बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

ती शांत दुपार


ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास;
घरात घर केल्यासारखी
चौकटांची खिडकी;
कर्ररकर आवाज करत
झाडांच्या फांद़्या,
वाऱ्यावरती सळसळ नुसती
पिकली पानं गळकी.
ऊन नाही, नाही सावली,
उदासीनता आहे नुस्ती
थंड वारा वाहून आणिक
पापण्यांवरती सुस्ती.
पोटातूनही येते गुडगुड
ती तिथेच आपली बरी;
ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास.


॒॒॒(@ IISc. sometime in September)

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

आवर्तन


ती येण्याचे काळ-ऋतू नि येतानाच्या लाटा,
कधी हरवत, कधी सापडणाऱ्या हरवलेल्या वाटा;
सुळकत जाणारे किरमिजी पक्षी पाण्याकडे,
परतून माघारी-माघारी पुन्हा परत, डोळे वाटेकडे!
धुळेजलेल्या वाटांवरून एकटीच पळणारी फुलपाखरं,
त्यामागून नि एक सावली पळतीय खरं…
अशा नाजूक वेळी किती घडावीत आवर्तनं,
भेट-ताटातूट, पुन्हा परत सारंच जीवघेणं!

बुधवार, २७ जुलै, २०११

एकट्या वाहणाऱ्या दुपारीत सळसळणाऱ्या झाडाची कळकळ ऐकायला कोण उभंय कुठे?
एक तो गाणारा कवी होता, त्याचा नाही पत्ता!! 

शनिवार, २३ जुलै, २०११


कागदावर एक रेघ ओढायला निमित्त लागत नाही.
पाऊस पडला – तुझी आठवण आली
किंवा तुझी आठवण आली (नि पाऊस पडला!)
इतकंही अमाप होतं.
आभाळातून कोसळणाऱ्या थेंबांचा कैक सेकंदांचाच प्रवास!
गर्भ – जन्म – उत्साह – आनंद – वेग आणि अकस्मात मृत्यु – दफन!
ही सारी गोष्ट जेवढी मी उपभोगतो; तेवढीच क्लेषदायक?
जीव कातरत जाणारी बासरी, निळ्या रात्रीत पागोळ्यांचं पाणी!
दूरदूरवर दिसायला प्रकाश नाही; थंडीला सारायला ऊब नाही!
ऊब नाही, पण खूप घट़्ट आहे तुझ्या आठवणींची मिठी!
गात्र-गात्र थंड करणारी…

सोमवार, १३ जून, २०११

काहीतरी


   काहीतरी कमीय असं नेहमीच वाटतं; पण ते काय अजून कळलं नाही. “भाजीत मीठ कमीय गं” हे वाक्य कितीदा तरी कानांवर पडलं; पण ते मीठ काही कमी पडायचं थांबलं नाही! मला सतावण्यासाठी नि माझे तेच तेच शब्द पुन:पुन्हा ऐकण्यासाठी तिचे हात शांतपणे सतत तेच करत राहिले…सवय झालीय का आता?
   हा प्रश्न भयंकर आहे. हृद़्यात कळ मारावी; इतपत! सवय झालीय का? तिच्या हातांना मीठ कमी टाकण्याची की मला ते अन्न तसंच ग्रहण करण्याची!! आता चवीतही काही रस उरला नाही? असं म्हणावं का? माणसांना एकमेकांची सवय झाली की काय होतं पुढे? प्रयोग करून पाहण्यासारखा आहे…आहे; पण तो सुरू आहे का? हेच कळत नाहीये! सवय झाली असेल तर नाविन्य नाही; नाविन्य नसेल तर कुतूहल नाही; कुतूहल नसेल तर गोष्टी नजरेआड होतात. सवय लागते. आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर सदाफुलीचं झाड नि शेजारीच एक मनीप्लांट; या दोहोंवर उडणारा शिंजीर. दिसतो न दिसतो; सकाळी दारातून बाहेर पडलं की नजर जातेच तिथे; कारण तो दिसतोच असं नाही ना! शोधावं लागतं त्याला! तो सवय लावू देत नाही…
   तिची सवय झाली; म्हणजे मग सगळ्याच गोष्टींची सवय झालीय की काय? हा दुसरा प्रश्न अजूनच भयंकर नाही का? एकापाठोपाठ एक वेस उपटत जावी; तसंय हे! उरणारा कोवळा-लुसलुशीत प्रेम नावाचा गाभा कितपत संरक्षित राहणार आता? 

रविवार, ८ मे, २०११

दुपार


झोपाळा हलतो. वारा वाहतो.
बाभळीचा काटा उन्हाने तापतो.
पाचोळ्यातून खुसपूस
क्षणभरच आणि शांत…
स्तब्ध मुखातून, जीभ लवलव.
चिरकाच्या हाळ्या, दगडावरून घराकडे
कानाजवळच उडताहेत,
म्हाताऱ्या लिंबाच्या चिरफाकळ्या.
सुन्न दुपार, कानात हुशार कुई…

आंब्याचा रस टेबलावर,
कूलरची हवा अंगावर.
वाढलेल्या शरीराला वेढलेला पसारा
पाचोळ्याचा जीव पाचोळाच उरलेला.

