एके रात्री मी ‘ळ’ आकाराचं भूत पाहिलं.
वाटलं, स्वप्नासारखं स्वप्न असेल. डोळे उघडून उठून बसलो. अंधारल्या त्या खोलीत जिथून
चंद्राचा प्रकाश येत होता, तिथे ते ळ तरंगत होतं. मला पहिल्यांदा विश्वास नाही बसला.
मी जवळचं पाणी प्यालो नि डोळे ताणून बघू लागलो. ते ळ तरंगतच राहिलं. मी कपाळावरचा घाम
पुसला. ठरवलं की आता उठून त्याला हात लावावा. काही भुतं आपल्याला त्रास देत नाहीत,
त्यांना फक्त तुमच्याशी बोलायचं असतं. ळला जर मला त्रास द़्यायचा असता तर त्याने तो
दिला असता. पण बहुतेक ळ त्यांच्यातलं नव्हतं. मी कसाबसा उठलो. छाती धडधडत होतीच. मी
हळूहळू ळकडे जाऊ लागलो. मी जसजसा जवळ जायचो, ळ तसतसं लांब सरकायचं. मी दोन-चार पावलं
झपाझप टाकली, आणि ळ अद्रुश्य झालं. मला काहीच समजेनासं झालं. मी माघारी बेडवर येऊन
पडलो. छताकडे एकटक बघत. डोळे मिटले नि पुन्हा लगेच उघडले तर ळ पुन्हा छतावर प्रगट.
ळच्या मनात नक्कीच काहीतरी सलत होतं, पण काय? या भुताला तर मानवी चेहराच नव्हता. त्याला
फक्त एक आकार होता. बहुतेक हे आदिकालीन भूत असावं. ज्यावेळी पृथ्वीवर जीव-सृष्टी अवतरत
होती. तसाच कुठलासा सजीव असावा. त्याला मला कळेल असा काही आकार नाही, पण दु:ख तर अपरंपार
आहे. मी त्याच्याकडे एकटक पाहत विचार करत राहिलो काही क्षण. मग वाटलं त्याच्याशी बोलावं.
मराठीतून की इंग्रजीतून? कळेल आपली भाषा त्याला? मराठी आणि इंग्रजी काय? त्याच्यासाठी
साऱ्याच भाषा नव्या असणार! आपली भूतकाळाची झेप ती किती? दोन-पाचशे वर्षांची! या भुताला
सारं माहिती असेल का? त्याला प्रश्न विचारता येतील, भूतकाळाबद़्दलचे, उत्क्रांतीवरचे!
मी पुन्हा एकदा ळकडे बघितलं.
“हॅलो! नमस्कार!”
ळ काहीच बोललं नाही. त्याचं तरंगण क्षणभर
थांबल्यासारखं झालं पण तेवढंच.
“तुम्ही कसे आहात? तुमचा जन्म कधी झाला?
माझा एकोणावीसशे सत्त्याएशी साली. तुम्ही फारच म्हातारे असाल ना? तुम्हाला जे हवं ते
बोला. मला माहितीय की तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला.”
ळ पुन्हा अद्रुश्य झालं. मला कळलं नाही,
पण वाटलं त्याला आपलं बोलणं थोडंफार तरी कळलंच असेल. नाहीतर ते एवढा वेळ थांबलं नसतं.
माझ्या बोलण्यात त्याला काहीतरी तथ्य वाटलं असणार आहे. मग माझं मन शांत झालं आणि कधीच
लागली नाही अशी गाढ झोप लागली. मी कधी झोपलो मला कळलं नाही. मला त्या रात्री नंतर काही
स्वप्नं पडली नाहीत. असं वाटत होतं की झोपेच्या काळ्या डोहात कुणीतरी मला जोरात खेचून
नेलंय.
त्या दिवसानंतर ळच्या अस्तित्वावर कधी
विचार आला नाही डोक्यात, मागच्या महिन्यापर्यंत. मागच्या महिन्यात पुन्हा मला ळ दिसलं.
पण यावेळी टेबलावर ठेवलेल्या माझ्या चष्म्यात. बहुतेक ळमधे रूप बदलण्याची शक्ती असावी.
