सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

hands and patches

                चित्रकलेच्या क्षेत्रात  ठसा उमटावा असं कैक दिवसांपासून मनात होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं. माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना पडदे नाहीत; आणि इमारतीचा हा भाग चक्क सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो!! तसा मी अंधारात राहणारा प्राणी. या प्रकाशाचा त्रास व्हायचा. मग एके दिवशी ठरवलं की यावर काहीतरी उपाय करावा. पहिला विचार आला तो म्हणजे पुणे टाईम्स मधल्या सेमी-नूड्ज आतल्या बाजूस तोंड करून प्रकाशाचा रस्ता रोकावा. हा आपला टिपीकल बॅचलरी विचार तसा; पण मी राहतो ते घरंय, रूम नाही; याचं मला चांगलंच भान आहे. शिवाय माझ्या या कलाकृतीचे माझ्या घरी फार विपरित परिणाम होतील याचीही जाण होतीच. मग काय करावं? म्हटलं, छानसा रंगीत कागद आणून डकवावा; कुठला फिल्टर? केशरी, हिरवा, निळा?? विचार करत बसलो…

                लॅपटॉपवर गाणी सुरूच होती; त्याच दरम्यान “कट्यार काळजात घुसली” मधली काही गाणी सुरू झाली. बस्स…ती सुरू झाली नि माझी विचार करण्याची पद्धतही पुर्णपणे बदलली. हुरूप आला. कुठल्या-कुठल्या म्युझिअम्स मधे लाल-निळ्या रंगाचे शिशे पाहिलेले आठवले. छंद मकरंद झाला! मग काय? काचच रंगवायला घेतली. अगोदर निळसर बॉर्डर आखू वाटली. तसं केलं. मनात मकरंदासारख्या कल्पना गोंधळ घालत होत्या. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की, कुठेतरी ठसे उमटवावेतच! शिवाजी महाराजांनी जसा सिंधुदुर्गात उमटवलाय तसा!!
 निदान मी माझ्या घरात तरी उमटवू शकतो; आमचं कर्तुत्वही तसं चार भिंतींएवढंच ओ! मग म्हटलं तसं! ठसे उमटवले नि उरलेला भाग समर्पक नि उपलब्ध रंगांनी रंगवला. लांबून पाहिल्यावर प्रकाशही थोड्या निवल्यासारखा वाटला. अंधारल्या जीवाला अजून एक अंधारली खोली मिळण्याचा आनंद झाला!

बुधवार, २८ जुलै, २०१०

बाप्पा

सकाळी साडेअकरा वाजता बाजारात जाऊन काही रंग विकत आणले. एक निमूळत्या टोकाचा नि दुसरा पसरट तोंडाचा असे दोन ब्रशही आणले. जेवण वगैरे करून म्हटलं एक हात मारावा नि मस्त झोपावं; बाहेर पाऊसही छान कोसळतोय; अशावेळी माझ्यासारख्या जीवाला झोपेशिवाय दुसरं काय सुचू शकतं म्हणा!

मग तसा एक हात मारून घेतला. नि मग पुढे वेळेचं भानच उरलं नाही...चित्र साकारत राहिलो. अधून-मधून कित्तीतरी विचार डोक्यात येत राहिले; एखादी रेष चुकतीय असं वाटलं तरी त्या चुकीचे कित्तीतरी अर्थही निघू शकतात ना?! रंग...रंगांचंही तसंच वाटलं मला. चित्र म्हणजे नक्की काय याचा गंधही नसलेला मी प्राणी! डोळ्याला जे जे चांगलं वाटेल ते ते चांगलं हा किती संकुचित विचारंय; याचाही मस्त चटका बसला मनाला! दुपार झाली; थांबू वाटलं नाही...
मग पुन्हा कित्तीतरी वेळ तिथेच गुंतून पडलो. हे असलं काहीतरी करायला हवं यार! तहान-भूक विसरून. किती वेळा हे मनासारखं घडलंच नाही. कथा लिहीताना होतं ते तेवढंच! त्यावेळी तहान भूकच काय; वेळ, वय नि स्वत:चाही विसर पडतो. इतका साधा बाप्पा; त्याचं ते किती साधंसं रूप. कुणीही, अगदीच शिकाऊ माणसालाही जमेल असं ते चित्र! कुणी बनवलं असेल गणपतीला? त्या चित्राला? हे दैवत इतकं गोड आहे की प्रतिभेचं दैवत असं म्हणताना त्याच्या स्वत:च्याच आकारात कितीतरी आकार आपोआपच प्रगट होताना दिसतात. छान! तसं मला लिहायचं आहे याबद्दल पण मला आता काहीच लिहू वाटत नाहीये! मला माहितीय की मला चित्र काढताना काय वाटत होतं नि ते मी किती enjoy केलं ते!

