गुंते सोडवत बसलेल्या मनाला पागोळ्यांत अडकायला होतं. पावसाची चाहूल लागली की
धड इकडे ना तिकडे, ते बावरं होऊन धडपडायला लागतं. शरीर मोठं झालं, पण मन नि पाऊस लहानंच
उरलेत. लहानपणी संध्याकाळी खेळायला बोलवायला येणाऱ्या मित्रांच्या हाकांकडेच सतत लक्ष
असायचं आणि अभ्यासाचं वाचन दिखाव्यापुरतं. ते मित्र संसारात बुडाले. काही तळाला गेले,
काही गटांगळ्या खात राहिले. अभ्यासही प्रचंड न संपण्याएवढा, आणि स्वत:च्या उत्कर्षासाठीची
कामं, भारताच्या सध्याच्या लोकसंख्ये एवढी. अनंतात विलीन होणारी कमी, जन्मणारी जास्त.
संध्याकाळ थोड्या-फार फरकाने बदलली तरी तिच्यावरचा विश्वास ढळला नाही. आजवर ज्या-ज्या
ठिकाणी फिरलो, त्या-त्या सर्व ठिकाणी ती स्वत:च असं एक वैश्विक अस्तित्व घेऊन प्रगटली.
किर्रर्र जंगलं असो, समुद्र-किनारे असोत, ट्राफिकाळलेले रस्ते असोत, शांत घर असो की
कॅफेटेरियातल्या गप्पा असोत. ती सतत तिचं देवीत्व घेऊन पसरली, तास-दीड तास का असेना.
मनाला खात राहिली. असण्या-नसण्याचे प्रश्न उपस्थित करत राहिली. लिहायला भाग पाडत राहिली.
ती दररोज येत होती, तशी भिती वाटत राहिली की सवयीची तर होऊन जाणार नाही ना? ती दररोज
येत राहिली, तरी दररोजच काही प्रश्न, कविता, गाणी, लेख नव्हतो लिहीत मी. काही वेळा
वाटलं की सकाळी उठून ब्रश करत बसण्यासारखं आहे हे. फार पुर्वीपासूनच नस्ती सवय लावली,
तर आज एक दिवस ब्रश चुकवला तर वाटणारी घाण नस्ती वाटली. लहानपणीही संध्याकाळच्या हाकेला
‘ओ’ नस्ती दिली, तर आज वाटणारी आपुलकी नि प्रेम नस्तं वाटलं कदाचित. पाऊस येतो, तेव्हा
पाऊस येतो. एकटाच. संध्याकाळ नुस्ती रंगापुरती मर्यादित राहते किंवा तिच्या नेहमीच्या
घडण्याच्या वेळेनुसार इकडे मनात चल-बिचल होत असते, तेवढंच. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा
मनाची समाधी भंग पावते. ते त्याच्या मांडी घालून बसलेल्या वैचारिक मुद्रेतून अगदीच
कोलमडून जातं. गारठा जाणवतो, गरम चहा-कॉफीची जाणीव होते. खिडकीत उभं राहून कितीतरी
वेळ मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं बघत राहतो. तांत्रिकदृष्ट्या पाऊस म्हणजे आभाळातून
पडणारं पाणी. पण या पाण्यात सोडवायला मन असंख्य गुंते हुडकून काढतं. त्यात आठवणी असतात,
जन-माणसांचे प्रश्न असतात, जगाचे प्रश्न असतात, प्राणी-पक्ष्यांचे प्रश्न असतात, पाण्याचे
प्रश्न असतात. एका अखंड चालणाऱ्या चक्राचा माझं आयुष्य म्हणजे एक मोजताही न येण्याइतका
छोटा भाग. किती पावसाळे पाहिले असतील या पॄथ्वीने? माझी झेप ती किती? त्या माझ्या आयुष्यातही,
अजून कितीक लहान भाग. भूतकाळाचा पट़्टा, अगदी कालपासून किंवा अगदीच या गेलेल्या सेकंदापासून
सुरू झालेला; गल्ल्या-गल्ल्यांतून जाणारा. थोडं मागं वळून पाहिलं तरी आता दिसत नाही,
इतका काळोखा. त्यातही पाऊस कोसळणारा. त्या पट़्ट्यावर कित्येक ठिकाणी जवळपास वर्षभराच्या
अंतरावर उभ्या असलेल्या माझ्या छब्या आणि थोडा-फार तोच पावसाचा निनाद आणि मनात घोळणारे
विचार…मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं, शांत होत चाललेलं जंगल, पागोळ्यांचे आवाज,
बेडकांचे आवाज, जोर-जोरात किनाऱ्यावर कोसळणाऱ्या लाटा. संध्याकाळ मनाला फार मोकळं करून
सोडते, पाऊस त्यावर आरूढ होतो. संध्याकाळ खेळायला बोलवते, पाऊस त्याला स्तब्ध राहून
विचार करायला भाग पाडतो. एरव्ही स्वत:चा विस्तार आणि महत्त्व वाढवत चाललेल्या मनाला,
पाऊस स्वत:च जखडून टाकतो. तो परिस्थितींना जखडून टाकतो. मग कधी मी जंगलात अडकतो, कधी
समुद्रानं भरत आलेल्या बेटावर, कधी स्वत:च्या छानश्या घरात किंवा कधी कॅफेटेरियात नुक्त्याच
प्रेमात पडलेल्या मैत्रिणीबरोबर. पाऊस म्हणतो, मला हवं तोपर्यंत तुझी सोडवणूक नाही!
पंकज कोपर्डे
६ जुलै २०१४