टाचण्यांच्यामागे फिरायला नक्की कधी सुरू केलं ते आठवत नाही मला आता ठीकसं.
कधीतरी २००९-२०१० मधे. त्यापुर्वीही चतूर पहायचो, टाचण्या पाहिल्या होत्या, पण
त्या ओळखता यायच्या नाहीत. तिथेच गाडं अडायचं. एखादया सजीवाचं नाव माहीत नसेल, तर
आपण नक्की काय पाहिलं-ते काय करत होतं-ते किती सुंदर होतं, हे सगळं सांगणार कसं? पक्ष्यांची
नावं तर लहानपणापासून, छोट्या-मोठ्या मराठी पुस्तकांपासून ते मोठ-मोठ्या ईंग्लिश
ग्रंथांतून चाळून काढली होती. पण चतूरांपासून मी आवड असूनही बराच अनभिञ राहिलो.
कारण ओळखणार कशा त्यांच्या नानाविध प्रजाती? २००९ मधे सुब्रमनिअन सरांचं एक छान
पुस्तक हातात पडलं. आणि मग हे-दणादण चतूर आणि टाचण्या पहायला-अगदी जवळून पहायला मी
सुरूवात केली. सुरूवात केली खरी, पण कीटकांनाही मी पक्ष्यांना बघतो, तसंच बघू
लागलो. त्यांची बैठक बघावी, ते कसे उडतात ते बघावं, त्यांचे रंग बघावेत, त्यांचे
आकार बघावेत आणि या सगळ्यांतून त्या एकमेव पुस्तकात जो फोटो जवळचा वाटतो, तो फोटो
म्हणजे ती प्रजात. असं माझं सुरू झालं. त्यात बऱ्याच चुका केल्या. दोन मजेशीर
गोष्टी आठवतात. सिंधुदुर्गातल्या आंबोलीत एक नाजूक पारदर्शी, पण चांगलीच मोठी
टाचणी पाहिली. टाचणी कसली? सुईच ती! २०११ मधे. ती नुकतीच पाण्यातल्या किड्यापासून
पंख ल्यालेली टाचणी बनली होती. मी तिला पाहिलं, फोटो काढले. पुस्तकात पाहिलं आणि
म्हटलं की ही आहे Great Emerald Spreadwing. खरं तर ही प्रजात सापडते उत्तर
भारतात, मग ती आंबोलीत कशी? दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे पुण्याजवळच्या कवडीच्या अतिप्रदुषित
पाण्यात पाहिलेली Malabar Torrent Dart. ही प्रजात पश्चिम घाटात, स्वच्छ ओढयांच्या
प्रवाहात सापडणारी. मग ती पुण्याजवळ कशी? या दोन्ही मजेशीर गोष्टी म्हणजे चुकीचं
identification. Great Emerald Spreadwing खरं तर Clear-winged Forest-Glory होती आणि
Malabar Torrent Dart खरं तर Black-winged Bambootail होती! मग हळूहळू कळू लागलं, की
चतूर आणि टाचण्या हे पक्ष्यांपासून भिन्न आहेत. त्यांना बऱ्याचदा पकडावं लागतं आणि
सुक्ष्मदर्शीखाली न्याहाळावं लागतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की फ्रेझरची पुस्तके वाचा.
मग हळू-हळू त्या पुस्तकांचा अभ्यास करून काय योग्य-काय अयोग्य ते सुद्धा कळू लागलं.
कवडीच्या अतिप्रदुषित नदीच्या
काठाने बरीच बाभळीची झाडं-झुडपं आहेत. तिथे पहिल्यांदा Coral-tailed Cloud-Wing (नभपंख?)
पाहिला. फार सुंदर चतूर. दोन्ही पंखांवर त्यानं सुंदरसे दोन निळे ढग पेललेले. शांत
बसलेला. सरळ अगदीच काठीसारखा. आणि मग थोडं अजून पुढे गेल्यावर Asiatic Blood-tail
(लाल-शेपट्या?). या लाल-शेपट्याची समाधी अवस्था मला फार प्रिय आहे. शांत, एके ठिकाणी
बसून राहणार आणि अचानकच झपाट्यात किडे पकडून पुन्हा त्याच काठीवर. उत्तर अंदमानात,
चालीस एक मधे मी २०११ मधे काम करायचो. तिथे दररोज संध्याकाळी आमच्या कॅम्पच्या थोड्या
वरच्या अंगाला थोडी मोकळी जागा होती. आजूबाजूला गुहाच गुहा. त्या मोकळ्या जागेत सुर्य
मावळू लागला की मी येऊन बसायचो. दिवस संपत आलेला असायचा. मी बाजा हातात धरून ठेवायचो
आणि वारा वाहू लागला की वाजवायचो. घर दूर होतं. तिथे एक लाल-शेपट्या यायचा, दर संध्याकाळी.