गुरुवार, २२ जुलै, २०१०

मेणबत्ती

मेणबत्तीच्या आयुष्यातला जळण्याचा क्षण किती अप्रूपाचा असावा? वारा येईल तसं लवलव करायची! आयुष्य असं जळत असतानाही असह्य वेदनांचा टाहो मेणबत्ती किती मूकपणे प्रगट करत जळतीय! मौन धरून बसलीय…सांगायचं नाहीच कुणालाच! कुठे भाजून निघालेलं अंग चरचर करतंय जळतंय. तो मेणबत्तीचा आवाज नाही; तो घटनेचा आवाज! घटनांना आवाज असतो. हिरव्यागार रस्त्यावर मध्यभागी नारळासारखी दोन रक्तमय डोकी नि मूकपणे उताराला लागलेलं रक्त…या घटनेला माझ्या मनात सुरूंगासारखा आवाज झाला होता खरा. पण तेवढ्याच मूकपणे मी माघारीही फिरलो होतो. मेणबत्ती असेच स्वत:चे कान बंद करून घेत असेल एखांदवेळेस. आवाज नाही; तर भिती नाही. ते एकलकोंडं जगणं जरी डोळ्यांनी दिसत असलं तरी तिचा हातात हात धरून असलेला प्रत्येक अणू-रेणू कितपत जीवात जीव अडकून जगला असेल या प्रश्नाला तरी उत्तर काय? वर लागलेली आग खालीपर्यंत पोहोचणारच; या भितीपायी कुठे कुठे कुणी कुणी मिठ्या मारल्या असतील नि कुणी कुणी आत्महत्येचे विचार केले असतील हे सांगणही किती कठीण! मेणबत्ती जळत राहते; तसंच तिचं जगही. अणू-रेणूंना आग स्वत:पर्यंत पोहोचत तोपर्यंत हे जाणवतही नसेल की ते एका जळणाऱ्या मेणबत्तीचे भाग आहेत! म्हणून तर कुठेच टाहो नाही; सर्वच मौनाचा कारभार; चटका लागतोय म्हणून लिहीतोय मी ही…आग आलीय अंगावर!
२१.०७.१०
पंकज

बुधवार, २१ जुलै, २०१०

सांच्याला लई पाय दुखत व्हते. का कुणास ठावं? मरेस्तोवर चाललो व्हतो; तेवढंच. ते बी रोजच घडतंय की. आजच का दुखू राहिले कळंना. तालुक्याला खेटं आमचं रोजवार चालूयंत. हे ना ते; ते नाही तर हे! जीवाला भ्रांत अशी नाहीच. पेरलेलं उगावलंच नाही; आता परत पेरायला पैका नको? पैका आणायला तालुक्याला; बसवारीच पाण्यासारखा पैका जातुया! पेट्रोलबी महागलंय; तिकीटं बी वाढलीयंत! देवाला साकडं घालायला त्यो बी पुर्वीसारखा राहलाय कुटं? इथं जीवाला जीव राहिला नाई; देवळात देव कसा म्हंतो मी? मंडळीला बोललो म्या परवाच जगण्यात काय नाई; जीव देऊ एकजात! “अवं असं का वंगाळ बोलताय?” असं बोलली माजी बायको. आता या बाईलीला सांगणार तर काय? पोरगं नकळतंय; रडारड असतीय नुस्ती घरी; त्याला कसा समजिवनार? सगळाच गोपाळा झालाय! बाईली काल परत म्हटली की, “दोघांपुरतंच उंदराचं औषाध हाये शिल्लक” नि मुसमुसून रडली…