त्या रात्री मला जे दिसलं ते बहुतेक ळचं खरं रूप असावं. माणसांमधेही असंच असतं ना.
ज्यावेळी जन्म होतो, त्यावेळी सारेच नागडे असतात; मग अंगावर हवी तशी, आवडणारी कपडे
चढवू लागतात. ळचा बहुतेक त्या रात्री जन्म झाला असावा. म्हणजे ते पहिल्यांदाच कुणासमोर
तरी प्रगट झालं असावं. पण भुताला या गोष्टींची लाज का? आहे त्या आकारात रहावं. दुसरा
छान आकार मिळत असेल तर का नाही घ्यावा? मी माझ्या चष्म्याकडे एकटक पाहत राहिलो. विचार
करू लागलो. ळला आकाराचा लोभ झाला का? म्हणजे ळला जाणवतंय की त्याला कुणीतरी व्हायचंय.
ळ बहुतेक कुणी क्लिष्ट सजीव असावा. One of those primitive organisms with a
complex physiology. ळने माझ्यासाठी विचारांचं एक नवं
दालन उघडं केलं. पण मला हा प्रश्न पडला की मी हा चष्मा डोळ्यांवर चढवू की नको? ळने
जर माझ्या डोळ्यांत प्रवेश केला तर?
या प्रसंगानंतर ळ मला सतत दिसू लागलं.
सर्वत्र. ळमधे फार लवचिकता होती. ते जवळपास सगळयाच आकारांत समाविष्ट व्हायचं. बायकोबरोबर
बाजारात फिरताना समोरून येणाऱ्या स्त्रियांच्या छातीवर दिसायचं, कमोडवर बसलो तर खाली
सोडलेल्या बॉक्सरमधे दिसायचं. रात्री बारमधे निऑन साईनच्या लाईटमधे दिसायचं, बीअरमधल्या
वर येणाऱ्या बुडबुड्यांमधे दिसायचं. हेडफोनच्या वायरच्या गुंत्यामधे दिसायचं, स्वत:च्या
बोटांच्या गुंत्यामधे दिसायचं. दुर्बिणीच्या लेन्सेसमधे दिसायचं, नदीमधल्या छोट्या
भोवऱ्यांमधे दिसायचं. स्वत: लिहीलेल्या वाक्यांमधे दिसायचं, कंटाळा आला म्हणून केलेल्या
डुडल्समधे दिसायचं. हिनं तेलात टाकलेल्या भज्यांमधे दिसायचं, मी केलेल्या टू-मिनीट़्स
नूडल्समधे दिसायचं. महान चित्रकारांच्या Abstract art मधे
दिसायचं आणि ज्याचा मला बोध लागत नाही अशा अमर्यादतेत दिसायचं. माझ्या ळ जीवनाचा ळने
ळक्षणी येऊन ळ करून टाकला. सतत सगळीकडे ळ. त्या ळमुळे माझ्या अभ्यासिकेत माझ्या वाक्यांना
ळचीच लागण झाली. बघावं तिथे ळ. न संपणारं, माझा पिच्छा न सोडणारं ळ. घर सोडून कुठे
चार दिवस फिरू म्हटलो तरी जागांच्या नावांत ळ - महाबळेश्वर, कर्नाळा, अर्नाळा, जावळी,
राळेगण-सिद़्धी, अंमळनेर! काही वेगळं खाऊ म्हटलं तर तिथेही ळ - केळी, पोळी, जांभूळ,
डोकेदुखीची गोळी, मेथीत अळी! कुणाला जाऊन भेटावं म्हटलं तर भेटणारे पण असेच - माळी,
कोळी, नरसाळी, फुकट़्यांची टोळी! पक्षीनिरीक्षणाला जावं तर तिथेही बगळे त्यांच्या मानांचे
ळ करून उडणारे! कुणाच्या नाठाळ बाळाला खेळवायचंही जीवावर आलं माझ्या. वेळ पाळू की नको
कळेनासं झालं. जिथं मी ळ नाही वाचळं तिथेही ळच. ळचं भूत माझ्या मानगुटीवर ठिय्या मांडून
बसळं. ळने खरंच त्रास द़्यायळा सुरूवात केळी. ळच्या भानगडीत माझ्या जीभेची दाणादाण
