि गेले आत सारे!
                                                           

                                                            - पंकज (२६ डिसेंबर २०१७)

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

तिशीचे तत्त्वज्ञान

मागच्या काही दिवसांपासून मी माझ्या आयुष्याबद्ल, वयाबद्दल, जगण्याच्या पद्धतीबद्दल, चुकांबद्दल, आणि एवढ्या वर्षांत पक्व झालेल्या विचारांबद्दल विचार करतोय. याला निमित्त एकच आहे ते म्हणजे मी नावाच्या या पोरकट कथेला आज तीस वर्षं पुर्ण होत आहेत. तीस वर्षं! केवढा हा काळ! कदाचित आज मी जे लिहीतोय ते कित्येकांना त्यांच्या-त्यांच्या तिशीत वाटलं असेल-नसेल; काहींना प्रकर्षानं जाणवलं असेल; काहींनी शब्द-बध्दही केलं असेल. मला माहितीय त्यांचं शेवटचं वाक्य असेल - सरतेशेवटी आपणच आपल्या आयुष्यात मुर्ख ठरलो!

येणारे येत गेले, गाणारे गात गेले, जाणारे जात राहिले. आपण वर्णभेद केला, जातीभेद केला, धर्मभेद केला; देवापुढे टाळ्या वाजवल्या, नाच-गाणी केली, ठिक-ठिकाणी डोकं टेकवलं; जोरजोरात फटाके फोडले, मुर्खागत सण साजरे केले; लाळघोटेपणा केला, छेडछाड केली, नसली तरी विकृत विचारांनी शरीरांना स्पर्शलं-उपभोगलं; स्त्रीवादाच्या गर्जना केल्या; शाळेत, कॉलेजात, मनात राजकारण खेळलो; आणि बरंच काही छोटं-मोठं जे जगाच्या डोळ्यांत, आज, माझ्या स्वत:च्या डोळ्यांत खुपलं असतं असं बरंच-बरंच सारं काही केलं. छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या, अधनं-मधनं फसवा-फसवी केली, आणि असं बरंच काही. हो केलं हे सगळं! मान्य आहे. हे ही केलं! सगळं-सगळं मान्यही केलं! पुढे हे घडेल की नाही याची स्वत:ला हमी देण्याची हिम्मत तेवढी होत नाही. कशी होईल? जगाच्या चक्रात एक नाहीतर दोन-तीन गोष्टी होतीलच हातून, वाटत राहतं. आपण आपल्या आयुष्याच्या सोयीस्कर फाका करून घेतल्या. मनात ठरवलेल्या वेळेच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत दमछाक केली नि हात-पाय कसेबसे ताणत त्या-त्या रेषा स्पर्शल्या. ‘केलं हे एकदाचंअशा आवेशात उभे राहिलो तेव्हा सारं जग गालांत हसताना दिसलं. मग आपणही हसत वेळ मारून नेली नि मनावर चाकूने एकेक रेघोटी ओढत गेलोच! मनावरच्या रेघोट्या शरीरावर ठिकठिकाणी उमटल्या नि त्यावर मग आपण आयुर्वेदीक औषधांचे लेप लावत गेलो. ते लेप लावणारे हातही बदलत राहिले एवढी वर्षं, जखमा अजूनही पोरक्या. वेळेप्रमाणे, वयाप्रमाणे गृहस्थाश्रमाकडे पावलं वळवली, पण वानप्रस्थाच्या वाटा खुणावत राहिल्या. कधी थांबून मागे वळून पाहिलं तर ती एक ओळखीची परतीची वाटही खुणावत राहिली. पाय उलटे वळवले तर पडून शरीराचा पाचोळा होणार हे ही जाणवलं जेव्हा पळायचा आव आणला; आयुष्याला नाही म्हटलं तरी गती असते याची जाणीव पदोपदी होत राहिली.
       आता मागे वळून बघताना, निदान थोडे-थोडेके जे निबंध, पत्रं, -संदेश, -मेल्स इत्यादींचा पसारा उचकल्यास दिसतात या सर्व गोष्टींचे तुकडे. उरल्या-सुरल्या, अर्धमेल्या, केविलवाण्या प्रेमाचे तुकडे लाकडाच्या शेकोटीपुढे उडणाऱ्या काळ्या कपट्यांसारखे आणि अशा थंडीतही तिचे गुलाबी ऊबदार हात माझ्या केसांमधे फिरणारे! मन खिन्न होऊन जातं. हे सर्व काही केलं आणि आज या सर्वं आठवणींचं ओझं घेऊन जगायची शिक्षाही मिळतीय. हे जाणवून अजूनच दु:. जगानं त्याच्या-त्याच्या तत्त्वज्ञानानं आपल्याला वेड्यात काढलं. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्या आयुष्याची थोड्याफार फरकाने वाट लावली. जिथे थोडी लावली ती भेग आपण मजा म्हणून फाकवत गेलो नि आता पडलेल्या भगदाडातून एक पाय तिकडे, एक इकडे अशी अवघडल्यासारखी अवस्था करून बसलोय.