ठिय्या केला मी बी मनाचा. तालुका गाठला; मंगळसूत्र ठेवलं गहाण नि परतलो की पेरणीला; म्हटलं गड्या, आसं हारायचं नाई; कुणाच्या बापाला भ्यायाचं नाई! पावसाची खबरबात मिळतीय रेडूवरनं; पण आपल्या प्रदेशात नाई पडनार असंच लक्षान! झालं बरंच दिस झालं त्यालाबी; बाईलीनं कुठलं व्रत बी केलं; अन्न-पाणी सोडून; आता खायलाच काई नाई म्हटल्यावर उपासमारच व्रतं म्हणून म्हणायची!
आज माझी बायको गेली आबाळात…

रातभर पोरगं रडतंय; म्हणतंय “बा, पाऊस कोसळायलाय; म्हणतुया, इठ़ठल, इठ़ठल! त्याला सांग ना गपायला!”

बुधवार, ९ जून, २०१०

हत्तीणबाईंची quest

पाखरानं कसं भिरभिरायचं, फिरायचं, मजेत उंडारायचं नि मनात आलं तर कुठल्याशा फांदीवर क्षणभर विसावायचं...मग परत भिरभिरायचं! पण एकदा किनई गंमतच झाली, चिंगीच्या बागेत धावपळ झाली! हत्तीणबाईच्या पोटात मळमळ झाली! आता मळमळ म्हणजे सोप्पी का ती? हत्तीण बाईंचं पोट लागलं की ओरडू आणि दुर्वा दिल्या, नारळं दिली; तरी काही शांतच होईना मुळी! मग आता उपाय काय यावर? चिंगी लागली विचार करू…गेली घुबड आजोबांकडे म्हटली, “चहत्तीणताईंच्या चोपोटात चुदुखूच चालागलंय चाफार! चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा कुठले ऐकायला? ऐकायला उठायला नको झोपेतून. आणि उठले तरी कानांतले वॉकमनचे गोळे काढणार कोण? चिंगी बघत बसली घुबड आजोबांकडे. घुबड आजोबा हलले नाहीत की डुलले नाहीत, मुळात काहीच काही बोलले नाहीत! “छे! असले कसले हो आजोबा तुम्ही?” चिंगीच्या मनात हा विचार आला खरा, पण करणार काय? हत्तीणबाई तर गडाबडा लोळू लागल्या नि नंतर-नंतर तर जोरजोरात चित्कारू लागल्या; हत्तीदादाची पंचाईतच किनई! त्या नकट्या नाकांच्या वटवाघळांनी तर बिबट्या-फुकट्या पोलीसांनाच आणलं नि F.I.R. फाईल केला झोपमोड केली म्हणून हत्तीदादांच्या विरोधात! आता मात्र चिंगी चिडली. घुबड आजोबांच्या कानांतले बोळे काढून त्यात ती जोरात किंचाळली. घुबड आजोबा खडबडून जागे झाले नि घाबरून दुसऱ्याच झाडावर जाऊन बसले; मान इकडं-तिकडं फिरवत डुलक्या घेऊ लागले. तेवढ्यात चिंगीनं आजोबांना सगळा प्रकार सांगितला… “चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा पण पडले संभ्रमात. असे कधी पुर्वी घडलेच नाही!

घुबड आजोबांनीही समोर घडणारा प्रकार पाहिला. हत्तीणबाईंची जीभ बघितली, कान तपासले, नाडी तपासली…पण काही थांग नाही. पोट तर भरधाव धावणाऱ्या मोटारसायकलीसारखं आवाज करत होतं. घुबड आजोबा पण घाबरले, त्यांनी त्यांच्या खापरपणजोबांनाही consult केलं आणि मग येऊन म्हटले, “उपाय आहे यावर एक. पण तो तोड मिळणं अवघडंय!”
चिंगी म्हटली, “चांसांगा, चपटकन चासांगाना!”
आजोबा म्हटले, “शोधा असे पाखरू, जे रूसलंय फार, आणि का कुणास ठाऊक विसरून गेलंय उडणं-फिरणं; अगदीच शांतही नाही, त्रागा करत बसलंय गप्पगार! त्या पाखराच्या नाकावर एक लाल टिकली रागाची, त्या टिकलीनेच शांत होईल भूक हत्तीणबाईंची!”