रविवार, १ मे, २०११

BIPOLAR


रस्ता असा चालता चालता घड्याळाकडे नि तिथून नजर रस्त्याच्या उन्हात तळपत्या टोकाकडे जाते, त्यापुढे समुद्र. डोक्यावर सुर्य. गोलाकार डोक्याच्या पाठीमागून ढगाकडे tangent टाकला की तो सुर्याच्या मध्यबिंदूला छेदणारा. पावलं थकतात नि मनाचा गोळा छातीला जड होतो. डोळे मुद्दाम बारीक करून अंतर कमी होतंय का ते मेंदू एकदा तपासून पाहतो. डाव्या हाताला वडाचं झाड, उजवी काख डाव्या हाताने खाजवणाऱ्या मांडी घालून बसलेल्या पन्नाशीच्या खुरट्या दाढीच्या काकासारखं. रस्ता…झाड. सुर्य…सावली. थांबूयात का थोडं? वाटतं हे खरं. रस्त्याच्या टोकाला कुणीतरी वाट पाहत थांबलंय ही जाणीव चालायला सुरूवात केल्यापासूनच आहे मला. कोण थांबलंय खरं? त्याचं मूळ मनात कितवर गेलंय आत याची कल्पनाच उथळ आहे फ़ार पण. वड.
      रस्त्याची सुरूवात होऊन फक्त २ मैल झालेत. २ मैल…म्हणजे अंतर कापलं ते ही एक चतुर्थांश! अजून ३ बाय ४ चा रस्ता आ वासून पडलाय. सावली इतकी प्रेमळ वाटते की तिथे बसण्यापेक्षा तिच्या आत आत जाऊ वाटतं. अंग आखडून बसलो की आजूबाजूला पडलेले ऊन्हाचे तुकडे चावत नाहीत अंगाला. भिती वाटते त्यांची! मी जाऊ शकतो का रस्त्यावर पुढे? मी एवढा रस्ता कसा काय पुर्ण केला? नाही बाबा, नाही जमत हे आपल्याला! त्या टोकाला कुणी या टोकाला कुणी, मधे मी एकटा…एकटा? मुद्दामुनच सोडलेला. हा कोंडमारा असह्य आहे. मला टाकून दिलं लोकांनी, आवडत्या जागांनी नि चंद्र-सुर्य-समुद्राने!! डोळ्यातला पाऊस थांबता थांबत नाही…उपाय एकच दिसतो…वडाची डावीकडे उन्हात पसरलेली एकुलती एक फांदी नि तिच्यावरच्या जाडयाभरड्या दोरखंडावर फास घेऊन वाळत पडलेलं एक प्रेत. अंगात ताकद नाही; मन तेवढं निर्ढावलेलं नाही की बाकीची सगळी व्यवस्था करेल…त्याला फक्त त्या कल्पनेतच रमायला आवडतं. डोळ्यांसमोर चार रानकुत्री हरणाचं एक पाडस पकडतात, ते वेदनेनं किंचाळतं, पाणी इथे पाझरतं. त्याच्या शरीरावर ओरबाडणं, लचके इकडे मनाचे तुटतात. तळहातांनी डोळे पुसून तळहात ओले नि डोळे लाल झालेत, बाकी वेळ हवा तसा चाललाय पुढे…
      दुपार ढळत आलीय. पाय जोर करून शरीराला तोलत उठवतात. अंगातलं पाणी संपेल असंच रडत राहिलं तर ही जाणीव होते नि वळलेली वाट रस्त्याला लागते पुन्हा हळूहळू. दहा-वीस पावलं अंतर निवांत जातं. मन आकाशासारखं निरभ्र होतं…किंचीत जांभळसरही. रस्ता अर्धा कापला जातो…संध्याकाळ आता शरीराने छान भरलेली दिसते. आकर्षक नि स्पर्श करावी अशी. त्या स्पर्शाने काय होणारेय तसं खास? हा प्रश्न त्यावेळी जन्मच घेत नाही, हे अनुभवलंय मी कित्येकदा! ती केशरी नि जांभळट दिसू लागते. कपाळावरती घामाचे चार थेंब थेट पायाच्या नखाच्या प्रवासाला निघतात. रस्त्याचं टोक हातभर लांब दिसू लागतं, अशे चार रस्तेतरी आरामात कापेन मी न थांबता असं छातीतलं मन आनंदाने ओरडतं. रस्त्याच्या टोकावर परिचित हात दिसू लागतो…अंगात प्रचंड ताकद आहे या अभिमानाने मी भरभर चालू लागतो. रस्ता संपतो, हवं ते मिळतं…पण आता काय करायचं? कोणता रस्ता पार करायचा? या विचारात मी अस्वस्थ होऊन नुस्ता सैरभैर पाहत राहतो. दरी नि शिखरांचा रस्ता सपाट कधी होणार, याची सध्या वाट पाहतोय!