आपण किती मनं दुखवली, किती थोडक्यांना आपण सुख देऊ शकलो? दु:खाचं पारडं जडच होतं दरवेळेस. एका व्यक्तीला सुख दिलं की दुसरी दुखावते आणि आपल्या मनाचा पावा आपणच वाजवत फिरतो गल्लीभर. त्यातून रडक्या मनाचे सूरही इतके मधुर की कळतंच नाही कुणाला की याला जखम झालीय खोलवर. वाजतोय पावा गोड, हसतंय जग, रडतंय मन! मग किती मनं दुखावली? एक स्वत:चं आणि अनेकशी दुसऱ्यांची! या सर्व गोष्टींमध्ये किती वर्षं वाया घालवली, किती घालवणार पुढे? भगदाडात पाय एक पाय इकडे-तिकडे, हातात पावा, मनात जखम, मेंदूत गोंधळ! या सर्वांत पैसा आला परत

जेव्हा कळलं की पैसाच सर्वश्रेष्ठ तेव्हा आयुष्याची गणितं एका चुटकीत बदलून गेली! तेव्हा शिक्षणाचा अर्थ बदलला, जगण्याचं समीकरण बदलंल! मध्यम-वर्गीय प्रवाहात एका झटक्यात कुणीतरी उचलून फेकून दिलं आणि तेव्हापासून उलटं पोहून पोहून स्वत:ची कातडी सोलवटली, कोपरं-ढोपरं फुटली, पण अजून कुणी सोबतीला भेटलं नाही, एखादी नावही दिसत नाही टप्प्यात कधी, काठावर जाण्यात नाही अर्थ!       

स्वत:च्या पाच-पाच वर्षांमागच्या छब्या तयार करून रात्रीत पावसात उभ्या करून कल्पनेतच त्यांचे हावभाव बघून आलो. एकाहून एक मुर्ख लेकाचे. स्वत्वाचा पत्ता नाही, स्वाभिमान सोयीस्कररित्या उफाळणारा, जगाची कल्पना नाही, जगण्याची आस नाही, हाती कौशल्य नाही, मनात कसली आग नाही. हे सगळं नाही तर नाहीच, पण मनाला स्थेर्यही नाही. वजनाने झुकलेल्या गाडीसारखी यांची मनं. आपण तारे होऊन चमकलो नाही, निदान काळं आकाश व्हावं पोकळ नि अथांग, तर तसंही नाही! हे सर्वं घडलं आणि एवढ्या उशीरा जाणवलं. माणूस हा खरंच इतका मुर्ख प्राणी आहे का?

हसू येतंय मला. खरंचभगदाड!!! कुणाकडे बोट दाखवावं की यांनी गंडवलं मला म्हणून? सरतेशेवटी आपणच आपल्या आयुष्यात मुर्ख ठरलो!
- पंकज
२४ नोव्हेंबर २०१७, दौंड