शनिवार, १० जानेवारी, २०२६

विरघळणवूक

 काळ्या कॉफीत तरंगणारे ढग,

वाहणारी नदी, शांत सारंग,

माझ्या दुनियेतला अद़्भुत क्षण,

नि भरकटलेले एक मन.

 

आज, उद्या, किंवा परवा-तेरवा,

दिवसांचा क्रम, थोडा मोडका,

अशातही शरीरांची तहान,

वृद़्ध वृक्षाच्या कण्याचा ऒंडका.

 

तू दोन ढग प्यायलेस का?

पोकळ आभाळ माझ्यासाठी,

वाऱ्यावरती नदीच्या काठी,

सोडवतो विचारांच्या गाठी!

 

ती थंड हवा, तो शहारा,

मला न तुला, ना, मग कुणाला?

अंगावरी येई दवाचा पसारा,

गोठवून ठेवी, शब्द-शब्दाला.

 

हे नातं कसं तरल, मृदु, नाजूक;

तरी कुणी कुणाचे कुणास ठाऊक?

संग पडला की जीव जडला?

ढग विहरतात, आभाळ मूक;

 

तव काळजात मी रसभरून,

नि तव माझ्यात भिनून…

 

-       पंकज कोपर्डे । १० जानेवारी २०२६



बुधवार, ७ जानेवारी, २०२६

द्रव्य

 पावसात तू कविता होऊन

अंगावर बरसताना,

अतिशय घम्माड झालेलं

मन आणि थरकतं अंग!

 

हाताला स्पर्शून जाते तू,

न अंगावरचे शहारे पोरके,

का गं असा करते,

काळजाचा भुगा उगा?

 

सरपटत आलो तुझ्यापाशी

पांगळं घेऊन बेघर मन,

जायबंदी करून स्वत्वाला,

शोधत गंध तुझा!

 

विषारी ही हाव तुझी

हवीहवीशी का वाटते?

भक्ष्याला भूललीस की

भक्ष्यच झालीस तू?

 

हा संग नुस्ता, नाही बंध

मी-तू द्रव्य, आणि रात्र

ती ही विरघळणार नि,

अस्ठी उरणार मात्र!

 

आणि तू-मी वाहत,

झरा-ओढा, मग नदी;

अणू-रेणूही उरून वाहून,

वेळही सोडेल कधी!

 

पंकज कोपर्डे 

०७ जानेवारी २०२६



शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

RHI! राही


तुझं हसणं आणि असणं,

जसं हृदयाचं माझं पातं,

गार भर्राट वाऱ्यावरती,

थेंबार झपाट भरकटणं! 


तुझ्या ओठांच्या हालचाली,

आली लाली ती गाली,

आणि ते केस; नव्हे रात्री! 

पकडे मला कात्रीत! 


ती हुंकार देती पैंजणे,

नि हुलकावण्या कानातली डुले,

वेड पाखरू मन माझं,

तुझ्या गर्द बटांवर झुले!


तू असतानाची वेळ, 

अशी मंत्रमुग्ध अनोखी,

तू नसताना जवळी,

मन बिथरे, मी अनोळखी! 


अशी उबदार, हवीहवीशी,

तुझी कव, तुझा स्पर्श,

मन तुझं माझ्या मनात,

तेव्हा लागे शून्याचाही अर्थ! 


तुला जवळ बोलावून,

माझ्या स्पर्शात सामावून,

माझ्या, माझीयाचा कढ,

तुझ्या, तुझीयात ओढ! 


- पंकज / ०६/११/२०२४

दुबई

 

तू उजाड रान असताना,

मी पाऊस होतो चुकार,

आणि वाळवंटाच्या मनातला

नाजूकसा पानेरी हुंकार


माझ्या भेगाळलेल्या रेतीवर

उंटांच्या पाऊलखुणा,

आणि कैक वर्षांच्या,

भळभळनाऱ्या जखमा! 


का पडावे जगापाठी,

का म्हणवून घ्यावे माती! 

उपसून कोथळा माझा,

रक्ताचंच करेन पाणी!


आज भूत गोठवून माझा,

जगतो वर्तमानासाठी,

ही जमीन मी बाटवली

पळतो भविष्यापाठी,


हाडा-मांसाचे बांधले मनोरे,

सिमेंटाची ओतली पोती,

लोखंडाचा जाळ ओतून,

मिरवली सोनेरी छाती! 


मी पळत राहिलो मृगजळामागे

अथक-अथांग-अविरत, आई!

सोलवटून  खाल्लं तुला

नि बनलो मी दुबाई! 


- पंकज कोपर्ड / २१ Nov २०२४

अजाण

 तुझ्या असण्याच्या चंद्र-चांदण्या,

आकाश निरभ्र असतानाही,

मनात चमकून जातात,

आणि तरीही तू अजाण! 


तुझ्या असण्याच्या आठवणी,

शहारे बनून प्रगटतात,

अंगभर आणि पसरतात,

पण तू निरागस अजाण!


तू नसतानाचा त्रास,

किती अफाट, अशक्य,

तरीही जगतो या कल्लोळात,

आणि तू असतेस अजाण!


तू नसतानाही काही गोष्टीत

असतेस अशीही मुरलेली,

घुसमटतो जीव तसाही,

आणि पाखरा तू अजाण! 


गर्द तपकिरी रंगाची स्मृती 

तुझ्या दाट प्रेमात गुंगली मती! 

जिवाचं काहूर माजलेलं,

तू थोडं तरी जाण! 


पंकज | १२ जानेवारी २०२५

Wonder!

 

I often wonder,

when was the last time,

the time we thought,

the time we wondered,


something interesting,

something out of the world,

something we missed,

is going to happen?


the answer to the quest,

not so difficult!

Guess! Be my guest,

is "always"!


...and when we travel,

with an open mind,

maybe will come across,

our kind!


- Pankaj 

18 January 2025

रविवार, ७ एप्रिल, २०२४

हवा

 ती पश्चिमेकडून येणारी हवा,

ताटकाळलेली दरवाजात किती तास!

दरवाजा उघडला तेव्हा, घाईने आली आत,

म्हणाली, किती रे देतोस त्रास?


दूर दूर डोंगरांपलीकडून रोरावत मी येते,

दऱ्या-खोऱ्यांत शीळ घालत, तुझेच गाणे गाते!

लांबसडक काळेभोर केस, नदीभर माझी सावली,

अनामिका मी महाकाया, कोणाच्या फुफ्फुसांत मावू मी?


एखादं चावट, उगाच पिंगा घालतं वावटळ, 

चाचपडते माझं अंग, उन्हाची एखादी झळ!

त्याच्या अंगभर जेव्हा होतात, समुद्राच्या मनातल्या लाटा,

क्षणात आणि होती वेगळ्या, त्याच्या-माझ्या वाटा! 


रोज संध्याकाळी, मी येते इतकी उत्कट

भेटायला तुला, तुझ्या प्रदुषीत शहरात!

अंगावरती जखमा होतात, 

घुसमटते मी, तुझ्या शहराच्या जंजाळात


ती इतकी खोलवर, ती इतकी वरवर

ती कुणाची असो-नसो; पण माझी घरभर!

ती घेते मला लपेटून, दरवाजा उघडतो तेव्हा;

ती पश्चिमा इथे माझी, आठवण काढतो जेव्हा!!!


- पंकज । ०८ ऎप्रिल २०२४