उडाळी. मी शक्यतो ळ अक्षर असलेले शब्द वापरणं टाळू ळागळो. इंग्रजीतून बोलू लागलो, पण
कॉळेजमधे गणिताच्या तासाला ते infinity चं चिन्ह ब्रम्ह म्हणून उभं राहू
लागलं. माझ्या विद़्यार्थ्यांना कळेनासं झाळं की मळा काय होतंय. त्या infinity च्या चिन्हाकडे बघून वाटायचं की एक अमर्याद ळांबी रूंदी उंचीचा मळा
आहे आणि त्यात मळा एकट्याळा सोडून ळ दूरदूर चाळळंय. या गोष्टीचा शोध घ्यायचं कामच नव्हतं
कारण या अनंताच्या गोष्टी होत्या, ज्या माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाकडून कशा सोडवळ्या
जातीळ. पण ळचं दु:ख बहुतेक तिथेच कुठेतरी अडकळेळं. तीनेक वर्षं या ळने मला सतावळं पण
काळ ते रात्री त्याच्या पुर्वीच्याच रूपात दिसळं.
काळ रात्री मळा झोपायळा तीन वाजळे. अंधारात
पाहत बसळेळो एकटाच. माडीवर बायकोचं डोकं नि तिच्या केसांचा झाळेळा ळ. त्या सुरेख ळकडे
पाहिळं. आजवर या ळंमधे मला सतत त्रास का दिसळा? असा विचार करू ळागळो. या केसांच्या
ळमधे त्रास काहीच नव्हता. त्याचा आकारच तसा आहे, त्याळा कोण काय करणार? हे ळ भूत बहुतेक
स्वत:च्या आकारावर नाही, तर अस्तित्वावर नाराज असावं. त्याच्या अस्तित्वाचा अंत नाही.
काळाप्रमाणे ळ आहे. ळ हा खरा काळ आहे. मी बेडवरून उडी मारून उठलो. उत्तर जवळ होतं.
ळ मला त्यारात्री जसं अंधारात दिसळं तसं आज अगदी जवळ दिसळं. माझा समोरच ते तरंगत होतं.
मी हात पुढे केळा, पण त्याला स्पर्श करू शकळो नाही. हात त्यातून आरपार गेळा. मी त्याला
म्हटळं –
“मळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय बहुतेक
आणि मी त्याचा सर्वतोपरी शोध घेईन.”
ळचं तरंगण क्षणभर थांबळं. ते माझ्या उत्तराची
अपेक्षा करत होतं.
“तू काळाचं भूत आहेस ना? तुझ्यातल्या
“का” हरवलाय आणि तू त्याला शोधतोहेस. का आहेस तू असा अमर्याद? वेळेसारखा. मला माहिती
नाही, पण तुझ्या अस्तित्वाशिवाय आमचं अस्तित्व नाही. त्यामुळे तू या प्रश्नावर अश्रू
गाळू नकोस मित्रा. तुझ्या अमर्यादेत कुठेतरी तुळा रेषा आहेत त्यामुळे तू ळ आहेस. नाहीतर
ल असतास, दोन उघड्या वर्तुळांचा. पण तू ळ आहेस आणि आमच्या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांसाठी
तू फार चांगलं dumping ground आहेस. तू फार चांगलं काम करतोहेस
ळ. आज जगातली किती लोकं तुझ्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या कितीतरी प्रश्नांसाठी ‘वेळ’
हेच उत्तर आहे!”
ळ तरंगत तरंगत आकाशाकडे निघालं आणि मग
अदृश्य झालं. मला फार आनंद झाला. जीभ मोकळी मोकळी झाली. ळ आणि लच्या व्याख्या सांगितल्या
की काय मी! मी घरात आलो. बायको ळ आकाराची मांडी घालून माझी वाट पाहत होती. पुढचं भांडण
होतंच अट‘ळ’!
पंकज कोपर्डे
११ जून २०१६