अमावस्येच्या संध्याकाळची गोष्ट आहे. गोष्ट आहे,
पण खरी आहे. गोष्टीच्या खरेपणाला अमावस्येच्या संध्याकाळची साक्ष आहे. तेव्हा बागेत
गुलाब फुलले होते, होते ते लालजर्द होते नि नव्हते ते कळ्यांत फुलण्याची स्वप्नं घेऊन
जगले होते. वारा मंद होता नि खिडकीत अडकवलेल्या विण्ड-चाईम्सना तासभर तरी छेडत राहिलेला.
खिडकीशेजारच्या पलंगावर प्रियकराच्या कुशीत प्रेयसी झोपलेली नि तिच्या मनात खोलवर प्रियकराची
असंख्य मनं गुंतून राहिलेली. दोघांच्याही अंगावर शहारे ताजे होते, जे होते ते सारेच
प्रेमाचे नजारे होते. तिच्या केसांच्या घनदाट सुवासात प्रियकर हरवलेला नि त्याच्या
हनुवटीच्या कड्यावर प्रेयसीचा माथा विसावलेला. किर पोपट थव्याने घरट्याकडे परतत होते,
सुभगाच्या शिळा मंदावत चाललेल्या आणि. संध्याकाळ निळसर जांभळी केशरी होऊ पाहणारी, सुर्याच्या
असंख्य मनात प्रेमाचे अविष्कार आणि. टेकड्या-टेकड्यांवरती फुलपाखरं झोपेला आलेली, चतुरांची
अजूनही पाण्यावरती मुक्त क्रिडा चाललेली. गवता-गवतातून टाचण्या निजलेल्या, संध्याकाळ
रानावरती पांघरूण ओढत चाललेली, लेकरांना निजवायला.
प्रियकराने प्रेयसीच्या गालावर फुंकर मारली, तेव्हा
प्रेयसीची झोप चाळवली. तिने डोळे किलकिले करून रंगांचा अंदाज घेतला. मोगऱ्याचा मंद
सुगंध नि सतारीचा नाद. तिने प्रियकराला अजूनच घट़्ट मिठी मारली. त्याला घट़्ट मिठी
मारली तेव्हा गार वारा सुटला; मोगऱ्याचा सुगंध सैरभैर झाला; पक्षी एक-दोन भरकटले-गेले
चित्रातून; खिडकीचे दरवाजे आणि तीन वेळा टाळ्या वाजवून सताड उघडे राहिले; संध्याकाळ
गोठत गेली नि तिचे नानाविध रंग जाऊन ती काळ्या रंगाशी एकरूप होत गेली; शहारे मोजकेच
उरले-पण उरले ते अंतरंगात उरले-विरले ते अंतरात विरले; पिंगळे बोलू लागले नि पिंपळ-पाने
सळसळू लागली; पिंपळाच्या टोकावर एक दयाळ, श्याम होऊन एकटाच, वाजवत राहिला बासरी. डोळ्यात
डोळे घालून प्रेयसी म्हणाली, प्रियकराला-“चंद्रकोर किती छान असते रे! तू लिहशील का
चंद्रकोरेवर कधी? (माझ्यासाठी?)”
“रात्र गर्द होईल तेव्हा नि चंद्र हरवत जाईल-विसरत
जाईल-हळवा होईल-आसुसत जाईल चांदण्यांसाठी तेव्हा तो ओढून घेईल रात्रीला अंगावरती नि
तिच्या मिठीआडून पाहत राहील ब्रम्हांडाकडे अलिप्तपणे. त्याला नसेल इच्छा मोठं होण्याची,
नसेल इच्छा झळाळून निघण्याची तेव्हा. तो रात्रीच्या मिठीत आक्रंदणार नाही, ती आई आहे,
थंड असली तरी चंद्राएवढी शीतल नाही, तिच्या मिठीत मायेची ऊब आहे, पण हरवत चाललेल्या
प्रेमाची कसर ती कितपत भरून काढणार? चंद्र तेव्हा एकटाच असेल नि चांदण्याही एकट्याच
हरवलेल्या. तो म्हणेल, मी कुणासाठी होऊ मोठा? कितपत नि कसा होऊ मोठा? आपण तेव्हा पृथ्वीवरून
चंद्रकोर पाहत राहू नि तिच्या केशरी किनाऱ्यावरती आपलं घर वसवत राहू. चंद्राला एक कळत
नाही, ज्या पांघरूणाखाली-ज्या मिठीत तो सामावून गेलाय, त्यातच चांदण्याही हरवल्या आहेत.
सगळेच बिलगून नसले, तरी जवळ आहेत. आज तू माझ्या जवळ असलीस-बिलगून असलीस तरी आहेस ब्रह्मांडातच
तरूण. चंद्राला माहितीय आणि की, लपून-मनात जपून प्रेम मिळत नाही-वाढत नाही. ते शोधावं
लागतं-ते मिळवावं लागतं-ते अनुभवावं लागतं-नि राखावं लागतं. आजची चंद्रकोर, उद़्या
इतकी सुंदर नसणार; पण सुंदर नसली तरी चंद्राचं असं व्याकूळ होणं सुंदर आहे. जगात किती
किंचीतसं प्रेम उरलंय-पण उरलंय त्यावर जग किती सुंदर सुरूय. चंद्रकोर बघताना तुझ्या
डोळ्यांची चंद्रकोर आठवते-मी दूर जाताना, मी पाहिलंय तिला. तिला आजचा विरह नाही सहन
होत-पण अजब आहे, ती दिसतेच मुळात सुंदर. ती दिसते तेव्हा तिला माहिती नसावं कदाचित
की बोलून-लिहून जितकं प्रगट करता येत नाही तितकं प्रेम ती नुस्त्या एका चंद्रकोरीने
उधळते. आणि चंद्रकोर पुढे जाऊन पौर्णिमा निर्माण करते, तेव्हा चंद्र उरतो एकटा नि चांदण्या
हरवतात. हे दिसतं सगळं आपल्याला. विरह आहे, म्हणून प्रेम आहे. प्रेम आहे-म्हणून विरह
सहन नाही होत. विरह सहन नाही होत, म्हणून चंद्रकोर तयार होते.”
प्रियकर उठला नि दाराकडे निघाला. खोलीभर तेव्हा अंधार
गडद झालेला नि चंद्रकोर एक आभाळात नि दोन खोलीत, केशरीसर कडा लेवून अवतरलेल्या…
पंकज
कोपर्डे
२ नोव्हेंबर
२०१४