त्याच जागी, दररोज. त्याची बसण्याची जागा ठरलेली. छानशी लाल शेपूट होती त्याची. एकटाच
नर होता. यायचा-बसायचा-उडायचा-जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्यायचा. अंधार पसरू लागला
की अचानक गायब व्हायचा. हे सलग पंचवीस दिवस चाललं. मधे एक-दोन दिवस फार पाऊस झाला,
त्यावेळी डोक्यावरचं छत सोडून जायची इच्छा नव्हती. पंचवीस दिवसांनंतर मी दुसऱ्या कॅम्पवरती
गेलो. आठवड्याभरानंतर परत आलो, तेव्हा तो कॅम्पच्या अगदीच जवळ दिसला. त्याच्या बरंच
जवळ जाऊन फोटो काढले. एवढ्या साऱ्या दिवसांत मी त्याला एकट्याला सोडलं तर इतर कुठलाच
लाल-शेपट्या नाही पाहिला त्या बेटावर कधी!
या चतूर-टाचण्यांचं वेड हळूहळू
लागलं मला. बरेच मजेशीर अनुभव आहेत. २०११ मधे उत्तर अंदमानातल्या इंटरविव्ह बेटावरती
पाहिलेल्या सुंदर टाचण्या. तिथे वाहणारा एक गोड्या पाण्याचा ओढा, समुद्राला अगदीच लागून.
त्या ओढ्याच्या आजूबाजूला हत्तींचे ठसे, अगदीच ताजे. माझे डोळे कॅमेऱ्यात, पाय निदान
गुडघ्या-एवढ्यातरी चिखलात रूतलेले. जस्टिन- माझा field assistant ओरडून-ओरडून थकलेला,
“सर, चलो. हाथी आयेगा!”. कसेबसे तिथून बाहेर पडलो आणि नावेत बसलो, तर बहाद्दर सांगतो
मला की त्यानं हत्ती अगदीच तीसेक फुटांवरती पाहिला. झुडूपामागून पाहत होता तो मला नि
जस्टिनला. २०१३ मधे पारपोलीला एका छानशा ओढ्याच्या मध्यभागातून चालत होतो. आजूबाजूला
Malabar Torrent Darts उडत होत्या. ओढ्याला चांगलाच प्रवाह होता आणि गळ्यात दुर्बिण
नि मोठाला कॅमेरा घेऊन चालणं कठीण झालं होतं. सॅण्डल्स किनाऱ्यावरतीच सोडल्या होत्या.
चालता-चालता पाय सटकला आणि पाण्यातल्या दगडावर आपटलो. दुर्बिण भिजली, पण कॅमेरा वाचला!
२०१३ मधेच कोयनेच्या काठी वसलेल्या अरव गावात सर्व्हे करत होतो. कोयनेच्या धरणाच्या
पाण्याच्या काठाकाठाने फिरत होतो. एक अगदीच वेगळी टाचणी दिसली. वाटलं, हे काहीतरी खास
आहे. दुर्बिण नि कॅमेरा घेऊन हळूहळू तिच्याकडे सरकू लागलो. अगदीच उतार होता आणि बराच
चिखल होता. अचानकच पाय घसरला आणि मी अख्खाच्या अख्खा धरणाच्या पाण्यात. पाणी गार होतं
आणि चांगलंच खोल होतं (20 फुट?). सुदैवाने घसरताना मी दुर्बिण काठावर ठेवू शकलो, पण
कॅमेरा माझ्यासकट पाण्यात गेला. बाहेर लगेच येता आलं नाही. काठावर कुठे धरायला काही
दगड-धोंडे नव्हतेच. फक्त चिखल होता आणि जिथे जिथे पकडायचा प्रयत्न करायचो तिथे-तिथे
सटकायचो. कसा-बसा कॅमेरा काठावरच्या एका झाडाला लटकवला आणि चिखलातून सरपटत काठावर आलो
नि मग तसाच सरपटत तो सगळा चढ पार केला. एक लांब काठी आणली आणि झाडावरचा कॅमेरा मिळवला.
ती गूढ टाचणी काही मिळाली नाही, कॅमेरा मात्र त्यादिवशी उन्हात वाळवत टाकावा लागला!