चाआता चुकुठे चिमिळेल चेते चापाखरू चीकी चाकाय चोहोणार चुपुढे?

(अशाच एका चिंगीला)
;-)

रविवार, ६ जून, २०१०

सुजलाम सुफलाम, सगळंच लुटलाम!!

मी सध्या या Conferences ला वैतागलोय! या conferences म्हणजे वैतागवाडी. अन्न-धान्याची, पैशाची प्रचंड नासाडी! तीन दिवस conference होती, बंगळूरात. पहिला दिवस आनंदात गेला. इकडे-तिकडे भटकत राहिलो; खेड्याची पोरं पिराच्या उरसात बोंबलत फिरतात तसा! याच्याकडे जा (biocon, eppendorf etc.); त्याच्याकडे जा; याच्या खोड्या काढ; त्याच्या खोड्या काढ. माकडचेष्टा सगळ्या. कामधंदे तर काही नाहीत; फुकटची उठाठेव. जे काम करायला तिथे गेलो होते; त्यातला स्वत:चा interest तर कधीचाच फिक्कट झालेला; नि मी केलेलं काम इतरांना सांगणं हे मला कपडे धुवायच्या पावडरी विकणाऱ्या salesman पेक्षा जास्त काही thrilling वाटलं नाही. माझ्यासारखेच इतरही काही लोक होते; ज्यांचं काम कपडे धुवायच्या पावडरींइतकही उपयोगाचं नव्हतं; पण बिचारी लोकं dedicatedly आपापल्या poster शेजारी उभी होती हॅलोजन लॅम्पखाली ac मधे! मी तीन दिवस खा-खा-खाल्लं…नि timepass केला. त्यासाठी एवढ्या लांबून (अवघे १६00 कि.मी.) (पुणे-बंगलोर) प्रवास केला. पैसे वाया घालवले; श्रमही! बौद्धिक म्हणाल तर काही increment नाही. एवढं सगळं सुरू असताना, विचार करायला मस्त वेळ मिळाला!

भारतातील biotech industry मधील बरीच प्रतिष्ठित लोकं आली होती. काही foreign delegates होते. त्यांच्या जेवणा-खाण्याची कुत्र्यासारखी सोय केली होती. त्यापैकी आम्हीही Poster author या प्रकारात मोडणारे कुत्रे होतो. एकंदरीतच ती संपन्नता पाहून मन विषण्ण झालं. किती ती अन्नाची नासाडी. प्लास्टिकचे ग्लास, visiting cards, fliers कचरा सगळा. लाईट!! कित्तीतरी लाईट वाया. By the way “Climate change and role of biotech industry” असं एक मोठ्ठं session ही conference वाल्यांनी cover केलं होतं; हे त्या conference नि त्या बिचाऱ्या conference चं दुर्दैव! भर उन्हाळ्यात असल्या conferences हव्यातच कशाला? इथे इतकी पाण्याची, लाईटची बोंब असताना; कशाला दुष्काळात तेरावा महिना! माझे हे उद्वेग फक्त या particular conference पुरते मर्यादित नसून ते सगळीकडेच apply होतील! उदाहरणच द्यायचं झालं तर आताची कोपनहेगन परिषद. परिषद झाली; गाजावाजा झाला; निष्पन्न काही नाही; कुठल्यातरी groupने म्हणे कोपनहेगन परिषदेमुळे global warming वर कसा लोड पडलाय यावर पेपर लिहायला घेतलाय!! Recently परत त्यात ऎन मे महिन्यात विदर्भ पक्षी मित्र संमेलन झालं! निदान conservationists ने तरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उधळपट्टी करायची असली तर मला पैसे द्या यार!! मी काहीतरी चांगलं तरी करेन!! ;-)

मी काही anti conference नाहीये; पण scientific community जर जगाचं future ठरवण्याचं काम करत असेल तर तिला हे सामान्य norms तरी माहिती असलेले बरे! Conference चा उद्देश काय? तर लोकं एकमेकांना भेटावीत; knowledge exchange व्हावं; नविन संशोधन व्हावं, एकंदरीत सगळाच आनंदी आनंद व्हावा! Well…हा सगळाच आनंदीआनंद करायला आपल्याकडे सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत. उदा. Online conference. अशी एक नुकतीच झाली. प्रवास नाही; फुकटंचं चहा-पाणी, सोललेल्या कोंबड्या नि उकडलेले बटाटे नाहीत; बिअर, शॅम्पेन पार्ट्या नाहीत. घरी बसा, इतरांशी गप्पा मारा. झोपा, मजा करा. Contacts वाढवा. कुणावर भार नाही, काही नाही! आपलं कोण ऐकतंय म्हणा? आपण आपलं वरून ऒर्डर आली की पोस्टर प्रिंट करायचं नि conference संपली की, जमिनीवर आंथरूण आडवं व्हायचं. काय माहिती पण स्वत:च्या फ्लेक्सवर झोप चांगली लागते; मी इतरांचेही try केलेत…I guess, I can write a paper on it!


6.06.10     

गुरुवार, २० मे, २०१०

विचार

      Fine focusची एक रेघ पुढं सरकवली आणि microscope खाली slide प्रगट झाली. स्लाईडवरचा जीव जिवंत chick embryo. नुकताच अंड्यातून काढलेला. अंड्यातून direct स्लाईडवर. धडधडणारं हृद़्य. केविलवाणे, मोठाले डोळे. स्लाईडवर तो आडवा. मायक्रोस्कोपमधून माझा आडदांड डोळा त्याच्या शरीरावरून फिरणारा.
      काय नशीब असावं ना? आत्ता-आत्ता जन्म आणि आत्ता आत्ता…एका फेऱ्यातून वाचला बाबा! आई कोणंय माहिती नाही! कुणाचाच स्पर्श झाला नाही. झोपेतून उठलेलं बाळ. अनभिज्ञ, अजाण, कोवळं… अंड्यातून direct स्लाईडवर. कोणत्याची biological systemला असं destroy करण्याचा अधिकारच नाहीये मुळात माणसाला! किती अवघड असतं हे…
      मायक्रोस्कोप स्टेजवर ते अजाण पिल्लू आणि binocular मधे माझे डोळे खुपसलेले…कुणीतरी धक्का दिला. गणेश होता. Classmate. Routine practicals. प्रत्येकाच्याच स्लाईडवर मरणारी पिल्लं, प्रत्येकाचेच डोळे मायक्रोस्कोपमधून त्यांच्यावर.
      “बघू तुझी स्लाईड?” तो.

      मी बाजूला झालो. Fine focusचा नॉब फिरवत तो म्हणाला, “हॅ! कुठं काय? Artefactय!” माझी स्लाईड बाजूला काढून त्यानं त्याची स्लाईड माऊंट केली. Focus केलं आणि तो त्या जीवाला पाहत राहिला.
      माझ्या स्लाईडवरचं पिल्लू मेलं होतं. हृद़्य बंद पडलं होतं. मेलं बिचारं. क्षणिक आयुष्य. मरणारच होतं.     ‘Artefact कुठून दिसली याला!’, मी विचार करू लागलो. ‘असेल बाबा!’ म्हणून त्याला तिथंच सोडलं!
      पाच-दहा मिनिटं गेली. तो बाजूला झाला. मी त्याचीच स्लाईड मायक्रोस्कोपमधे डोळा खुपसून पाहत राहिलो – कुठं काय?
      एवढा वेळ हा पोरगा Artefacts का पाहत बसला होता,याचंच कोडं सुटलं नाही. ढीगभर artefacts होत्या, त्याच्या स्लाईडवर.

०८.०९.०७